New Nursery Business Management Idea : शेती करत असताना अनेक जोडव्यवसाय उत्पन्न वाढीसाठी फायद्याचे ठरतात. ग्रामीण भागातील तरूण शेळीपालन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय, प्रक्रिया उद्योग, खरेदी-विक्री, व्यापार, नर्सरी व्यवसाय, सेवा-सुविधा, वेअरहाऊस, कोल्ड स्टोरेज, कृषी सेवा केंद्र असे व्यवसाय सुरू करतात. पण अनेकदा मुलभूत माहिती नसल्यामुळे अनेक व्यवसाय तोट्यात जातात.
अनेक शेतकरी नर्सरी व्यवसाय सुरू करतात. पण नर्सरीचे व्यवस्थापन नीट न केल्यामुळे अनेक नर्सऱ्या बंद पडल्या असून व्यवसायिक तोट्यात गेले आहेत. त्यासाठी या व्यवसायातील बारीकसारीक गोष्टींची इत्यंभूत माहिती असायला हवी. तर नर्सरी व्यवसाय सुरू करताना कोणत्या गोष्टींच्या व्यवस्थापनाकडे लक्ष दिले पाहिजे त्यासंदर्भात जाणून घेऊयात...
स्थळनर्सरी व्यवसाय सुरू करताना आपण कोणत्या भागांत नर्सरी सुरू करणार आहोत ते महत्त्वाचे आहे. आपल्या भागांत फळझाडे, भाजीपाला रोपे किंवा फुलांची रोपे यापैकी कोणत्या रोपांना मागणी जास्त आहे याचा सारासार विचार करायला हवा. त्याचबरोबर आपला भाग दुष्काळी, जिरायती, बागायती यापैकी कोणता आहे, त्यानुसार या परिसरात कोणत्या झाडांची विक्री चांगली होईल याचा विचार हवा.
झाडांची खरेदीझाडांची खरेदी ही खात्रीशीर जागेवरूनच करावी. जेणेकरून रोपांमध्ये आपली फसवणूक होणार नाही. आपण आपल्या ग्राहकांना खात्रीची रोपे दिली तरच ग्राहकांचा आपल्या व्यवसायावर विश्वास बसेल. तर वेगवेगळ्या वाणाची आणि चांगली रोपे खरेदी करणे आवश्यक आहे. आपल्या नर्सरीमध्ये जास्तीत जास्त वाणे आणि झाडांची संख्या उपलब्ध असेल तर ग्राहकांना आकर्षण निर्माण होऊन खरेदी वाढू शकते.
ग्राहक व विक्री व्यवस्थापनआपल्याकडे एकदा आलेला ग्राहक वारंवार आला पाहिजे याचा विचार व्यवसायिकाने केला पाहिजे. त्यासाठी आपण खात्रीची रोपे ग्राहकांना विक्री केली पाहिजेत. ग्राहकांची मागणी कोणत्या वाणाची आहे, कोणत्या जातीकडे जास्त कल आहे याचा विचार करून नर्सरीमध्ये तो वाण उपलब्ध करून दिला पाहिजे. अनोळखी ग्राहकाला चुकीची माहिती देऊन रोपांची विक्री करणे चुकीचे आहे.
मजूर व्यवस्थापनकुशल कामगार आणि अकुशल कामगारांचा ताळमेळ आपल्याला बसवता आला पाहिजे. कलम करणे, झाडांची योग्य पद्धतीने निगा राखणे, खते-औषधांचे नियोजन करण्यासाठी कुशल मजुरांची आवश्यकता असते. तर इतर कामे करण्यासाठी अकुशल कामगारांची गरज भासते. कामगारांवर जास्त पैसे खर्च करण्याऐवजी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून खर्चाची बचत करायला हवी. ज्यावेळी मजुरांची गरज आहे त्याचवेळी मजुरांना कामावर बोलावले पाहिजे.
झाडे व्यवस्थापनअनेकदा नर्सरीमधील झाडे विक्री होत नाहीत, त्यावेळी झाडांची पिशवी वेळेत बदलणे गरजेचे असते. कारण पिशवी बदलली तर झाडाच्या मुळ्या वाढण्यास मदत होते. अन्यथा झाडांची वाढ खुंटते. पिशवी बदलली तर झाड वाढून आपल्याला किंमतही जास्त मिळू शकते. त्याचबरोबर नर्सरीमध्ये असलेल्या झाडांवर कोणत्याही प्रकारचा रोग येणार नाही याची व्यवस्थिक काळजी घेतली पाहिजे.
तंत्रज्ञानपॉलिहाऊस, फॉगर, सिंचन, पॉवर ट्रीलर अशा तंत्रज्ञानाचा वापर केला तर आपला खर्च वाचतो. त्याचबरोबर कामेही लवकर होतात. मजुरांची अडचण निर्माण झाली तर आपण तंत्रज्ञानाचा आधार घेतला पाहिजे.
ब्रँडिंगआपल्या व्यवसायाची ब्रँडिंग करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा चांगला वापर केला पाहिजे. आपण या माध्यमातून ऑनलाईन ऑर्डरही घेऊ शकतो. तर सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्यवसाय पोहोचवण्यास चांगली मदत होत असते.
सरकारी योजनांचा लाभनर्सरी व्यवसायासाठी सरकारकडून अनुदान दिले जाते, अशा अनुदान किंवा योजनांचा लाभ घेतला तर नर्सरी व्यवसायाला चांगला आधार मिळू शकतो.
दरम्यान, नर्सरी व्यवसाय सुरू करताना वरील गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात.