मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रातून २०२३ मध्ये अखिल भारतीय ऊस समन्वयीत योजनेच्या द्वीपकल्पीय विभागातून महाराष्ट्रासह इतर सहा राज्यांसाठी फुले ऊस १३००७ ही जात प्रसारित करण्यात आली.
या जातीची निर्मिती फुले २६५ आणि कोएम ०२५४ या जातीच्या संकरातून करण्यात आली आहे. फुले ऊस १३००७ ही जात ऊस व साखर उत्पादनात को ८६०३२ या जातीपेक्षा सरस असून सुरू, पूर्व आणि आडसाली या तिन्हीही हंगामासाठी उपयुक्त आहे.
या जातीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता. याशिवाय क्षारयुक्त जमिनीत या जातीची चांगली उगवण होत असून, उत्पादनक्षमता देखील चांगली आहे. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रामध्ये पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता तपासणीचा अभ्यास करण्यात आला.
यामध्ये एप्रिल, मे, जून या काळात देण्यात येणाऱ्या पाण्याच्या पाळ्या थांबविण्यात आल्या होत्या. त्यानंतर नियमित पाणी देऊन निष्कर्ष तपासले असता नियमित पाण्यापेक्षा उत्पादनात केवळ १६ टक्के आणि साखर उत्पादनात १३.९८ टक्के घट आली.
भारतीय ऊस संशोधन संस्थेकडून नवीन जातीची शिफारस महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांत लागवडीसाठी करण्यात आली आहे.
वैशिष्ट्ये▪️कांड्याचा रंग हिरवा, पाचट निघाल्यानंतर रंग पिवळसर हिरवा असतो.▪️उंच वाढणारी, शंक्वाकृती नागमोडी कांडी.▪️मध्यम आकाराचा अंडाकृती डोळा, डोळ्यापुढे खाच नाही.▪️मध्यम रुंदीची सरळ वाढणारी गर्द हिरवी पाने.▪️पानावर कूस नाही, पाचट सहज निघते.▪️मध्यम जाडीचा दशी न पडणारा ऊस.▪️संख्या जास्त, चांगला खोडवा.▪️लालकुज, काणी, मर, पिवळा पानांच्या रोगास प्रतिकारक्षम.▪️तांबेरा, तपकिरी ठिपके, पोक्का बोइंग रोगांना प्रतिकारक.▪️खोड कीड, कांडी कीड व लोकरी मावा किडींना कमी बळी पडणारी जात.▪️तुरा उशीरा व कमी प्रमाणात येतो.
अधिक वाचा: Phule Sugarcane 11082 : आला हा ऊसाचा लवकर पक्व होणार वाण वाचा सविस्तर