हवामानातील बदलाचा परिणाम पिकाच्या उत्पादकतेवर होत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी एक रुपया भरून पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याची संधी शासनाने उपलब्ध करून दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील भात, नागली या दोन पिकांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे.
पूर्वी पीक विम्याच्या हप्त्याची रक्कम जास्त असल्याने शेतकरी विमा योजनेत सहभागी होण्यासाठी सहसा तयार होत नसत. मात्र, यावर्षी एक रुपयात पीक विमा काढून मिळणार आहे. भातासाठी ५० हजार तर नागलीसाठी २० हजार विमा संरक्षित रक्कम निश्चित करण्यात आली आहे. सध्या पेरणीची कामे पूर्ण झाली असून, लागवड करण्यात येणाऱ्या क्षेत्राची पूर्व मशागत म्हणून नांगरणीची कामे सुरू आहेत. पाऊस चांगला पडत असून उघडीपही पडत असल्याने रोपांच्या वाढीसाठी पोषक वातावरण असल्याचे सांगण्यात येत आहे. योजनेतील सहभागासाठी दि. १५ जुलै अंतिम मुदत असल्याने अधिकाधिक शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.
पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्याशिवाय जवळच्या महाईसेवा केंद्र, सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार या ठिकाणी विमा अर्ज भरून नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी सातबारा, आठ अ, पीक पेरा, आधार कार्ड, बॅंक पासबुक ही कागदपत्रे आवश्यक आहेत.
एक रुपया भरा अन् विमा मिळवा सन २०२३ पासून पुढील तीन वर्षांसाठी अर्थात २०२५-२६ पर्यंत राज्य शासनाने सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी हिश्शाचा भार शेतकऱ्यांवर न ठेवता राज्य शासनातर्फे भरण्यात येणार आहे. प्रति हेक्टरी विमा रक्कम शेतकऱ्यांनी एक रुपया भरायचा आहे. उर्वरित फरकाची रक्कम शासन अदा करणार आहे.
कोणत्या पिकाचा किती पेरा अपेक्षित
- भात - ६८५५०
- नागली - १०७३५
- तृणधान्य - ४४०
- कडधान्य - ४९०
- गळीतधान्य ६५
- एकूण ८०३९०
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना एक रुपया भरून पीक विमा पोर्टलवर नोंदणी करता येत आहे. शेतकरी हिश्श्याची पीकनिहाय प्रति हेक्टरी विमा हप्ता एक रुपया वजा जाता उर्वरित फरकाची रक्कम राज्य शासन भरणार आहे. अंतिम मुदत दि. १५ जुलै असून शेतकऱ्यांनी नोंदणी करावी. - जालिंदर पागारे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी रत्नागिरी