Join us

Rabi Sowing : पेरणीसाठी घरचे बियाणे वापरताय मग अशी करा उगवण क्षमता चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 15:40 IST

पेरणीचा हंगाम जवळ आला की बियाणे मिळविण्याकरिता शेतकऱ्यांची धावपळ सुरु होते. त्यांना बऱ्याच वेळेस बियाण्यांची उपलब्धता, शुद्धता, उगवणक्षमता अशा बियाण्यांशी निगडीत अनेक अडचणी येतात.

पेरणीचा हंगाम जवळ आला की बियाणे मिळविण्याकरिता शेतकऱ्यांची धावपळ सुरु होते. त्यांना बऱ्याच वेळेस बियाण्यांची उपलब्धता, शुद्धता, उगवणक्षमता अशा बियाण्यांशी निगडीत अनेक अडचणी येतात.

उगवणक्षमता योग्य नसेल तर दुबार पेरणी सारख्या संकटाना सामोरे जावे लागते. पेरणीपूर्व जर बियाण्यांची उगवणक्षमता तपासली तर अशा गोष्टी टाळता येऊ शकतात.

बियाण्याची उगवणक्षमता प्रयोगशाळेत तपासली जाते, पण शेतकऱ्यांना प्रत्येकवेळी प्रयोगशाळेत जाऊन उगवणक्षमता तपासणी करणे शक्य नसते.

उगवणक्षमता तपासणीच्या काही सोप्या पद्धती आहेत जेणेकरून शेतकरी घरच्या घरी आणि कमी साहित्यात ती करू शकतील. बियाणे उगवणक्षमता तपासणीच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत.

मातीमध्ये उगवणक्षमता तपासणी- चार कुंड्यांमध्ये किंवा प्लास्टिक ट्रेमध्ये बारीक रेती किंवा ज्या शेतात पेरणी करावयाची आहे तेथील माती भरावी व त्यास पाणी द्यावे.- दुसऱ्या दिवशी चारही कुंड्यांमध्ये किंवा ट्रेमध्ये प्रत्येकी १०० बिया १ ते २ से. मी. खोलीवर पेराव्यात.- मातीतील किंवा रेतीतील ओलावा टिकवून ठेवावा.- परंतु जास्त पाणी होणार नाही याची काळजी घ्यावी.

गोणपाटाच्या सहाय्याने उगवणक्षमता तपासणी- गोणपाटाच्या तुकड्याचाही वापर उगवणक्षमता तपासणीसाठी साठी केला जाऊ शकतो.- त्याकरिता आयताकृती आकाराचा साधारणतः १ फुट x १.५ फुटाचा गोणपाटाचा तुकडा घेऊन तो ओला करून घ्यावा.- त्यावर १०० बिया १० ओळींत समान अंतरावर ठेऊन घ्याव्यात.- बियाण्यासहीत गोणपाटाची गुंडाळी करून घ्यावी अशा ४ गोणपाटाच्या गुंडाळ्या करून घ्याव्यात.- त्यामध्ये पाण्याचा ओलावा टिकून ठेवावा.- साधारणतः ८ ते १० दिवसांत बियाण्यांची उगवण होते.- किती कोंब निघाले आहेत ते प्रथमतः मोजून घ्यावेत.- विकृत रोपे, सडलेले बी, कठीण व टणक बी मोजणीत घेऊ नये.- चारही नमुन्यांची सरासरी काढून उगवणक्षमतेची टक्केवारी काढावी.- ही टक्केवारी सरासरी उगवणक्षमतेचा अंदाज देते.

बियाण्यांची उगवणक्षमता प्रमाणित केलेल्या उगवणक्षमतेपेक्षा अधिक असेल तर ते बियाणे पेरणीस योग्य असते. ५-८% उगवणक्षमता कमी असल्यास एकरी बियाण्यात १०% नी वाढ करावी. परंतु उगवणक्षमता फारच कमी असेल तर असे बियाणे पेरणीसाठी वापरू नये.

अधिक वाचा: Harbhara Lagwad : जिरायत व बागायत हरभऱ्याच्या अधिक उत्पादनासाठी कधी करावी पेरणी

टॅग्स :पेरणीपीकरब्बीशेतकरीपीक व्यवस्थापनशेती