कोवळी व लुसलुशीत भेंडी लगेच ग्राहकांच्या पसंतीस उतरते. भेंडीचे पिक हे वर्षभर घेतले जाते परंतु उन्हाळी हंगामात चांगली मागणी असते. आपण भेंडीची लागवड कशी करावी याविषयी माहिती पाहणार आहोत.
जमिन व हवामानउष्ण हवामान भेंडी पिकाला चांगले मानवते. हलक्या जमिनीपासून ते काळ्या जमिनीपर्यंत कोणत्याही प्रकारच्या जमिनीत पुरेसे सेंद्रिय पदार्थ असलेल्या जमिनीत भेंडी या पिकाची वाढ चांगल्या प्रकारे होते. त्यातून पाण्याचा निचरा होणे आवश्यक असते.
जाती अधिक उत्पादनासाठी भेंडीच्या कोकण परभणी क्रांती, अर्का अनामिका, अर्का अभय, पंजाब ७, विजया, वर्षा उपहार, परभणी भेंडी, फुले विमुक्ता या सुधारित जातींची लागवड करावी.
लागवड कशी करावीभेंडीची लागवड रब्बी हंगामासाठी जानेवारी, फेब्रुवारीत करावी. उन्हाळ्यासाठी ४५ बाय १२ सेंटिमीटर अंतरावर करावी. त्यासाठी हेक्टरी ८ ते १० किलो बियाणे पुरेसे होते. बी रुजत घालण्यापूर्वी पाण्यात किंवा सायकोसीलच्या (१०० मिली. प्रति लिटर) द्रावणात २४ तास भिजवावे. नंतर बियाणे काढून सावलीत कोरडे करून पेरावे. यामुळे उत्पन्न १० ते १५ टक्के वाढते.
खत व्यवस्थापन भेंडीच्या पिकाला हेक्टरी १५ टन शेणखत, १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व २५ किलो पालाश द्यावे. लागवडीवेळी संपूर्ण स्फुरद, पालाश व एक तृतीयांश नत्र यांची मात्रा द्यावी. उरलेले दोन तृतीयांश नत्र समप्रमाणात लागवडीनंतर ३० ते ६० दिवसांनी द्यावे.
तण व्यवस्थापनदोन ते तीन आठवड्यांनी रोपांची विरळणी करावी. यावेळी खुरपणी करून तण काढावे. साधारणतः दोन ते तीन खुरपण्या कराव्या लागतात. तणनाशकाचा वापर करूनही तणांचे नियंत्रण करता येते. यासाठी बासालिन ३ ते ३.५ मि.ली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे. तणनाशकांची फवारणी पेरणीपूर्वी जमिनीत चांगला ओलावा असताना करावी. फवारणीनंतर सात दिवसांनी भेंडीचे बियाणे पेरावे.
अधिक वाचा: कमी कालावधीचं कमी पाण्यात येणारं उन्हाळी बाजरी पिक; कशी कराल लागवड?
कीड-रोगाचे नियंत्रण - भुरी रोगामुळे पानांच्या वरच्या व खालच्या बाजूस पांढरी पावडर आढळते. प्रमाण वाढल्यास पाने करपतात. त्यावर हेक्झेंकोनझोल ०.५ मि.ली प्रति लिटर पाण्यात मिसळून १० ते १५ दिवसांनी फवारावे.- पानांवरील ठिपके या रोगामुळे पानांवर तपकिरी रंगाचे वेडेवाकडे ठिपके येतात व पाने गळून पडतात. त्यावर कार्बेन्डॅझिम १ ग्रॅम प्रति लिटर किंवा क्लोरोथेलोनिल (२ ग्रॅम प्रति लिटर) पाण्यातून फवारणी करावी.- शेंडा व फळे पोखरणारी अळी, मावा या किडींमुळे पिकाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य उपाययोजना करावी.
काढणीभेंडीची काढणी फळे कोवळी असताना करावी. झाडास फुले येण्यास सुरुवात झाल्यापासून सहा ते सात दिवसांनी फळे काढणीसाठी तयार होतात. जाती परत्वे हेक्टरी १०० ते १२० क्विंटल उत्पादन मिळत आहे.
बदलत्या हवामानामुळे भेंडीवर किडी व रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे त्याचे नियंत्रण वेळीच करण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. पाण्याची उपलब्धता असल्यास हे पीक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. सुधारित वाणामुळे भेंडीचे चांगले उत्पन्न मिळत आहे.