महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव सन १९३२ पासून कार्यरत आहे. या केंद्राने दिलेल्या को ८६०३२ आणि फुले २६५ या वाणाखाली राज्यात ८५ ते ९० टक्के क्षेत्र आहे.
यावरून साखर कारखानदारीच्या विकासात या विद्यापीठाचे आणि पाडेगाव केंद्राचे योगदान दिसून येत आहे. ऊसाचा अधिक ऊस व साखर उत्पादन देणारा व रोग आणि किडींना कमी बळी पडणारा नवीन वाण विकसित करणे हा या केंद्राचा मुख्य उद्देश आहे.
सन २०२१ मध्ये फुले ११०८२ (कोएम ११०८२) हा ऊसाचा लवकर पक्व होणारा वाण को ८६००२ या वाणाच्या तुऱ्यापासून निवड पध्दतीने मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव (जि. सातारा) या केंद्राने निर्माण केलेला आहे.
परभणी कृषि विद्यापीठात दि. २४ ते ३० डिसेंबर, २०२१ मध्ये पार पडलेल्या ४९ व्या संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीत फुले ११०८२ या वाणाची सुरु आणि पूर्व हंगामात लागवडीसाठी शिफारस केलेली आहे.
नवी दिल्ली येथे दि. २६ ऑक्टोबर, २०२२ रोजी झालेल्या केंद्रीय वाण प्रसार समितीच्या ८९ बैठकीत फुले ११०८२ (कोएम ११०८२) हा वाण महाराष्ट्रात लागवडीसाठी अधिसूचित करण्यात आलेला आहे.
फुले ११०८२ हा लवकर पक्व होणारा वाण कोसी ६७१ पेक्षा ऊस आणि साखर उत्पादन अधिक देतो. ऊसातील व्यापारी शर्करा प्रमाण हे कोसी ६७१ पेक्षा किंबहुना बरोबरीत असल्याने माहे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये साखर कारखान्याचा साखर उतारा वाढविण्यासाठी हा वाण फायदेशीर ठरणार आहे.
फुले ११०८२ (कोएम ११०८२) वाणाची वैशिष्ट्ये१) फुले ११०८२ या वाणाचा वाढीचा वेग जास्त असून फुटव्यांची संख्या मर्यादित आहे.२) पाने मध्यम रुंद, गर्द हिरवी, शेंडयांकडून जमिनीकडे वाकलेली असतात.३) लवकर पक्व होणारा वाण असल्याने तुरा येतो.४) ऊस मध्यम जाडीचा, कांड्या एकमेकास तिरकस जोडलेल्या असून ऊस लोळण्याचे प्रमाण कमी आहे.५) डोळा गोल, लहान आकाराचा, डोळ्याचे पुढे खाच नाही.६) पाचटाचे बाहेरील कांडयाचा रंग हिरवट जांभळा, पाचटाचे आतील कांड्याचा रंग पिवळसर हिरवा असतो.७) ऊसाची जाडी, उंची, कांड्यांची लांबी जास्त असल्याने, सरासरी वजन जास्त मिळते.८) या वाणाचा जेठा कोंब काढल्यास फुटव्यांची संख्या भरपूर मिळते.९) या वाणाची मुळे जमिनीत खोलवर जात असून, मुळांचा पसारा अधिक असल्याने पाण्याचा ताण सहन करणारा हा वाण असून, ऊस लोळण्याचे प्रमाण नगण्य आहे.१०) या वाणाच्या वाढ्यावर कुस नसल्याने वाढ्याचा उपयोग जनावरांना चाऱ्यासाठी होतो.११) फुले ११०८२ हा वाण चाबूक काणी व पाने पिवळी पडणाऱ्या रोगास प्रतिकारक असून मर आणि लालकूज या रोगांना मध्यम प्रतिकारक आहे.१२) खोड किड, कांडी किड आणि शेंडे किडीस कमी प्रमाणात बळी पडते.१३) कारखान्याच्या गाळपाच्या सुरूवातीस ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये हा वाण गाळपास घेतल्यास साखरेचा उतारा वाढण्यास मदत होईल.१४) ऊसाचा लवकर पक्व होणारा वाण फुले ११०८२ (कोएम ११०८२) महाराष्ट्र राज्यात सुरू आणि पूर्वहंगामात लागवडीस शिफारस करण्यात आली आहे.
अधिक वाचा: Shet Rasta Kayda : शेतात जाण्याच्या रस्त्यावर अतिक्रमण झालंय यासाठी कुठे कराल अर्ज?