फळझाडांच्या यशस्वी लागवडीसाठी निरनिराळ्या भागाकरिता विशिष्ट फळ पिकांची व जमिनीची निवड या दोन बाबींना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. तसेच फळझाडांची लागवड करतांना जमीन ,हवामान, व पाणीपुरवठा यावर विशेष लक्ष देणे देखील गरजेचे आहे.
फळबागेसाठी जमिनीची निवड
फळबागेसाठी जमीन मध्यम प्रतीची, पोयट्याची, पाण्याचा उत्तम निचरा होणारी, जमीन चांगली समजली जाते. हलक्या जमिनीत अंजीर, पेरू, डाळिंब, सिताफळ, बोर,द्राक्ष, कागदी लिंबू, जांभूळ ही फळ पिके येतात. मध्यम जमिनीत चिकू आंबा ,संत्री, मोसंबी, काजू, ही पिके येतात. तर भारी जमिनीत केळी हे फळ पिक येते.
खड्डा खोदणे व भरणे
फळबागेच्या लागवडीची पद्धत व झाडांमधील अंतर निश्चित केल्यावर खड्डे खोदणे व भरणे महत्त्वाचे आहे. खड्ड्याचा आकार हा जमिनीचा प्रकार त्याचा एकूण होणारा विस्तार यावर अवलंबून असते. सर्वसाधारणपणे मोठ्या आकाराचे खड्डे हलक्या जमिनीत व मोठ्या विस्ताराच्या झाडासाठी घ्यावेत. उदा. आंबा, चिकू. तसेच लहान विस्ताराच्या बुटक्या फळ झाडांसाठी लहान आकाराचे खड्डे घ्यावेत.
द्राक्ष ,पपई ,डाळिंब पिकाकरिता ६० बाय ६० बाय ६० सें.मी., एक बाय एक बाय एक मीटर घ्यावेत. खड्डा खोदताना जमिनीचा वरचा पृष्ठभाग चांगला असेल तर पृष्ठभागावरील ४५ से. मी माती वेगळी काढून ठेवावी. खड्डे खोदण्याचे काम पूर्ण झाल्यावर तीन आठवडे व एक महिना तापू द्यावे.
उन्हातील उष्णतेमुळे त्यातील रोगजंतूंचा नाश होईल. खड्डे भरताना पृष्ठ भागाची माती अधिक चांगले कुजलेले कंपोस्ट खत आणि शेण खत अधिक एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट अधिक ५० ग्रॅम १० टक्के कर्बरिल पावडर या मिश्रणांनी खड्डे जमिनीच्या पाच ते सात सेंटीमीटर उंच भरून बाजूने आळे करून घ्यावेत. खड्डे भरल्यानंतर दोन-तीन चांगले पाऊस झाल्यानंतर जून जुलै महिन्यात रोपांची व कलमांची लागवड करावी.
योग्य जातींची निवड
कोणत्याही फळ झाडांची व्यापारी दृष्टिकोनातून लागवडी करायची झाल्यास त्या फळ पिकांची उत्पादन क्षमता व प्रत उत्तम असणे आवश्यक आहे. यासाठी जातींची निवड महत्त्वाची ठरते. कृषी विद्यापीठाने शिफारशीत केलेल्या चांगल्या जातींची निवड खात्रीशीर व मान्यता प्राप्त रोपवाटिकेतून करावी.
फळझाड लागवडीची योग्य वेळ
फळझाडांची लागवड पावसाळा सुरू झाल्यानंतर एक व दोन पाऊस होऊन गेल्यानंतर जून व जुलै महिन्यात करणे हितकारक ठरते. झाडे किंवा रोपे खड्ड्यात लावताना खड्ड्याच्या बरोबर मध्यातील एक चौरस फूट माती बाजूला काढून रोप मूळ च्या खोली इतके खोल लावावे. मूळया दुमडणार नाहीत हे पाहा वे.
बाजूने माती सारून ती दाबून घ्यावी. माती सैल राहू देऊ नये. ताबडतोब रोपास पाणी द्यावे. आधारासाठी पश्चिम बाजूस सहा इंच अंतरावर चार ते पाच फूट उंच बांबूजी काठी रोवून त्यास रोपे किंवा कलमे बांधावेत्यास रोपे किंवा कलमे बांधावे.
फळबागेचे संरक्षण
बागेचे वारा, पावसाळी वादळी वारे, आणि जनावरे यापासून संरक्षण करण्यासाठी बागे भोवती काटेरी झुडपांचे कुंपण करावे. बागेचे उष्ण वारे व थंडीपासून व वादळापासून संरक्षण करण्यासाठी बागेच्या पश्चिम दक्षिण बाजूने दोन दोन अगर तीन-तीन फुटावर उंच वाढणारी झाडे लावून ताटी करावी. यासाठी निलगिरी, शेवरी इत्यादी झाडांचा उपयोग होतो.
फळबागेची पहिल्या वर्षाची काळजी
पहिल्या वर्षी बागेची झपाट्याने वाढ व्हावी म्हणून झाडाची आळ याची वरचेवर भांगलनी करून तनमुक्त ठेवावे. नियमित योग्य इतके पाणी द्यावे. नत्रयुक्त खताची योग्य वेळी मात्रा द्यावी. तसेच झाड निरोगी ठेवावे.
लेखक
प्रा. संजय बाबासाहेब बडे
सहाय्यक प्राध्यापक, कृषी विद्या विभाग, दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय, दहेगाव ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर