उसाची योग्य वेळी तोडणी ही एक अत्यंत महत्वाची बाब आहे. त्यासाठी उसाची तोडणी करताना उसाची पक्वता लक्षात घेणे फार आवश्यक आहे. अपरिपक्व उसाची तोडणी झाली तर ऊस व साखर उत्पादन यामध्ये फार मोठी तफावत येते. म्हणून उसाची तोडणी करताना उसाची पक्वता तपासणे फार महत्वाचे आहे.
उसामध्ये पक्वता ही अत्यंत महत्वाची अवस्था आहे. ज्या वेळेस उसातील शर्करेचे प्रमाण हे १६% व शुद्धतेचे प्रमाण ८५% पर्यंत असते तेव्हा ऊस परिपक्व झालेला असतो व तोडणीस योग्य असतो.
पक्कतेनुसार उसाची तोडणी
१) ऑक्टोंबर किंवा नोव्हेंबरनंतर जसा कालावधी वाढत जातो तशी उसामध्ये अधिक साखर जमा होवू लागते. डिसेंबर ते मार्च या कालावधीत जास्तीत जास्त साखर उतारा मिळतो. सुरुवातीस व शेवटी साखर उतारा कमी मिळतो.
२) डिसेंबर ते मार्च या कालावधीत जास्तीत जास्त उसाचे गाळप करणे हा ही एक नियोजनाचा भाग आहे.
३) लवकर पक्व होणाऱ्या उस जातींची तोडणी नोव्हेंबर ते डिसेंबर या काळात, मध्यम पक्कता असणाऱ्या ऊस जातींची तोडणी जानेवारी ते फेब्रुवारीत आणि त्यानंतर उशिरा पक्क होणाऱ्या उस जातींची तोडणी मार्च ते एप्रिल या काळात केल्यास साखर उतारा अधिक मिळतो.
४) अती लवकर किंवा उशिरा तोडणी केल्यास उस व साखर उत्पादनात घट येते.
उसाच्या जातींची पक्वता
१) उसामध्ये पक्वता येण्याची जी अवस्था आहे ती शेवटची अवस्था आहे. यावेळी उसाची कायिक वाढ (शारिरीक) एकदम कमी होवून मंदावते.
२) दिवस व रात्रीच्या तपमानात जेंव्हा कमी फरक पडतो त्यावेळी उसामध्ये साखर तयार होवून साठविण्याचे कार्य चालते.
३) हा कालावधी म्हणजे सर्वसाधारणपणे नोव्हेंबर पासून चालू होतो. किमान तपमानात फरक पडल्यामुळे कायिक वाढ थांबते. या अवस्थेसाठी विशिष्ट असे तपमान (कमाल/किमान) तसेच सापेक्ष आर्द्रता (किमान ७० टक्के) हवी असते.
४) असे हवामान राज्यात नोव्हेंबर पासून उपलब्ध होत असल्यामुळे कारखाने या कालावधीत सुरु होतात असे असले तरी जातीपरत्वे पक्वता कमी अधिक तसेच लवकर अथवा उशीरा येते.
उपलब्ध जातींची पक्वता गटवारी खालीलप्रमाणे
अ.क्र | पक्वता कालावधी | जाती | हंगाम | तोडणीचा कालावधी (कमीत कमी) | तोडणीचा कालावधी (उशिरात उशिरा) |
१ | लवकर | को. ९४०१२, को ९२००५, को.सी.६७१, को ८०१४, एम.एस. १०००१ | सुरु व पूर्वहंगामी | १२ महिने | १४ महिने |
२ | मध्यम | को ८६०३२, कोएम ०२६५, व्हीएसाय ०८००५ | सुरु पूर्वहंगामी आडसाली | १२ महिने १३ महिने १५ महिने | १४ महिने १५ महिने १७ महिने |
३ | उशिरा | को. ७४०, को. ७५२७ | आडसाली | १६ महिने | १८ महिने |
हंगाम बदलल्यास उदा. सुरु हंगामाऐवजी आडसालीमध्ये एखादी जात लावल्यास तिचा पक्वता कालावधी बदलतो हे लक्षात घ्यावे. वरील उदाहरणात सुरु हंगामात १२ महिन्यात किमान पक्वता येते तर ती जात आडसालीमध्ये लावल्यास १५ महिन्यानी पक्वतेस सुरु होते. योग्य वेळी तोडणी होण्यासाठी वरील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे जातीनिहाय हंगाम नियोजन करणे काळाची गरज आहे.
अधिक वाचा: Adsali Sugarcane : आडसाली उसातील संजीकांच्या फवारण्या कधी व कशा कराव्यात वाचा सविस्तर