Join us

Rice Crop Management : 'या' पद्धतींचा वापर करून करा भात पिकावरील किड व्यवस्थापन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 5:24 PM

भात पिकावर महत्वाची किड म्हणजे खोडकिडा, लष्करी अळी, पाने गुंडाळणारी अळी, सुरळीतील अळी, तुडतुडे, भुंगेरे, लोंबीतील ढेकण्या इ. किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. तसेच महत्वाचे रोग म्हणजे करपा, पर्णकुजवा, पर्णकरपा, पर्ण कोष कुजव्या, दाणे रंगहिनता, कडाकरपा, आभासमय काजळी काळजी इ. आहेत.

भारतातील एकूण भात लागवडीपैकी जवळ जवळ ३५ टक्के क्षेत्र हे महाराष्ट्र राज्यात आहे. तसेच एकूण तृणधान्य उत्पादनापैकी ३५ टक्के उत्पादन हे महाराष्ट्र राज्यात आहे.

भात पिकावर महत्वाची किड म्हणजे खोडकिडा, लष्करी अळी, पाने गुंडाळणारी अळी, सुरळीतील अळी, तुडतुडे, भुंगेरे, लोंबीतील ढेकण्या इ. किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. तसेच महत्वाचे रोग म्हणजे करपा, पर्णकुजवा, पर्णकरपा, पर्ण कोष कुजव्या, दाणे रंगहिनता, कडाकरपा, आभासमय काजळी काळजी इ. आहेत.

भात पिकाच्या कापणीनंतर उन्हाळ्यात नांगरट करून काडीकचरा, धसकटे गोळा करून नाश करावीत जेणेकरून किडीच्या व रोगांच्या नियंत्रणात मदत होईल.

भात पिकावरील किड व्यवस्थापन

१. किड प्रतिकारक वाणांची लागवड करावी. भात शेतात परभक्षी किटकांचे संवर्धन करावे.

२. तपकिरी तुडतुडे, खोडकिडीसाठी इमिडाक्लोप्रीड १७.८ एस.एल. १२५ मिली किंवा फिप्रोनिल ५% एस.सी. १५०० मिली प्रति ५०० लिटर पाण्यात हेक्टरी फवारणी करावी.

३. पाने गुंडाळणारी अळी, खोडकिडा, तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्क ५ टक्के २५० मिली किंवा अॅसेफेट ७५ टक्के एस.पी ६०० ग्रॅम प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यातून फवारणी करावी.

४. लष्करी अळी व लोंबीतील ढेकण्याच्या नियंत्रणासाठी मिथील पॅराथिऑन २ टक्के भुकटी प्रति हेक्टरी २५ किलो धुरळणी करावी.

५. खोडकिडीच्या जैविक नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामा जापोनिकम या प्रजातीचे १ लक्ष प्रौढ प्रति हेक्टरी आठवडयाच्या अंतराने पीक लागणीनंतर एक महिन्यांनी चार वेळा प्रसारित करावीत.

६. पाने गुंडाळणाऱ्या अळीसाठी ट्रायकोग्रामा चिलेनिस या प्रजातीचे एक लक्ष प्रौढ प्रति हेक्टर आठवडयाच्या अंतराने वरील प्रमाणे चार वेळा प्रसारीत करावेत.

७. खाचरात खेकड्यांच्या बंदोबस्तासाठी हंगामाचे सुरवातीला विषारी अमिष वापरावे. त्यासाठी कार्बारील ५० टक्के डब्ल्यु.पी. ५० ग्रॅम किंवा अॅसिफेट ७५ टक्के एस.पी. ७५ ग्रॅम हे १ किलो शिजवलेल्या भातामध्ये मिसळून गोळ्या तयार करून खेकड्यांच्या बिळामध्ये टाकाव्यात व बिळे बंद करावीत.

८. उंदराच्या नियंत्रणासाठी शेताची खोल नांगरट करून बांधाची छटाई करावी व जुनी बिळे नष्ट करावीत. या बरोबरच १० ग्रॅम झिंक फॉस्फाईड २.५ टक्के १० मिली खाद्यतेलात मिसळून ३८० ग्रॅम भरड धान्यात एकत्रित करून गोळ्या कराव्यात व त्या विषारी अमिष म्हणून वापराव्यात.

वरील विविध पद्धतींचा वापर करत भात पिकावरील किड व्यवस्थापन करता येते. 

डॉ. दत्तात्रय गावडे पीक संरक्षण विषयतज्ञ, कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव मो. नं. ९४२१२७०५१० 

टॅग्स :भातपीक व्यवस्थापनशेतीशेती क्षेत्रनारायणगाव