शेतकऱ्यांना पिकांवर दिसत असलेल्या लक्षणांवरून योग्य निदान करता येत नाही. त्यावेळी बाजारात असलेल्या विविध तज्ञांची मदत घेतली जाते. ज्यात अनेकदा आर्थिक व्यवहार देखील होत असतो. ज्याद्वारे पुढे पिकासाठी योग्य ते उपाय सांगितले जातात.
मात्र अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिकावर दिसणारी बाह्य लक्षणे माहिती असल्यास शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसे निश्चित वाचू शकतो सोबत उत्पादन देखील टिकून राहील. यासाठी आज आपण जाणून घेणार आहोत. विविध अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिकांवर कोणकोणती लक्षणे दिसून येतात. तसेच यावर करावयाचे उपाय.
अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिकावर दिसणारी बाह्य लक्षणे व उपाय
अन्नद्रव्ये | अन्नद्रव्याच्या कमतरतेची विशिष्ट बाह्य लक्षणे | उपाय |
नत्र | प्रथम परिपक्व झालेली पाने पिवळी पडतात. अन्नद्रव्याची कमतरता अधिक असेल तर पाने खालच्या भागापासून वरच्या भागापर्यंत पिवळी दिसतात. मुळाची आणि पिकाची वाढ थांबते. नवीन फूट आणि फुले कमी येतात. | गरजेनुसार नत्रयुक्त रासायनिक खते (युरिया व इतर खते) द्यावीत. |
स्फुरद | पाने गर्द हिरवी आणि जांभळी लांबट होऊन वाढ खुंटते. मुळाची वाढ मंदावते. | गरजेनुसार रासायनिक खते (सिंगल सुपर फॉस्फेट द्यावीत.) |
पालाश | पानाच्या कडा तांबडसर होऊन पानावरही तांबडे व पिवळे ठिपके पडतात, शेंडे गळतात. | पालाशयुक्त रासायनिक (म्युरेट ऑफ पोटॅश किंवा राख) द्यावी. |
गंधक | नवीन येणारी पाने व पालवी पिवळी पडू लागते. तृणधान्य पिके परिपक्व होण्यास उशीर लागतो. द्विदल पिकांच्या मुळावरील नत्रास्थिरीकरण करणाऱ्या गाठीचे प्रमाण कमी होते. | २०-४० कि.ग्रॅ. हेक्टरी गंधक जमिनीतून द्यावे. |
मॅग्नेशियम | प्रथम जुन्या पानाना व नतर नव्या पालवीस पिवळसर रंग येतो. जुन्या पानांच्या शिरामधील भाग पिवळा पडतो व पाने तपकिरी होऊन गळून पडतात. | १०-२५ कि.ग्रॅ. प्रती हेक्टरी मॅग्नेशियम जमिनीतून द्यावे. अथवा शिफारस केल्याप्रमाणे फवारणी करावी. |
लोह | कोवळी अपरिपक्व आणि नव्याने येणाऱ्या पानाच्या शिरामधील बाग पिवळसर होतो. अधिक कमतरता असेल तर पिवळी पाने पांढरी होतात. झाडाची वाढ खुंटते. | ०.५ ते १.० टक्के तीव्रतेच्या हिराकशीच्या द्रावणाची फवारणी द्यावी. |
जस्त | पानाचे आकारमान कमी होऊन शिरामधील भागावर अगोदर तपकिरी रंगाचे ठिपके पडतात, वाढतात आणि पाने पिवळी पडतात. | ०.५ ते १.० टक्के तीव्रतेच्या जस्त सल्फेटच्या द्रावणाची फवारणी करावी |
बोरॉन | अपरिपक्व, कोवळ्या वाढ बिंदूची भर होते. पिकाचे शेंडे आणि कोवळी पाने पांढरट होऊन मरतात. पानावर सुरकुत्या पडून पिवळे चट्टे पडतात. खोडावर भेगा पडून ते ठिसूळ होते. | ५० ग्रॅम बोरॅक्स १०० लिटर पाण्यात विरघळून फवारणी करावी. |
मँगनीज | पानाच्या शिरा हिरव्या व शिरांमधील भाग क्रमाक्रमाने पिवळा होतो व नतंर पांढरट व करडा होतो. पूर्ण पान फिकट पिवळसर दिसते. पानाची वाढ कमी होऊन नंतर गळते. | गरजेनुसार २० ते ३० किलो ग्रॅम मँगनीज सल्फेट प्रति हेक्टरी जमिनीतून द्यावे. |
तांबे | झाडाच्या शेंड्याची वाढ खुंटते. झाडांना डायबॅक रोग होतो. खोडाची वाढ मंदाविते पाने लगेच गळतात. | मोरचुदाच्या ०.४ टक्के तीव्रतेच्या द्रावणाची फवारणी द्यावी. |
मॉलेब्डेनम | पाने पिवळी होऊन त्यावर तपकिरी ठिपके पडतात. पानाच्या मागच्या बाजूने तपकिरी डिंकासारखा द्रव स्त्रवतो. | २५ ते ०.५ किलो ग्रॅम/हेक्टरी सोडियम मॉलिबडेट जमिनीतून द्यावे. |