भारतातून संत्र्याची निर्यात फार नगण्य होते. नागपूर संत्रा किंवा त्यासारखे लवकर साल निघणाऱ्या फळांची निर्यात कमी आहे व त्याची कारणे अनेक आहेत.
उदाहरणार्थ नागपुरी संत्राची चव व स्वाद, आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रियता न मिळणे, संत्रा पिकाचे कमी उत्पादन, उत्पादनाचा व वाहतुकीचा जादा खर्च फळांचा निर्यातयोग्य दर्जा, योग्य पॅकिंग व इतर निर्यातयोग्य बाबींची अपुरी माहिती, अति जलद वाहतूक उपलब्ध न होणे इ.
जगातील संत्रा निर्यातदार देशांमध्ये भारताचा वाटा केवळ ०.१ टक्के इतकाच आहे. स्पेन या देशाचे संत्रा उत्पादन हे भारतातील संत्रा उत्पादनाइतकेच असले तरी त्यांचा संत्रा निर्यातीमधील वाटा ३८.१ टक्के इतका आहे.
महाराष्ट्रामध्ये संत्र्याचे उत्पादन जरी मोठ्या प्रमाणावर घेण्यात येत असले तरी, नागपूर संत्रा वाणाच्या फळांना निर्यातक्षम गुणवत्ता नसल्यामुळे महाराष्ट्रातून संत्र्याची निर्यात केली जात नाही. भारतातून प्रामुख्याने संकरित जातीच्या संत्र्याची निर्यात केली जाते.
संत्र्याची आयात करणाऱ्या देशांमध्ये बांग्लादेश, मॉरिशियस, श्रीलंका, चीन, हाँगकाँग, सिंगापूर, जपान, मलेशिया व सौदी अरेबिया हे देश भारताच्या शेजारील देश असल्यामुळे सदर देशांना भारतातून संत्र्याची निर्यात करणे किफायतशीर होऊ शकते.
सद्यस्थितीत इंग्लंड, अरब व दक्षिण-पूर्व आशियाई इ. देशांमध्येसुद्धा संत्र्याची भारतामधून काही प्रमाणात निर्यात करण्यात येत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला आणि संत्रा बागायतदार संघ यांच्या संयुक्त माध्यमाने नागपूर संत्र्याला भौगोलिक निर्देशांक प्राप्त झालेला आहे.
त्या भौगोलिक निर्देशांकाचा, संत्रा बागायतदारांनी निर्यातीसाठी उपयोग केल्यास आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये नागपूर संत्र्याला चांगला भाव मिळण्यासाठी सहाय्य होऊ शकते.
युरोपियन बाजारपेठेत संत्र्याच्या निर्यातीची मानके
१) रसाचे प्रमाण : कमीत कमी ३३ ते ४० टक्के.
२) फळांचा रंग : फळांच्या १/३ ते २/३ भाग पिवळट नारंगी किंवा पूर्ण भाग नारंगी असणे आवश्यक आहे.
३) फळांचा व्यास : ५० ते ५५ मिलिमीटर व्यास. कमीत कमी ४५ मिलिमीटर.
४) फळातील बिया : बिया नसलेल्या फळांना प्राधान्य.
५) फळांचा आकार : गोल, मान किंवा चोच नसलेले.
६) फळांची साल : चोपड्या सालीचे फळे.
७) एकूण विद्राव्य घटक : १० ते १२ टक्के.
संत्रा निर्यातीसाठी उपाययोजना
१) नागपुरी संत्रा व्यतिरिक्त निर्यात योग्य उत्पादन देणाऱ्या इतर जातींची लागवड करणे.
२) संत्रा उत्पादनाच्या बाबतीत त्या त्या परिसरामध्ये सहकारी संस्थांची स्थापना करणे आणि सदर सहकारी संस्थांची एक शिखर संस्था तयार करणे, जेणेकरून व्यापाऱ्यांच्या मक्तेदारीला आळा बसेल.
३) संत्रा उत्पादनाच्या परिसरामध्ये ग्रेडिंग, पेंकिंग हाऊसची तसेच शीतगृह सुविधेची उभारणी करणे.
४) संत्रा उत्पादकांना निर्यातयोग्य संत्रा उत्पादनाचे, काढणी आणि हाताळणी याबाबतचे मार्गदर्शन करण्याचे कामी संबंधित परिसरामध्ये तज्ञांची नियुक्ती करणे.
५) अपेडा, नवी दिल्ली यांचेकडून ज्याप्रमाणे आंब्याच्या समुद्रमार्ग निर्यातीसाठी सहकार्य केले जाते, त्याचप्रमाणे संत्र्याच्या समुद्रमार्गे निर्यातीसाठीही मदत घेऊन संत्र्याची निर्यात करणे. त्याचबरोबर संत्रा निर्यातीसाठी अर्थसहाय्य प्राप्त करून घेणे.
६) संत्रा निर्यातीच्या उपक्रमांमध्ये त्या त्या परिसरातील सक्षम कृषी उत्पन्न बाजार समित्यांना सामावून घेणे.
७) संत्रा निर्यातीसाठी राज्य शासनाकडून अर्थसहाय्य प्राप्त करून घेणे.
८) केंद्र शासनाने संत्रा निर्यातीकरिता आणि प्रक्रियेकरिता महाराष्ट्रामध्ये अमरावती आणि नागपूर हे जिल्हे निर्यात क्षेत्र म्हणून जाहीर केलेले असल्यामुळे कृषी पणन मंडळामार्फत संत्रा निर्यातीचा उपक्रम हाती घेणे.
९) भारतामध्ये पंजाब राज्यात किंनो या जातीच्या संत्र्याची लागवड यशस्वी झालेली असून या संत्र्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देखील मागणी आहे. महाराष्ट्रामध्ये देखील या किंवा अशा जातींच्या लागवडीचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.
अधिक वाचा: Amba Mohor Sanrakshan : आंबा पिकातील रसशोषक किडी व रोगांचे नियंत्रण करण्यासाठी कशा घ्याल फवारण्या?