राज्याच्या मुख्य पिकांपैकी एक असलेल्या भात पिकावरील रोगाचे वेळीच नियंत्रण करणे गरजेचे आहे. जेणेकरून उत्पादनात वाढ होऊन अधिक उत्पन्न मिळू शकते. याचअनुषंगाने जाणून घेऊया भात पिकावरील रोग व्यवस्थापन कसे करावे.
भात पिकावरील रोग नियंत्रणासाठी रासायनिक खतांचा वापर शिफारशीत मात्रे प्रमाणेच करावा. नत्रयुक्त खते प्रमाणापेक्षा जास्त टाकू नयेत. अन्यथा करपा रोगाचे प्रमाण वाढते. खाचरात पाणी साचू न देता ते वाहते ठेवावे.
तसेच भात पिकावर रोग दिसताच पुढीलप्रमाणे बुरशीनाशकांच्या फवारण्या २ ते ३ आवश्यकतेनुसार १० ते १५ दिवसाच्या अंतराने कराव्यात तसेच द्रावणात स्टीकर १० मिली टाकून कराव्यात. जेणेकरून उत्तम परिणाम दिसून येतात.
भात पिकावरील रोग व्यवस्थापन
१. कडा करपा सोडून इतर रोगांच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम ५० % हेक्टरी ५०० ग्रॅम प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यातून फवारावे.
२. करपा आणि पर्णकोष कुजव्या रोगांच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम ५०% डब्ल्यु पी. ६.५ ग्रॅम किंवा हेक्साकोनाझोल ५ टक्के इ.सी. २० मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
३. तपकिरी ठिपके रोगाच्या नियंत्रणासाठी प्रोपिनेब ७०% डब्ल्यु पी. ३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
४. करपा, पर्ण कोष करपा आणि दाणे रंगहिनता या रोगांच्या नियंत्रणासाठी टेब्यूकोनॅझोल ५०% ट्रायफ्लॅक्झिसट्रोबिन कॉपर हायड्रॉक्साईड ५३.८% डी.एफ.३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून वापरावे.
५. कडा करपा रोगाच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड ५० डब्ल्यु पी. २५ ग्रॅम अधिक अॅग्रोमायसीन २ ग्रॅम अधिक स्टीकर १० मिली प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात रोग दिसताच फवारावे.
६. आभासमय काजळी आणि उदबत्ता रोगग्रस्त लोंब्या काढून त्यांचा नाश करावा. परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी रोगनियंत्रण एकत्रितपणे करावे.
डॉ. दत्तात्रय गावडे पीक संरक्षण विषयतज्ञ, कृषी विज्ञान केंद्र नारायणगावमो. नं. ९४२१२७०५१०