Join us

Organic Carbon : जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविण्याचे सोपे उपाय; वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 16:53 IST

सेंद्रिय कर्बाचे पिकाच्या दृष्टीने फायदे सेंद्रिय कर्ब जास्त असलेल्या जमिनीत उपयुक्त जिवाणूंची संख्या अधिक असते. परिणामी पिकांना अन्नद्रव्यांची उपलब्धता अधिक होते.

सेंद्रिय कर्बाचे पिकाच्या दृष्टीने फायदे सेंद्रिय कर्ब जास्त असलेल्या जमिनीत उपयुक्त जिवाणूंची संख्या अधिक असते. परिणामी पिकांना अन्नद्रव्यांची उपलब्धता अधिक होते.

अशा जमिनीत सेंद्रिय पदार्थ अधिक असल्यामुळे जमिनीची भौतिक सुपीकताही लक्षणीय प्रमाणात सुधारते. जमिनीची जलधारणाशक्ती, पोत सुधारतो, त्यामुळे क्षारांचा निचरा होण्यास मदत होते.

जमिनीत हवा खेळती राहिल्याने मुळांची निरोगी, जोमदार वाढ होते. जमिनीचा सामू अधिक असल्यास तो कमी होण्यास मदत होते. जीवाणूद्वारे सेंद्रिय आम्ले सोडली जातात. 

या आम्लांमुळे रासायनिक अभिक्रिया वाढून स्थिर झालेली सेंद्रिय व रासायनिक अन्नद्रव्येही पिकांना उपलब्ध होऊ लागतात म्हणून सेंद्रिय कर्बाची पातळी वाढवणे जमिनीच्या जैविक, भौतिक आणि रासायनिक सुपीकतेसाठी महत्त्वाचे ठरते.

सेंद्रिय कर्ब वाढवण्याच्या उपाययोजना

  • जमिनीत सेंद्रिय खतांचा पुरेसा पुरवठा करणे हा सेंद्रिय कर्ब वाढविण्याचा रामबाण उपाय आहे. उदा. शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, कोंबडी खत, प्रेसमड केक, हिरवळीची पिके, अखाद्य पेंडी (निंबोळी पेंड, करंज पेंड, सरकी पेंड इत्यादी)
  • पीक फेरपालट करताना कडधान्य पिकांची लागवड करावी.
  • शिफारशीप्रमाणे दरवर्षी सेंद्रिय खत शेवटच्या कुळवाच्या पाळीआधी जमिनीत मिसळावे.
  • क्षारपड जमिनीत धैंचा किंवा ताग जमिनीत पेरून दीड महिन्यात गाडावा.
  • उभ्या पिकांत निंबोळी पेंडीचा वापर करावा.
  • पीक अवशेषांचा आच्छादन म्हणून वापर करावा. उदा. खोडवा उसाचे पाचटाचे नियोजन करावे आंतरपीक पद्धतीमध्ये कडधान्य पिकांचा समावेश करावा.
  • शेतीची पशुसंगोपनासोबत सांगड घालावी.
  • एक सेंद्रिय खत उपलब्ध नसेल तर दुसऱ्या सेंद्रिय खतांचाच पर्याय योग्य ठरतो. उदा. उसाचे पाचट न जाळता शेतातच कुजवणे.
  • पिकांची फेरपालट करून नत्र स्थिरीकरण करणारी पिके घेणे जमिनीस आवश्यक विश्रांती दिल्यावरही सेंद्रिय कर्ब टिकण्यास मदत होते.
  • पिकांसाठी रासायनिक, जैविक आणि सेंद्रिय खतांचा संतुलित वापर करावा.
  • पिकांच्या गरजेनुसारच पाण्याचा वापर करावा.
  • निसर्गातील सेंद्रिय पदार्थ हे जमिनीच्या दृष्टीने मोलाचे असतात. उदा. शेतातील काडीकचरा, पिकाचे अवशेष इत्यादी पासून सेंद्रिय खत करून वापर करावा हिरवळीच्या पिकांचा (उदा. ताग, धैंचा, चवळी इत्यादी) सेंद्रिय कर्ब वाढण्यास खूप फायदा होतो. पीक पद्धतीत या पिकांचा आवर्जून समावेश करावा. योग्य वेळी ती जमिनीत गाडावीत.
  • जमिनीत जिवामृत, व्हर्मिवॉश यांचाही वापर करावा.
  • पीक पद्धतीमध्ये एकच पीक सातत्याने घेऊ नये. त्यात वेळोवेळी बदल करावेत.
  • आपण पिकाच्या अधिक उत्पादनक्षम जाती निवडत असल्यामुळे त्यांच्या पोषकतेचाही व्यवस्थित विचार करावा. सेंद्रिय खतात सर्व प्रकारची अन्नद्रव्ये अल्प प्रमाणात असतात. या व्यतिरिक्त वेगवेगळी विकरे (एन्झाइम्स), संप्रेरके (हार्मोन्स) आणि जीवनसत्त्वे (व्हिटॅमिन्स) उपलब्ध असतात.  यामुळे उत्पादनाचा दर्जा (उदा. गोडी, रंग इत्यादी) आणि रोग, कीड प्रतिकारकशक्ती वाढते.
  • सेंद्रिय कर्ब जमिनीच्या वरच्या थरात अधिक असून, या थराची धूप होणार नाही याची काळजी घ्यावी.

अशा प्रकारे जमीन आणि पीक व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय कर्ब वाढीचा गांभीर्याने विचार करून आपण सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवू शकतो.

अधिक वाचा: Chunkhadi Jamin : चुनखडीयुक्त जमिनीची सुधारणा कशी कराल? करा हे सोपे उपाय

टॅग्स :शेतीपीकपीक व्यवस्थापनलागवड, मशागतपेरणीशेतकरीखतेसेंद्रिय खतसेंद्रिय शेती