कोकणात डोंगराळ प्रदेशामुळे अपधावेचा तीव्र वेग, जमिनीची होणारी प्रचंड धूप, प्रदूषण यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास वेगाने होत आहे. त्याचबरोबर येथील जलस्रोतही वेगाने लोप पावत आहेत किंवा अपुरे पडत आहेत. यासाठी पर्याय म्हणून नवीन व विकेंद्रित जलस्रोत शेततळ्याच्या स्वरूपात निर्माण करणे आणि येथील मातीच्या गुणवैशिष्ट्यांमुळे शेततळ्यात साठविलेल्या पाण्याच्या साहाय्याने भात पिकांना संरक्षित सिंचन व फळबाग, भाजीपाला यासाठी रब्बी सिंचनाची सोय, तसेच मत्स्यसंवर्धन करणे शक्य आहे. त्यामुळे अस्तरीत शेततळे हे कोकणासाठी वरदान ठरत आहे.
तळे कसे खोदावे?अस्तरीत शेततळे खोदताना बाजूचा उतार हा सर्वसाधारण १:१ ते २:१ असावा. जर मातीचा धर कडक असेल तर अशा ठिकाणी १:१ किंवा ०.५:१ उतार ठेवता येतो. तळे खोदून झाल्यानंतर तळ्याच्या चारही उताराच्या बाजूंनी व तळातील दगडी, मोठी खेड (ढेकळे) उचलून घ्यावी. फावड्यांनी माती समपातळीत करावी. तळ व चारही बाजूस सहा इंचाचा भाताचा पेंढा किंवा गवताचे आच्छादन द्यावे. गवतात किंवा पेंढ्यात काटे किंवा काडीकचरा नसावा. सिलपॉलीन आच्छादन घालण्यापूर्वी चारही बाजूस माथ्यावर ३० सेंटिमीटर रुंद व ३० सेंटिमीटर खोल चर खोदावेत. चर खोदताना माती आतल्या बाजूला टाकावी. त्यावरती गवत किंवा भाताचा पेंढा घालावा. सिलपॉलीन तळ्याच्या मध्यभागी ठेवून त्याच्या घड्या उकलाव्या. प्रथम लांबीस सरळ करून नंतर एका बाजूस उकल करत जावे.
तळ्याचे अस्तरीकरण कसे करावे?सिलपॉलीनचे आच्छादन करीत असताना कमी घड्या आच्छादलेल्या भागावर राहणार नाहीत अशा प्रकारे व्यवस्थित खेचून किंवा आवळून घ्यावे. वरच्या बाजूला खोदलेल्या चरीमध्ये सिलपॉलीन टाकून मातीने व्यवस्थित झाकावे. एक हेक्टर भात लागवडीच्या संरक्षित सिंचनासाठी कमीत कमी १००० घनमीटर आकारमान पाणी साठवण आणि इतर रब्बी पिकांसाठी एक हेक्टर करिता १००० घन मीटर पाणी साठवण करावी. सिलपॉलीन किंवा एचडीपीसी शीट आपल्याला हव्या त्या आकाराची, वेगवेगळ्या जाडीत बाजारात उपलब्ध आहे. तळ्याच्या अस्तरीकरणासाठी २०० ते २५० ग्रॅम प्रति चौरस मीटर सिलपॉलीन वापरतात. तिचे आयुष्य ३ ते पाच वर्षे आहे. बाहेरील वस्तू किंवा जनावरांपासून तळे सुरक्षित ठेवले तर त्याचे आयुष्यमान वाढते.
पाण्याचा वापरअस्तरीत शेततळे तयार केल्यानंतर शेतकऱ्याच्या शेतावर स्वतःचा जलस्रोत निर्माण होऊ शकतो. या शेततळ्यात साठविलेल्या पाण्याचा वापर खरीप हंगामात पावसाच्या उघडिपीच्या कालावधीत संरक्षित सिंचनासाठी होऊ शकतो. तसेच या पाण्याचा वापर रब्बी व उन्हाळी हंगामात भाजीपाला व इतर पिके घेण्यासाठी होऊ शकतो. भात पिकाव्यतिरिक्त इतर सर्व पिकांसाठी तुषार व ठिबक सिंचनाचा वापर त्या पिकासाठीच्या शिफारशीप्रमाणे करावा. शेततळ्यात साठविलेल्या पाण्यात मिश्र मत्स्यसंवर्धन करणे शक्य आहे. रोहू, कटला या प्रकारच्या माशांचे संवर्धन करता येते.