Join us

Rabbi Maize Crop Management : अधिक उत्पादनाची हवी असेल हमी; तर 'अशी' करा रब्बीत मका पिकाची पेरणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 8:22 PM

महाराष्ट्र राज्यात तृणधान्य वर्गातील महत्वाचे पीक म्हणजे मका पिक (Maize Crop) होय. तृणधान्य पिकांच्या उत्पादनामध्ये गहू (Wheat) आणि भात या पिकांनंतर मक्याचा जगात तिसरा क्रमांक लागतो. अन्नधान्य व्यतिरिक्त मक्याचा उपयोग प्रामुख्याने स्टार्च, अल्कोहोल (Alcohol), गोंद, रंग, कृत्रिम रबर इत्यादी विविध पदार्थ तयार करण्यासाठी होतो. त्यामुळे मका नेहमीच मागणीत असते. याच अनुषंगाने जाणून घेऊया रब्बी (Rabbi) हंगामातील मका लागवडीचे अधिक उत्पादन देणारे तंत्र. 

महाराष्ट्र राज्यात तृणधान्य वर्गातील महत्वाचे पीक म्हणजे मका पिक होय. तृणधान्य पिकांच्या उत्पादनामध्ये गहू आणि भात या पिकांनंतर मक्याचा जगात तिसरा क्रमांक लागतो. अन्नधान्य व्यतिरिक्त मक्याचा उपयोग प्रामुख्याने स्टार्च, अल्कोहोल, गोंद, रंग, कृत्रिम रबर इत्यादी विविध पदार्थ तयार करण्यासाठी होतो. त्यामुळे मका नेहमीच मागणीत असते. याच अनुषंगाने जाणून घेऊया रब्बी हंगामातील मका लागवडीचे अधिक उत्पादन देणारे तंत्र. 

१. हवामान व जमीनमका उष्ण, समशीतोष्ण आणि थंड अशा सर्व हवामानात येणारे पीक आहे. मक्यासाठी मध्यम ते भारी, खोल, उत्तम निचरा असणारी, भरपूर प्रमाणात सेंद्रिय पदार्थ असणारी व जलधारणाशक्ती अधिक असलेली जमीन चांगली असते.

२. पूर्वमशागतजमिनीची खोल (१५ ते २० सें.मी.) नांगरट करावी. कुळवाच्या २-३ पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. हेक्टरी १० ते १२ टन शेणखत टाकावे. तर हिरवळीचे खत जमिनीत गाडले असल्यास शेणखताची आवश्यकता भासत नाही.

३. पेरणीरब्बी हंगामात १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरपर्यंत पेरणी करावी. रब्बी हंगामात मका पिकाची लागवड सरीवरंबा पद्धतीत करावी.

४. पेरणीचे अंतर व बियाणे प्रमाणसरीवरंबा पद्धतीत मका पिकाची पेरणी टोकण पद्धतीने करावी.उशिरा आणि मध्यम जातींसाठी ७५ सें.मी. x २० सें.मी. अंतरावर टोकण करावी. तर लवकर पक्व होणाऱ्या जातींसाठी ६० सें.मी. x २० सें.मी. अंतरावर टोकण करावी. यासोबतच बियाण्यांचे प्रमाण १५ ते २० किलो/हेक्टरी ठेवावे. 

५. मका पिकाचे काही प्रसिद्ध वाण, कालावधी, वैशिष्ट्ये, उत्पादन• मांजरी– ९०-११० दिवस संमिश्र वाण, उत्पन्न ४० ते ५० क्विंटल/हे. नारंगी, पिवळे दाणे.• राजर्षी– १००-११० दिवस संकरित वाण; उत्पन्न ५५ ते ६० क्विंटल/हे.• डेक्कन १०५–१००-११० संकरित वाण; उत्पन्न ५५ ते ६० क्विंटल/हे.• करवीर– १००-११० दिवस संमिश्र वाण; उत्पन्न ४० ते ५० क्विंटल/हे, ५० ते ५५ क्विंटल/हे नारंगी, पिवळे दाणे.• आफ्रिकन टॉल– संमिश्र वाण (चाऱ्यासाठी सर्वोत्तम); उत्पन्न ६० ते ७० हिरवा चारा/हे. आणि धान्य उत्पन्न ५० ते ५५ किलो/हे.

६. बिजप्रक्रीयाकरपा रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी २ ते २.५ ग्रॅम थायरम बुरशीनाशक प्रति किलो बियाण्यास लावावे. तसेच अॅझोटोबॅक्टर जीवाणू संवर्धन २५ ग्रॅम किंवा १०० मिली प्रति किलो बियाण्यास लावून नंतर पेरणी करावी.

