Rabi Crops Water Management : उशिरापर्यंत पडणाऱ्या पावसाचा रब्बी हंगामातील पिकांसाठी योग्य प्रकारे जलसंवर्धन करून फायदा घेतला पाहिजे. रब्बी हंगामातील ज्वारी, करडई, हरभरा तसेच काही भागात थोड्याफार प्रमाणात गहू ही पिके खरीपात पडलेल्या पावसाच्या खोलीवर घेतली जातात. तसेच खरिपात लागवड केलेली परंतु पिकाची उर्वरित वाढ रब्बी हंगामात होते. कापूस व तूर या पिकांनाही खरिपात पडलेल्या पावसाच्या ओलाव्याचा फायदा होतो.
खरीपातील या पिकांच्या तसेच रब्बी हंगामात घेतलेल्या कोरडवाहू पिकांच्या फुलोरा आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत हा ओलावा जमिनीत पुरेशा प्रमाणात असणे पीक उत्पादनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असतो. एकंदरीत उशिरा पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब योग्य ती उपाययोजना करून जमिनीत मुरवणे फायद्याचे ठरते.
कसे करावे जलसंवर्धन? उथळ व मध्यम जमिनीत समपातळीतील व खोल जमिनीत ढाळीच्या बांधाव्यतिरिक्त पिकांची पेरणी तसेच पेरणीपूर्वीची सर्व मशागतीची कामे उताराला आडवी करावीत. खरीप पिकांची काढणी झाल्यानंतर आवश्यक ती मशागतीचे कामे पूर्ण करून पिकांच्या प्रकारानुसार सरीवरंबा, सारे किंवा गादीवाफे अशा वेगवेगळ्या प्रकारची रानबांधणी पीक पेरणीच्या अगोदर करून ठेवावी.
रब्बी हंगामात शिफारस केलेल्या पेरणीच्या वेळेपूर्वी पावसाच्या पाण्याचे संवर्धन होऊन जमिनीतील ओलाव्याची जास्तीत जास्त काळापर्यंत साठवणूक व्हावी म्हणून शक्य असतील तेवढ्या दोन किंवा तीन कोळपण्या कराव्यात. तूरकाट्या, धसकटे, वाळलेले गवत, गव्हाच्या काडाच्या आच्छादनाचा वापर पिकांच्या दोन ओळीत केल्यानेही जमिनीत दीर्घकाळ ओलावा टिकून राहतो.
- डॉ. कल्याण देवळाणकर (कृषीतज्ज्ञ)