Join us

Nursery Business : पावसाळ्याच्या तोंडावर नर्सरी व्यवसायात मजुरांचे व्यवस्थापन कसे करावे?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2024 9:00 PM

Nursery Business Labour : कोणत्याही उद्योग धंद्या प्रमाणे रोपवाटिका हा सुद्धा एक व्यवसाय समजला जातो. तसेच रोपवाटिकेत वेगवेगळ्या स्वरूपाची कामे करण्यासाठी मजुरांची गरज भासते.

Nursery Business Labour Management : कोणत्याही उद्योग धंद्या प्रमाणे रोपवाटिका हा सुद्धा एक व्यवसाय समजला जातो. तसेच रोपवाटिकेत वेगवेगळ्या स्वरूपाची कामे करण्यासाठी मजुरांची गरज भासते. हे मजूर वेगवेगळ्या प्रकारचे असतात व त्यासाठी मजुरीचे वेगवेगळे दरही असतात. रोपवाटिकेत मजुरांची गरज कमी जास्त असते, तसेच त्यांच्या काही अडचणीही असतात. त्यामुळे मजूर व्यवस्थापन ही एक महत्त्वाची बाब आहे.

पावसाळ्यात कलमा - रोपांची आगाऊ मागणी नोंदवून काही तरतुदी केल्या तर पाऊस पडल्यानंतर एकदम मागणी वाढते. त्या काळात धांदल उडत नाही व कमी मजुरीत काम करता येते. मजुरांची उपलब्धता व त्यातील अडचणी यांचा परिणाम रोपवाटिकेच्या उत्पादनावर व उत्पन्नावर होतो. मजुरीवरील एकूण खर्च 25 टक्के तर व्यवस्थापनाचा खर्च 30 टक्केच्या आत असावा. मजूर व्यवस्थापनात पुढील बाबी महत्वाच्या समजल्या जातात१. गरजेप्रमाणे मजूर कामावर ठेवावेत. कमी मजुरांकडून अधिक काम करवून घेणे तसेच अधिक मजुरांकडून कमी काम करुन घेणे टाळावे.२. बालमजूर, नेहमी आजारी पडणारे मजूर, व्यसनी मजूर, हट्टी मजूर, भांडखोर, चुगलखोर, भुरटे, अनियमित वागणारे अशांना मजूर म्हणून कामावर ठेवणे टाळावे.३. मजुरी वेळेवर व नियमितपणे द्यावी.४. मजुरांना अडी अडचणीत आर्थिक मदत करावी.५. प्रामाणिक मजुरांना जादा केलेल्या कामाचा ओव्हर टाईम अगर वेगळा मोबदला द्यावा.६. मजुरांच्या शैक्षणिक, आरोग्य विषयक, सामाजिक अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करावा.७. रोपवाटिकेतील कामे सुलभ होण्यासाठी काही सुविधा द्याव्यात. उदाहरणार्थ - सावली, पिण्याचे पाणी, मधली सुट्टी, विश्रांती इत्यादी.८. एखाद्या कामात मध्येच बदल करू नये. तसेच एकाच कामावरील मजूरही वारंवार बदलू नयेत.९. मजुरांच्या असहायतेचा गैरफायदा घेऊ नये.१०. मजुरांचाही काही बाबतीत सल्ला घ्यावा. त्यांना विश्वासात घ्यावे. इतर बाबीमुळे होणारे नुकसान मजुरांवर ढकलू नये. मजुरांना मार्गदर्शन करावे, त्यांची क्षमता वाढविण्याचे प्रयत्न करावेत. मजूर विषयक कायद्याचे पालनही करावे.

ही सर्व कामे अथवा या बाबी वरवर जरी सहज व सोप्या वाटतं असल्या तरी त्यांची अंमलबजावणी करणे अवघड व कुशलतेचे काम आहे. हे ज्या रोपवाटिकेत साध्य होते, ती रोपवाटिका निश्चिती शाश्वत फायद्याची ठरते.- डॉ. व्ही. जी. मोरे (सहयोगी प्राध्यापक)- डॉ. व्ही. ए. राजेमहाडिक ( सहाय्यक प्राध्यापक)- प्रविण सरवळे ( पी एच. डी. विध्यार्थी, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीकामगार