तण हे कृषि उत्पादन पद्धतीमधील प्रमुख जैविक अडथळा आहेत. तणांमुळे पीक उत्पादनात घट होऊन त्याचा गुणवत्ता, जैव विविधता तसेच मानव व प्राण्यांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो. तणांमुळे सरासरी ३३ टक्के उत्पादन घटते तर कीटकांमुळे २६ टक्के, रोगांमुळे २० टक्के आणि इतर घटकांमुळे २१ टक्के उत्पादनात घट होते.
तसेच तणांच्या वाढीमुळे पिकांची कार्यक्षमता व रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. ज्यामुळे नुकसानीची आकडेवारी अधिक असू शकते. यास्तव प्रभावी तण व्यवस्थापन पीक उत्पादन वाढवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. याच अनुषंगाने आज आपण जाणून घेणार आहोत रब्बी पिकांतील तण व्यवस्थापन.
तण नियंत्रणाच्या पद्धती
१) प्रतिबंधात्मक उपाय : प्रमाणित बियाणांचा वापर करणे, तण विरहित बियाणे पेरणीकरिता वापरणे, पेरणीपूर्वी तणे नष्ट करणे. पूर्ण कुजलेले शेणखत/कंपोस्टखत वापरणे, जमिनीची पूर्वमशागत योग्य रीतीने करणे, शेताचे बांध पाण्याच्या चारी/पाट व शेतातील रस्ते तण विरहित ठेवणे इत्यादी.
२) निवारणात्मक उपाय : हाताने तण उपटणे, कोळपणी, खुरपणी, मशागत, तणांची कापणी व छाटणी करणे, तण प्रभावी क्षेत्रात पाणी साठवणे, जाळणे अथवा आच्छादनाचा वापर करणे.
३) रासायनिक पद्धती : काही महत्वाच्या तांत्रिक बाबींचे ज्ञान असणे अत्यंत महत्वाचे आहे. ज्यासाठी
१. लेबल क्लेमनुसार तणनाशकाची निवड व वापर करणे.
२. तणनाशकाचा शिफारशीत मात्रा इतकाच वापर करणे. त्यापेक्षा कमी अथवा अधिक वापर टाळणे.
३. योग्य वेळी तणनाशकांची फवारणी उदा. तणनाशकाच्या प्रकारानुसार पीक पेरणीपूर्वी तणनाशक जमिनीत मिसळणे, पीक पेरणीनंतर परंतु पीक व तण उगवण्यापूर्वी जमिनीवर तणनाशक फवारणे व पीक व तणे उगवल्यानंतर तणनाशकाची पिकावर व तणावर फवारणी करणे.
४. तणनाशक फवारणी पद्धतीनुसार नोझलचा वापर करणे.
परंतु या तांत्रिक बाबी संदर्भातील ज्ञानाचा अभाव असल्यास त्याचा विपरीत परिणाम तण व्यवस्थापनावर होऊन फवारणी केलेल्या पिकावरही होऊ शकतो. किंबहुना पूर्ण पीक धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच अधिक काळ जमिनीत अंश राहणाया तणनाशकामुळे इतर संवेदनशील पीक घेण्यास मर्यादा येतात. त्यामुळे रासायनिक पद्धतीचा अवलंब करताना वरील बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आवश्यकता भासल्यास तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.
रब्बी पिकातील रासायनिक व एकात्मिक तण व्यवस्थापन:
१) रब्बी ज्वारी : अॅट्राझीन - ५0 टक्के डब्लू.पी. ४० ते ८० ग्रॅम प्रती १० लि.पाणी सर्व प्रकारची तणांकरिता मात्र पीक व तणे उगवण्यापूर्वी हेक्टरी ५०० लीटर पाण्यातून फवारणी करावी व पेरणीनंतर ४५ दिवसांनी एक खुरपणी करावी. किंवा २-४-डी सोडिअम ८० टक्के डब्लू पी.२५ ते ३६ ग्रॅम प्रती १० लि.पाणी वार्षिक व बहुवार्षिक रुंद पानांच्या तणांकरिता पेरणीनंतर ३ ते ४ आठवड्यानंतर हेक्टरी ५०० लीटर पाण्यातून फवारणी करावी.
२) मका : अॅट्राझीन ५० टक्के डब्लू पी. ४० ते ८० ग्रॅम/१० लि . पाणी, सर्व प्रकारची तणे करिता मात्र पीक व तणे उगवण्यापूर्वी हेक्टरी ५०० लीटर पाण्यातून फवारणी करावी व पेरणीनंतर ४५ दिवसांनी एक खुरपणी करावी. किंवा २-४-डी सोडिअम ८० टक्के डब्लू पी. २५ ते ३६ ग्रॅम/१० ली. पाणी, वार्षिक व बहुवार्षिक रुंद पानांच्या तणांकरिता पेरणीनंतर ३ ते ४ आठवड्यानंतर हेक्टरी ५०० लीटर पाण्यातून फवारणी करावी.
३) गहू : पेंडोमिथिलीन ३० टक्के ई.सी. ७०मि.ली./१० ली पाणी वार्षिक गवतवर्गीय व रुंद पानांच्या तणांकरिता मात्र पीक व तणे उगवण्यापूर्वी हेक्टरी ५०० लीटर पाण्यातून फवारणी करावी. किंवा मेथॉबॅथीझुरॉन ७० टक्के डब्लू पी. २१ ते २८ ग्रॅम /१० ली पाण्यात मिसळून जंगली ओट, केना गवत, रुंद पानाची तणे आदींकरिता पीक व तणे उगवण्यापूर्वी हेक्टरी ५०० लीटर पाण्यातून फवारणी करावी.
४) हरभरा, मसूर व वाटाणा : पेंडीमेथिलीन ३० टक्के ई.सी. ७० ते ८० मि.ली. रुंद पानांच्या व वार्षिक गवतवर्गीय तणांकरिता पीक व तणे उगवण्यापूर्वी हेक्टरी ५०० लीटर पाण्यातून फवारणी करावी व पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी एक खुरपणी करावी. किंवा ऑक्सिफ्लोरफेन २३.५ टक्के ई.सी. ८ ते १० मि. ली. रुंद पानांच्या व वार्षिक गवतवर्गीय तणांच्याकरिता पीक व तणे उगवण्यापूर्वी हेक्टरी ५०० लीटर पाण्यातून फवारावे.
५) बागायती भुईमुग : ऑक्सिफ्लोरफेन २३.५ टक्के ई.सी. ८.५ ते १७ मि. ली. गवतवर्गीय व रुंद पानांच्या तणांकरिता पेरणीनंतर ३ दिवसांनी हेक्टरी ५०० लीटर पाण्यातून फवारणी करावी. व ४५ दिवसांनी एक खुरपणी करावी. किंवा पेंडीमेथिलीन ३० टक्के ई.सी. ७० मि.ली. रुंद पानांच्या व वार्षिक गवतवर्गीय तणांकरिता पेरणीनंतर ३ दिवसांनी हेक्टरी ५०० लीटर पाण्यातून फवारणी करावी. व ४५ दिवसांनी एक खुरपणी करावी.
६) सुर्यफुल : पेंडीमेथिलीन ३० टक्के ई.सी. ७० मि.ली. रुंद पानांच्या व वार्षिक गवतवर्गीय तणांकरिता मात्र पीक व तणे उगवण्यापूर्वी हेक्टरी ५०० लीटर पाण्यातून फवारावे
७) बटाटा : मेट्रीब्यूझिन ७० टक्के डब्लू. पी. १५ ते २० ग्रॅम गवत वर्गीय रुंद पानांच्या तणांकरिता बटाटा लावणीनंतर ३ ते ४ दिवसांनी किंवा बटाटा पिकाची उंची ५ सें.मी. झाल्यानंतर हेक्टरी ५०० लीटर पाण्यातून फवारावे.
तणनाशक फवारताना घ्यावयाची काळजी
• फवारणीसाठी शक्यतो स्वतंत्र पंप वापरावा.
• तणनाशक फवारणीपूर्वी जमिनीत पुरेसा ओलावा असू द्यावा.
• फवारणी वारा शांत असताना करावी.
• फवारणी पंपासाठी शिफारशीनुसार नोझलचा वापर करावा.
• फवारणीसाठी लागणारे पाणी ठरविण्याकरिता फवारणी पंप कॅलीबरेट करुन घ्यावा.
• तणनाशके पाण्यात मिसळताना काठीचा वापर करावा, हाताचा वापर करू नये.
• तणनाशके फवारणीसाठी स्वच्छ पाण्याचा वापर करावा, गढूळ किंवा गाळ मिश्रित पाणी वापरु नये.
• अपेक्षित ताण नियंत्रणाकरिता शिफारस तणनाशकाची मात्रा फवारणी क्षेत्रावर पडेल याची काळजी घ्यावी.
• फवारणी करीत असताना मद्यसेवन, धूम्रपान किंवा डोळे चोळणे टाळावे.
• तणनाशक खरेदी करण्यापूर्वी संबधित तणनाशकाचा फवारणी करावयाच्या पिकाकरिता लेबलक्लेम आहे किंवा नाही, याची खात्री करावी.
तणनाशक फवारणीसाठी वापरावयाचे नोझल्स
तणनाशकाच्या प्रकारानुसार फ्लॅटफेन अथवा फ्लडजेट प्रकारातील नोझलचा वापर तणनाशक फवारणी करताना करावा. जमिनीवर फवारावयाच्या तणनाशकाकरिता शक्यतो फ्लॅटफेन नोझलचा वापर करावा व पीक उगवणीनंतर फवारावयाच्या तणनाशकाकरिता शक्यतो फ्लडजेटनोझलचा वापर करावा. तणनाशक फवारणी करताना होलोकोन व सॉलिडकोन प्रकारातील नोझलचा वापर टाळावा. या प्रकारातील नोझलने तणनाशकाची एकसारखी फवारणी होत नाही, परिणामी अपेक्षित तण नियंत्रण मिळत नाही.
प्रा. संजय बाबासाहेब बडे
सहाय्यक प्राध्यापक कृषि विद्या विभाग
दादासाहेब पाटील कृषि महाविद्यालय दहेगाव ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर