Join us

कागदी लिंबाला चांगला बाजारभाव मिळण्यासाठी कोणता बहार धरावा वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 12:05 PM

कागदी लिंबाला उन्हाळ्यात चांगला भाव मिळतो. म्हणून हस्तबहार घेणे व्यवसायीक दृष्टीकोनातून जास्त फायदेशिर ठरते. त्यामुळे बागायतदारांचा कल हस्तबहार घेण्याकडे आहे. हा बहार फायदेशीर असला तरी तो सहज घेता येत नाही.

कागदी लिंबूमध्ये तीन प्रकारचे बहार पहावयास मिळतात. जून-जुलैमध्ये येणाऱ्या बहारास आपण मृग, ऑक्टोबर- नोव्हेंबर मध्ये येणाऱ्या बहारास हस्तबहार व जानेवारी-फेब्रुवारीमध्ये येणाऱ्या बहारास आपण आंबिया बहार म्हणतो.

कागदी लिंबाची फळे तयार होण्यास साधारणपणे ४.५ ते ५ महिन्याचा कालावधी लागतो. कागदी लिंबात विशिष्ट बहार घेता येत असले तरी ते आर्थिकदृष्टया फायदेशीर ठरत नाही. एखादा विशिष्ट बहार घेण्यासाठी ताण दिला तर, त्यामुळे अगोदरच्या बहाराची फळे अपक्व स्थितीतच गळून जाण्याचा धोका संभवतो.

बहार घेतांना पाण्याची उपलब्धता, बहाराची फळे बाजारात येण्याचा हंगाम आणि मिळणारे बाजारभाव याचा प्रामुख्याने विचार करावा. हस्त बहाराची फुले ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात येतात.

हा बहार पावसाळा संपताच 'चित्रा' या नक्षत्रामध्ये तापणारे ऊन, होणारा उकाडा (ऑक्टोबरचे अधिक तापमान) यामुळे झाडाच्या वाढीवर परिणाम होवून काही कालावधीकरीता झाडाची वाढ थांबते, नंतर हिवाळ्यात थंडीला सुरूवात झाली की, कागदी लिंबूच्या झाडावर नवीन नवती सोबत फुले दिसू लागतात. या बहाराची फळे एप्रिल-मे महिन्यात काढणीस येतात.

कागदी लिंबाला उन्हाळ्यात चांगला भाव मिळतो. म्हणून हा बहार घेणे व्यवसायीक दृष्टीकोनातून जास्त फायदेशिर ठरते. त्यामुळे बागायतदारांचा कल हस्तबहार घेण्याकडे आहे. हा बहार फायदेशीर असला तरी तो सहज घेता येत नाही.

कारण लिंबूवर्गीय फळझाडांमध्ये साधारणतः आंबिया बहार ६० टक्के, मृग बहार ३० टक्के तर हस्त बहार फक्त १० टक्केच येतो. म्हणून हस्त बहार घेण्याकरीता शास्त्रीय दृष्टीकोन ठेवून बागेची मशागत, खत व्यवस्थापन, ओलित व्यवस्थापन आणि संजिवकाचा उपयोग करून हमखास बहाराची फुले आणणे आणि उत्पादनात वाढ करणे आवश्यक आहे.

हस्त बहार घेण्याकरीता लिंबू झाडावर मृग बहाराची फळे नसावीत याकरीता लिंबू झाडावर मृग बहार न येण्यासाठी सवय लावणे गरजेचे आहे. त्यामुळे मृग बहाराची फळधारणा होणार नाही किंवा कमी प्रमाणात येईल व नंतर हस्त बहार नियमित येत राहील.

हस्त बहार घेण्यासाठी उपाययोजना 

  • मृग बहराची फुलधारणा टाळण्यासाठी झाडाला १ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबरच्या दरम्यान ताण द्यावा. ताणामुळे झाडाला विश्रांती मिळते, झाडे सुप्त अवस्थेत जातात, झाडाची कायीक वाढ थांबते, मंदावते आणि कर्ब-नत्र गुणोत्तराचा योग्य प्रमाणात संचय होतो.
  • जिब्रेलीक अॅसिड ५० पी.पी.एम. (५ ग्रॅम १०० टक्के शुध्द जिब्रलिक घटक १०० लिटर पाण्यामध्ये) या संजिवकाची जून महिन्यामध्ये फवारणी करावी, अपेक्षीत परिणाम साधण्यासाठी फुलधारणेच्या १५ ते २० दिवस अगोदर फवारणी करणे आवश्यक आहे.
  • ताणाचे कालावधीत पाऊस येत असल्यास बऱ्याच वेळा ताण योग्य प्रकारे बसत नाही. यासाठी झाडे ताणावर सोडतांना सायकोसील १००० पी.पी.एम. (१ ग्रॅम १०० टक्के शुध्द घटक क्लोरोम्केकेट क्लोराईड १ लिटर पाण्यात किंवा २ मि.ली. लिहोसीन १ लिटर पाण्यात) या संजिवकाची सप्टेंबर महिन्यामध्ये फवारणी करावी.
  • आवश्यकता असल्यास १५ दिवसांनी हीच फवारणी पुन्हा करावी.
  • सायकोसिल हे वाढ मंदावक, जिब्रेलीन तथा इतर संजिवक विरोधात कार्य करते. त्यामुळे झाडांच्या आंतरीक गतिविधींचा दर कमी होऊन झाडे सुप्त अवस्थेत जातात, झाडाची कायिक वाढ थांबते, मंदावते आणि कर्ब-नत्र गुणोत्तराचा योग्य प्रमाणात संचय होतो.
  • ताण दिल्यानंतर बहार येण्याकरीता व फुलगळ रोखण्यासाठी अन्नद्रव्यांची त्वरीत उपलब्धता होणे आवश्यक असते. त्यासाठी पोटॅशियम नायट्रेट १ टक्का (१० ग्रॅम १ लिटर पाण्यात) द्रावणाची ऑक्टोबर महिन्यात पाण्याचा ताण तोडताच फवारणी करावी. यामुळे नत्र व पालाशची आवश्यकता त्वरीत पूर्ण करता येते.

अधिक वाचा: डाळिंब पिकात कोणत्या बहारात मिळते फळांचे अधिक उत्पादन वाचा सविस्तर

टॅग्स :फलोत्पादनफळेपाऊसबाजारशेतीशेतकरीखते