आपल्या दैनंदिन आहारामध्ये भाज्यांचे महत्त्व फार आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या दारी म्हणजेच जागेच्या उपलब्धतेनुसार अंगणात, शेतात, गॅलरीत, गच्चीवर भाजीपाल्याची परसबाग असणे गरजेचे आहे.
यामुळे आपणास भाजीपाल्याची कमतरता भासणार नाही व घरच्या घरी पौष्टिक, विषमुक्त भाजीपाला उपलब्ध होईल. हा भाजीपाला आपण गच्चीवर कुंडीत, टबमध्ये, ग्रोबॅग व बकेटमध्ये लावू शकतो.
आहारतज्ज्ञांच्या मते एका प्रोढाला आहारात समतोलपणा राखण्यासाठी दररोज ३०० ग्रॅम भाज्या व १०० ग्रॅम फळांची दैनंदिन गरज असते. परंतु आपल्या देशात दैनंदिन आहारात या प्रमाणात भाज्यांचे सेवन होत नाही.
प्रत्येक कुटुंबाने समतोल आहार व त्यातील पोषक तत्त्वे यांचे महत्त्व समजून घेणे गरजेचे आहे. आहारात प्रत्येक व्यक्तीला व्यक्तीची गरज, शरीर रचना व कार्ये हे लक्षात घेऊन पोषक तत्त्वांची उपलब्धता होते.
अन्नातील सर्व घटक योग्य प्रमाणात घेतले असता शरीराचे सर्व कार्य सुरळीत चालते, त्यालाच पोषकतत्त्वे असे म्हणतात. हीच गरज लक्षात घेऊन कृषी विज्ञान केंद्र, कांचनपूर, सांगलीने पोषणबाग तयार केली आहे.
या पोषणबागेच्या आकृतीमध्ये २३ वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला घेता येतो. ही पोषणबागेची आकृती भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली आहे.
पोषणबागेचे फायदे
• घरच्या घरी ताज्या पौष्टिक, विषमुक्त भाजीपाल्याची उपलब्धता होईल.
• नियमित सकस भाजीपाला खाल्ल्यामुळे पोषक तत्त्वांच्या अभावामुळे होणारे आजार कमी होतील.
• भाज्यांवर होणारा खर्च कमी होईल.
हंगामानुसार भाज्यांची निवड
• खरीप हंगाम (जून ते सप्टेंबर) : दुधी भोपळा, मुळा, पालक, राजगिरा, वांगी, टोमॅटो, फुलकोबी, इत्यादी.
• रब्बी हंगाम (ऑक्टोबर ते जानेवारी) : टोमॅटो, पालक, मेथी, कोथिंबीर, शेपू, वांगी, मिरची, फुलकोबी, पत्ताकोबी, मुळा, गाजर, बीट, कांदा, लसूण, बटाटा, दोडका, कारली, दुधी भोपळा इत्यादी.
• उन्हाळी हंगाम (फेब्रुवारी ते मे) : भेंडी, चवळी, टोमॅटो, वांगी, मिरची, भोपळा, कारली, काकडी, पालक इत्यादी.
लागवडीपूर्वी घ्यावयाची काळजी
• पोषणबाग कुठे करावयाची आहे त्यानुसार तयारी करावी लागेल. जसे की गच्चीवर लावायचे असल्यास कुंडी ग्रो बॅग, टब व ट्रे इत्यादी.
• लागवडीपूर्वी ३ गुंठा जमिनी करिता एक किलो ट्रायकोडर्मा व १५ किलो निंबोळी पेंड मिसळून द्यावे.
• कुंड्यांतील मातीतून पाण्याचा निचरा होण्यासाठी तळाशी छिद्र असणे आवश्यक आहे.
• ३ भाग माती व एक भाग शेणखत मिसळून कुंड्या भराव्यात.
• कुंड्या भरताना सर्वात खाली विटांचे तुकडे, नारळाच्या शेंड्या, पालापाचोळा व शेणखत मिश्रित माती असे भरावे.
लागवडीनंतर घ्यावयाची काळजी
• पिकास गरजेनुसार पाण्याचा पुरवठा करावा, पाण्यासाठी झारीचा वापर करून हळूवारपणे पाणी द्यावे.
• पाणी शक्यतो सायंकाळी द्यावे, जेणेकरून रात्रभर बाष्पीभवन होणार नाही.
• रोग व किडीपासून बचावासाठी गोमूत्र, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, तंबाखू पाणी इत्यादीचा वापर दर ७ दिवसांच्या अंतराने ५ ग्रॅम/मि.लि. करावा.
सचिन कोल्हे
शास्त्रज्ञ, कृषी विस्तार
अधिक वाचा: जमिनीत रसायनांचे अंश वाढू नये यासाठी कसा कराल तणनाशकांचा वापर