हळद हे देशातील मसाला पिकांत एक प्रमुख नगदी पीक आहे. हळदीचा उपयोग रोजच्या आहारात, औषधामध्ये, सौंदर्यप्रसाधनांमध्ये, जैविक कीटकनाशकांमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असतो. या गुणवैशिष्ट्यामंळे हळद हे पीक 'सुपर फुड' या प्रकारात समाविष्ट होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे एकूण हवामानाचा विचार केला असता हळद हे पीक उत्तमरीत्या घेता येते. निर्यातक्षम व गुणवत्तपूर्ण हळदीच्या उत्पन्नासाठी पूर्वमशागतीपासून ते हळद प्रक्रियेपर्यंत हळद पिकाचे व्यवस्थापन काळजीपूर्वक करणे गरजेचे असते.
हळद लागवड होऊ न सात महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. या कालावधीमध्ये हळद पीकवाढीच्या हळकुंड भरणे ही महत्त्वाची अवस्था सुरू असते. आंतरमशागतीच्या कामांमध्ये खते देणे, पाणी व्यवस्थापन, तणांचे नियंत्रण, फुलांचे दांडे न काढणे इत्यादी महत्त्वाच्या कामांचा समावेश होतो. अशावेळी शेतकरी बांधवांनी खाली नमूद केल्याप्रमाणे हळद पिकाचे व्यवस्थापन करावे.
आंतरमशागत (भरणी करणे)
हळद पिकाला मातीची भर लावलेली नसेल तर फुटव्यांपासून नव्याने आलेले हळकुंड उघडे राहतात. हळकुंड सूर्यप्रकाशात सान्निध्यात आल्यास ते हिरवे पडतात आणि वाढ खुंटते. मजूर अथवा भरणी मशिनच्या साह्याने तत्काळ मातीची भर लावून हळकुंडे संपूर्णपणे झाकून घ्यावीत. त्यामुळे हळकुंडांचे चांगले पोषण होते. हळकुंडे चांगली पोसतात. भरणी केल्यामुळे उत्पादनामध्ये जवळजवळ १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. गादी वाफ्यावर ठिबक सिंचन केले असल्यास भरणी करताना ड्रिपर मातीखाली जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
अधिक वाचा: पाण्याचा ताण सहन करणाऱ्या कारळा पिकाची लागवड कशी कराल?
खतांचे व्यवस्थापन हळद
पिकास कोणतेही नत्रयुक्त रासायनिक खत जसे युरिया इत्यादी देऊ नये. जर युरियासारखी खते दिली तर त्यामुळे हळदीची अतिरिक्त शाकीय वाढ होते. परिणामी हळद पिकाची पुढील अवस्था जसे हळकुंड भरणे, हळकुंडाची जाडी आणि वजन वाढणे लांबणीवर पडते. ज्या ठिकाणी पोटॅशयुक्त खतांची कमतरता असेल त्या ठिकाणी हेक्टरी १२५ किलो पांढरा पोटॅश द्यावा. त्यामुळे हळकुंडांचे वजन वाढून चकाकी येते.
पाणी व्यवस्थापन
पावसाळा सुरू झाल्यानंतर पावसाचे पाणी जमिनीमध्ये साठून राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. पाणी जर साठून राहिले तर मुळांना हवा (ऑक्सिजन) घेण्यास अडथळा उद्भवतो. परिणामी हळदीची पाने पिवळी पडून निस्तेज होऊन मलूल होताना दिसतात. अशावेळी साचलेल्या पाण्याचा तत्काळ निचरा करावा. सध्या पावसाचा कालावधी असल्याने वाकोऱ्याची शेवटची सरी कुदळीच्या साह्याने फोडून पाणी काढून द्यावे, पावसाच्या कालावधीत जमिनीतील ओलावा अभ्यासून पाणी द्यावे.
फुलांचे दांडे न काढणे
हळदीला फुले येणे म्हणजे कंद सुटण्यास सुरुवात झाल्याचे लक्षण आहे. फुलांचे दांडे तसेच झाडावर ठेवल्यास हळद पिकाला त्याचा कोणताही तोटा होत नाही.
डॉ. मनोज माळी
प्रभारी अधिकारी, हळद संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, सांगली