Join us

'ग्रामीण भागामध्ये अर्थकारण वाढवण्यासाठी दुग्ध प्रक्रिया उद्योगाला प्राधान्य'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2024 6:17 PM

शेतकरी शास्त्रज्ञ मंच कार्यक्रम संपन्न

छत्रपती संभाजीनगर : केवळ दूध विक्री करून शेतकऱ्यांना चांगले अर्थार्जन होत नाही. तर याच दुधावर प्रक्रिया करून त्याचे पदार्थ विक्री केले तर आपण जास्तीत जास्त नफा मिळवू शकतो असे प्रतिपादन शास्त्रज्ञ अनिता जिंतूरकर यांनी शेतकरी शास्त्रज्ञ मंचाच्या कार्यक्रमात केले. कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे ९५ वा शेतकरी शास्त्रज्ञ मंच कार्यक्रम दिनांक ०१ फेब्रुवारी, २०२४ संपन्न झाला. यावेळी केव्हीकेचे शास्त्रज्ञ डॉ. अनिता जिंतूरकर, डॉ.बस्वराज पिसुरे, डॉ.संजूला भावर तसेच बाजार सावंगी ता खुलताबाद येथी आदर्श डेअरी उद्योगाचे संचालक श्री.संदीप नलावडे यासोबत युवा शेतकरी व महिला यांची उपस्थिती होती.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करताना केव्हीकेच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञ डॉ. अनिता जिंतूरकर म्हणाल्या की, दुग्ध प्रक्रिया उद्योग उभारणी मध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाव आहे व दुधाच्या विविध उत्पादनांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यासाठी शेतकरी बांधवांनी प्रशिक्षण घेऊन या उद्योगाकडे नक्की वळले पाहिजे. केवळ दूध विक्री करून शेतकरी बांधवाना मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होणार नाही. यासाठी मार्केटचा अभ्यास करून त्याप्रमाणे विविध दूध प्रक्रिया उत्पादने निर्मिती करणे हे अत्यंत गरजेचे आहे. या उद्योग उभारणी मध्ये शासना मार्फत देखील मोठ्या प्रमाणात पाठबळ उपलब्ध आहे.

तसेच नवीनच सुरू केलेल्या उद्योजकांनी देखील आपली गुणवत्ता राखणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने प्रशिक्षण घेऊन आपले विविध उत्पादने तयार करणे आवश्यक आहे. तसेच आपल्या सर्व शेतकरी बांधवांनी देखील आपल्या स्थानिक नव उद्योजकांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. नव उद्योजकांनी सविस्तर अभ्यास करून आपले मार्केट व्यवस्था स्वतः उभी करणे गरजेचे आहे असं जिंतूरकर म्हणाल्या.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बाजार सावंगी ता खुलताबाद येथील आदर्श डेअरी उद्योगाचे संचालक श्री. नलावडे म्हणाले की, शेतकरी शेतकरी बांधवांनी या उद्योगाकडे नक्की यावे. यामध्ये खूप चांगल्या प्रमाणात आर्थिक नफा मिळवता येतो. आपली गुणवत्ता आणि आपल्या कामातील सातत्य नियमित ठेवले तर आपण एक चांगला उद्योग उभारू शकता. आज त्यांनी सुरू केलेल्या डेअरी युनिट मधून उत्तम आर्थिक नफा तर होताच आहे सोबतच १० ते १२ जणांना रोजगार मिळत आहे. एक चांगला डेअरी उद्योग सुरू करण्यासाठी सुरुवातीला २०-२५ लाखाचे बजेट लागते. परंतु, त्यापेक्षाही लहान क्षमतेच्या युनिट पासून आपण सुरुवात करू शकता. आम्ही २५ ते ३० हजार रुपये खर्च करून प्रक्रिया उद्योगाला सुरुवात केली होती.

सुरुवातीला केवळ लस्सी वर सुरू केलेल्या युनिट मध्ये आज जवळपास १५ प्रकारचे दूध प्रक्रिया पदार्थ बनवले जातात व पूर्ण जिल्ह्यामध्ये याची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच ऍग्रोवनच्या कृषि प्रदर्शन पासून शाखा देण्यास देखील सुरुवात करण्यात आलेली आहे. हे सर्व करत असताना प्रत्येक वेळी अडचणी आल्या परंतु योग्य मार्गदर्शन आहे. आपले योग्य नियोजन असेल तर त्या अडचणींवर मात करून पुढे जावे लागेल. परंतु आपली उत्पादने विक्री करायची असतील तर आपली गुणवत्ता ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी मार्केटचा अभ्यास करून ग्राहकांची कशाची मागणी आहे, कोणत्या प्रॉडक्टला जास्त मागणी आहे, कोणत्या नवीन प्रॉडक्टची मागणी आहे या सर्व बाबींचा आपण सविस्तर अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यानुसार आपण आपले नियोजन करणे आवश्यक आहे. आपल्याला उद्योग सुरू करण्यास कुठली अडचण असेल तर आपण केव्हीके, कृषि विभाग येथी अधिकारी, शास्त्रज्ञ यांचा नक्की सल्ला घ्यावा असं ते म्हणाले.

यावेळी डॉ. संजूला भावर यांनीही सद्यपरिस्थिती फळ पीक व्यवस्थापन याविषयी मार्गदशन केले. यावेळी डॉ.बस्वराज पिसुरे यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.जयदेव सिंगल, श्री.जयदीप बनसोडे, श्री.सतीश कदम आदींनी सहकार्य केले.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीदूध