Join us

आता होणार मानवरहित शेती! बारामतीत फुलतेय AI तंत्रज्ञानाने विकसित केलेली शेती

By दत्ता लवांडे | Published: January 31, 2024 9:41 PM

एआय तंत्रज्ञान शेती क्षेत्रातील भविष्यातील महत्त्वाचे तंत्रज्ञान आहे.

पुणे : शेती क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस नवनवीन आणि अद्ययावत तंत्रज्ञान येत असते. त्यातच आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial intelligence) वापरही शेती क्षेत्रामध्ये होत आहे. बारामती येथील एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्याकडून कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित शेतीचे प्लॉट विकसित करण्यात आलेले आहेत. 

दरम्यान, भविष्यात शेती क्षेत्रामध्ये ऑटोमायझेशन, रोबोट, ड्रोन, कृत्रिम बुद्धिमत्ता या गोष्टी येऊ घातल्या आहेत. AI तंत्रज्ञानामुळे मानव रहित शेती करण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचा खर्च आणि त्रासही वाचणार आहे. 

काय आहे शेतीतील AI तंत्रज्ञान?शेती करत असताना आपल्याला प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवावे लागते. पण AI तंत्रज्ञानामुळे वातावरणातील बदल, खत कधी द्यायचे, खत कोणते द्यायचे, पाणी कधी द्यायचे, पिकाची काढणी कधी करायची? असे निर्णय घेण्यास मदत होणार आहे.  या तंत्रज्ञानामध्ये सॅटॅलाइट्सचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. या माध्यमातून जमिनीतील अन्नद्रव्य आणि घटकांचा अभ्यास करून पिकाची निवड केली जाते. पिकाचे सर्व नियोजनही याच तंत्रज्ञानाच्या आधारे केले जाते.

IOT सेन्सर्स आधुनिक वेदर स्टेशन 

आधुनिक वेदर स्टेशनच्या माध्यमातून हवामानातील बदल, पावसाची शक्यता, जमिनीतील आर्द्रता, हवेचा दाब आणि पुढच्या आठ दिवसातील पावसाचा अंदाज या माध्यमातून आपल्याला कळतो. यामुळे आपण सिंचनाचे नियोजन, खतांचे नियोजन आणि कीड रोगांचे नियोजन करू शकतो.

IOT सेन्सरच्या माध्यमातून जमिनीचा सामू, जमिनीमधील नत्र, स्फुरद, पालाश या घटकांची अद्ययावत माहिती आपल्याला मिळते. यामुळे जमिनीतील असलेली घटकांची कमतरता आपण लगेच भरून काढू शकतो. 

ड्रोन

ड्रोनद्वारे हायपर स्पेक्ट्रल कॅमेरा चा वापर करून पिकावरील रोगांचा आणि सूक्ष्मजीवांचा अभ्यास केला जातो. रोग येण्यापूर्वीच पिकाचा फोटो घेऊन त्याच ठिकाणी औषधांचा आणि खतांचा मारा केला जातो. त्यामुळे भविष्यातील पिकावरील रोगावर नियंत्रण ठेवता येते. 

दरम्यान, शेती क्षेत्रामध्ये येऊ घातलेले हे आधुनिक तंत्रज्ञान आहे. मनुष्यबळाचा कमी वापर, योग्य नियोजन आणि संरक्षित शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान महत्वाचे ठरेल.

 शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान आपल्या शेतात वापरायचे असल्यास अगदी अल्प दरामध्ये सॅटॅलाइटची सुविधा उपलब्ध होत आहे. त्याचबरोबर आधुनिक वेदर स्टेशन आपल्या शेतात बसवायचे असल्यास त्याची किंमत 50 हजार रूपयांच्या आसपास असल्याचं बारामती येथील कृषी महाविद्यालयातील शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी