मागील १५ दिवसांपासून सततच्या रिमझिम पडणाऱ्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी ऊस शेतात पाणी साचल्याने पिकाच्या सभोवताली सापेक्ष आर्द्रता वाढून तापमान कमी झालेले आहे. अशा परिस्थितीत ऊस पिकामध्ये पोक्का बोइंग रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याचे आढळून आले आहे.
प्रादुर्भावाची कारणेपोक्का बोइंग हा रोग 'फ्यूजॅरियम मोनिलीफॉरमी' या बुरशीमुळे होतो. सततच्या पडणाऱ्या पावसामुळे पिकातील आर्द्रता वाढून तापमान कमी झाल्यास ही बुरशी कमी कालावधीत मोठ्या प्रमाणावर उसाच्या पोंग्यात वाढते आणि रोगाचा प्रादुर्भाव होतो. या रोगास कारणीभूत बुरशीचा प्रसार हवेद्वारे होतो.
रोगाची लक्षणे- वर नमूद केल्याप्रमाणे अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्यास या रोगास कारणीभूत असलेल्या बुरशीची लागण प्रथमतः उसाच्या शेंड्यातील कोवळ्या पानावर दिसून येते.- सुरुवातीस पोंग्यातील तिसऱ्या व चौथ्या पानांच्या बेचक्यात पांढरट पिवळसर चट्टे दिसून येतात तसेच रोगाची लागण झालेल्या पानावर सुरकुत्या पडून पाने आकसतात.- रोगाची तीव्रता वाढल्यानंतर उसाची पाने एकमेकात वेणीसारखी गुरफटतात.- पाने एकमेकांत गुरफटल्याने पिकाचे पोषण व्यवस्थित होत नाही परिणामी ऊसाचे कांडे आखूड व वेडेवाकडे होतात.- अधिक प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यास पोंगेमर किंवा शेंडा कुज सुध्दा दिसून येतो.- शेंडा कुज झालेल्या ऊसातील शेंड्याचा जोम नष्ट झाल्याने उसावरील डोळ्यातून पांगश्या फुटतात व कालांतराने असे ऊस वळतात.- रोगट उसाच्या कांड्या आखूड झाल्याने व पांगश्या फुटल्याने ऊसाच्या उत्पन्नात घट येते.- या रोगामुळे ऊसाच्या बेटातील रोगग्रस्त फुटव्यांचेच नुकसान होते तथापि बाधित न झालेल्या ऊसाचे नुकसान होत नाही.- ऑगस्ट महिन्यानंतर आर्द्रता कमी आणि तापमान वाढल्याने या रोगाची तीव्रता हळूहळू कमी होत जाते.
रोग नियंत्रणाचे उपाय१) शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी तसेच पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने करावा.२) शेंडे कुज व पांगश्या फुटलेले ऊस आढळून आल्यास ते त्वरित नष्ट करावेत.३) या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास लगेचच कार्बेन्डाझिम १२%+ मॅन्कोझेब ६३% डब्लूपी २५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड ५०% डब्लूपी २० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी सोबत उच्च दर्जाचे स्टिकर मिसळून १० ते १२ दिवसाच्या अंतराने २ ते ३ फवारण्या कराव्यात.
डॉ.जी.डी.गडदे, डॉ.ए. टी.दौंडे, डॉ.डी.डी.पटाईत, श्री.एम.बी.मांडगेवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी०२४५२-२२९०००
अधिक वाचा: Sugarcane Fertilizer Schedule : आडसाली उसात कशी द्याल खते पहा सविस्तर वेळापत्रक