वाटा वाटा वाटा गं, चालेल तितक्या वाटा गं! या गाण्याच्या ओळी ऐकल्या आणि आठवण आली एका व्यक्तिमत्त्वाची. कुटुंबाच्या आरोग्यासाठी खेडेगावातल्या पायवाटा तुडवत सुरु केलेलं कार्य जगाच्या नकाशावरही भारताचा नावलौकिक वाढवत आहे.
पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेरनंतरचा फाटा (ता. अकोले, जि. अहमदनगर). कोंभाळणे नावाच्या एका छोट्याशा गावाकडे घेऊन जाणारा, घाईघाईने फोन झाल्यावर निघून लवकर पोहोचायचं होतं.
कारण ज्या रियल लाइफ हिरोना भेटायचं होतं, त्यांना पुढे मीटिंग्ज आणि ट्रेनिंग होते. गावाच्या उंबरठ्यावर पोहोचले, तेव्हा वाटलं त्यांच्या नावाची एखादी कमान असेल किंवा त्यांचा पत्ता दाखवणारा एखादा फलक, काही नाही तर निदान त्यांचा फोटो असलेला एखादा फ्लेक्स तरी. असो; शेवटी विचारत विचारत पुढे जायचं ठरवलं.
चालत जाणंसुद्धा कठीण अशा वाटेवर घाबरत-घाबरत गाडी पुढे नेत एका कौलांनी झाकलेल्या दगडी घरापाशी पोहोचले. अंगणामध्ये कोंबड्या, सुंदर बहरलेली तुळस, दारामध्ये घमेलेभर पाण्यात ढीगभर भांडी घासत बसलेल्या बाईना गाडीतून उतरून विचारलं, 'मावशी, राहीबाई पोपेरेंचं घर कुठलं, सांगाल का?' त्यावर त्या मावशी म्हणाल्या बोला की, मीच राहीबाई.
हे ऐकून थक्क झाले. चापूनचुपून नेसलेली नऊवारी, कष्टाचे माप सांगणाऱ्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या; पण त्यातून डोकावणारं अलौकिक तेज आणि ओठांवर स्मितहास्य. बीबीसी आणि ज्यांना भारताने 'पद्मश्री'ने गौरविले, ऑर्गेनिक फार्मिंगचा झेंडा घट्ट रोवू पाहणाऱ्या आणि रात्रंदिवस शेतामध्ये राबणाऱ्या अशा आपल्या राहीबाई पोपेरे.
प्रेमाने त्यांना राहीमावशी म्हटले जाते. साधी राहणी, उच्च विचारसरणी. घराजवळ त्यांच्या ठेवलेल्या माठांमध्ये, राखेत मिसळून ठेवलेला त्यांचा ऑर्गेनिक बियांचा साठा बघून मी अवाक् झाले.
अतिशय प्रेमाने व आग्रहाने त्यांनी मला मस्त चहा पाजला. शेणाने सारवलेल्या दुसऱ्या खोलीत घेऊन गेल्या, त्या खोलीमध्ये अनेक फोटो, अनेक पुरस्कार ठेवलेले होते. अनेक फोटोंपैकी एका फोटोकडे माझी नजर थांबली, तेव्हा त्या म्हणाल्या, एकदा दिल्लीनं निरोप धाडला होता; पण मला लय सर्दी झाली होती, मग नाय गेले.
माझा जीव हळहळला, वाटलं काय सोनेरी संधी गमावली राहीमावशींनी. तर हसून म्हणतात कशा, अगं लय येळा भेटले मी यांना. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोकडे बघत कौतुकाने म्हणाल्या, मी पहिल्यांदा यांना भेटले तेव्हा त्यांनी 'बीजमाता' म्हणून मला ओळखलं आणि माझं भरभरून कौतुकही केलं.
त्यांची सगळी माहिती घेऊन मी निघाले, तेव्हा शेतात आपल्या पोरांसारखं वाढवलेल्या एका झाडापाशी जाऊन सहा-सात वांगी तोडून ओंजळीत दिली आणि देताना मला म्हणाल्या. भाजी खाल तर माझी आठवण काढाल. खरोखर धन्य झाले मी त्यांना भेटून. खूप काही शिकले.
काबाडकष्ट करत नवऱ्याची खास साथ नसताना सुरुवातीला मुलांचा रोष ओढून अविरत कार्य सुरू केले. स्वतःचा नातू खूप आजारी पडला त्या दिवशी राहीमावशींनी ठरवलं की, शेती करीन तर सेंद्रियच. मुला-बाळांच्या पोटात रसायनांनी पेरलेलं अन्न जातंय, म्हणूनच रोगराई सर्रास वाढली आहे.
आपल्या प्रत्येकाच्या ताटात पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत रसायनयुक्त अन्नाच्या जागी सेंद्रिय म्हणजेच गावरान अन्न असावं. कॅन्सरसारखे भयंकर आजार पळून जावेत, यासाठी राहीमावशी जिवाचं रान करत आहेत.
मदत मिळो न मिळो. मरून पण सरून जायचं नाही, हे त्यांच्या जीवनाचे ब्रीदवाक्य. सोलसम विथ सारिका या पॉडकास्टकरिता स्टुडिओमध्ये त्या आल्यावर कॅमेराला न घाबरता अगदी बिनधास्तपणे बसल्या, डोक्यावर पदर घेत, घसघशीत नथ घालून साधी; पण अत्यंत निरागस, माझ्यासमोर जणू खुद्द अन्नपूर्णाच बसली होती.
मुलाखत झाल्यावर मी म्हणाले, राहीमावशी जेवता का? तर म्हणतात कशा, नको गं बाय, मी डब्बा आणलाय माझा पहाटे करून, मला नाय पचायचं तुमचं विषारी अन्न.
नारीशक्तीचं खरंखुरं प्रतीक असलेली ही आधुनिक भारताची आदिशक्ती किती निःस्वार्थीपणे आपल्या सगळ्यांच्या आरोग्यासाठी एकटीच झटतीये. मनावर खोलवर बिंबवणारीही अशिक्षित; पण अत्यंत हुशार, कर्तृत्वसंपन्न, हजरजबाबी 'बीजमाता'. हिला माझा मनापासून सलाम.
डॉ. सारिकासमुपदेशिका