७. खत व्यवस्थापनरब्बी मका पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी पेरणीच्या वेळी हेक्टरी ४० किलो नत्र, ६० किलो स्फुरद व ४० किलो पालाश द्यावे. पेरणीनंतर ३० दिवसांनी ४० किलो नत्र द्यावे. तसेच पेरणीनंतर ४५ दिवसांनी उर्वरित ४० किलो नत्र द्यावे.

८. पाणी व्यवस्थापनमका पिकाच्या महत्वाच्या अवस्थांच्या वेळी पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात लक्षणीय घट येऊ शकते. त्यामुळे महत्वाच्या अवस्थांमध्ये पाणी देणे आवश्यक आहे. याकरिता पेरणीनंतर लगेच पाणी द्यावे. पेरणीनंतर २० ते ४० (पिकाची शाकीय अवस्था) दिवसांनी पाणी द्यावे. पेरणीनंतर ४० ते ६० (पिक फुलोऱ्यात असताना) दिवसांनी पाणी द्यावे. दाणे भरण्याच्या वेळी (७५-८० दिवसांनी) पाणी द्यावे. रब्बी हंगामात जमिनीच्या मगदुरानुसार १०-१२ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

९. आंतरमशागतपेरणी संपताच चांगल्या वाफशावर तण नियंत्रणासाठी अँटूटॉप ५० टक्के प्रवाही २ ते २.५ किलो प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून सम प्रमाणात जमिनीवर फवारावे. तणनाशक फवारणीनंतर १५ ते २० दिवसांपर्यंत आंतरमशागत करू नये.

१०. पिक संरक्षणअ. किड नियंत्रण१. खोडकिडा नियंत्रण : ईमीडाक्लोप्रीड १ मिली/लिटर पाण्यातून फवारावे किंवा कार्बारीलची भुकटी ८५%/१७०० ग्रॅम/हेक्टरी ५०० लिटर पाण्यातून फवारावे.२. मछली अळी : मिथिल पॅराथीऑनची भुकटी २० ते ३० किलो/हेक्टरी धुरळावी.३. मावा व तुडतुडे : डायमिथोएट १ मिली/लिटर पाण्यातून फवारावे.४. हिरवे कणसे पोखणाऱ्या अळ्या : मिथिल पॅराथीऑनची भुकटी २० ते ३० किलो/हेक्टरी धुरळावी.

ब. रोग नियंत्रण१. खोड कुजव्या रोगाची लक्षणे दिसून येताच ७५% कॅप्टन १२ ग्रॅम प्रति १०० लिटर पाण्याच्या प्रमाणात जमिनीतून दिल्यास पिधीयम खोडकुजव्या रोगाचे नियंत्रण करणे शक्य होते.२. करपा रोगाची लक्षणे दिसून येताच आवश्यकतेनुसार डायथेन एम-४५ किंवा मॅन्कोझेब २.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात फवारावे.

११. काढणी, मळणी व साठवणूकधान्यासाठी मका पिकाची काढणी कणसावरील आवरण पिवळसर पांढरे आणि दाणे टणक झाल्यावर करावी. प्रथम कणसे सोलून खुडून घ्यावीत आणि सोललेली कणसे दोन तीन दिवस उन्हात चांगली वाळवावीत. त्यानंतर मका सोलणी यंत्राने कणसातील दाणे काढावेत. सोलणी यंत्राने दाणे काढल्यानंतर मका दाण्यात ओलाव्याचे प्रमाण १०-१२ टक्के इतके होईपर्यंत उन्हात चांगले वाळवावे म्हणजे साठवणुकीत किडीमुळे नुकसान होत नाही.

१२. उत्पादन• संकरित वाण १०० ते ११० क्विंटल / हेक्टरी• संमिश्र वाण ४० ते ५० क्विंटल / हेक्टरी• चारा पिके ६० ते ७० टन हिरवा चारा / हेक्टरी

प्रा. डॉ. गणेश बहुरे प्राचार्य, कृषि महाविद्यालय, खंडाळा ता. वैजापूर जि. छ. संभाजीनगर.

हेही वाचा : Ginger Farming Success Story : किशोररावांच्या आले शेतीची चर्चा भारी; जैविक निविष्ठांची कमाल सारी

टॅग्स :मकापेरणीलागवड, मशागतपीक व्यवस्थापनशेती क्षेत्ररब्बीबाजारशेतकरीशेतीकीड व रोग नियंत्रण