Join us

Safflower Aphid : करडई पिकातील मावा किडीच्या नियंत्रणासाठी उपाययोजना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 12:07 PM

महाराष्ट्रात विशेषतः विदर्भामध्ये करडईच्या कमी उत्पादनाची कारणे म्हणजे कोरडवाहू लागवडी खालील क्षेत्र, विरळणीकडे दुर्लक्ष, रासायनिक खतांच्या मात्रेत बदल न करणे, बीज प्रक्रिया न करणे, योग्यवेळी संरक्षित ओलीत न करणे व मावा किडींचे व्यवस्थापन नीट न करणे ही आहेत.

करडी किंवा करडई हे रबी हंगामातील महत्वाचे पीक आहे. पावसाळ्यानंतर उपलब्ध ओलाव्यावर सुद्धा हे पीक चांगल्या प्रकारे येत असल्यामुळे इतर रबी पिकापेक्षा कोरडवाहू क्षेत्राकरीता हे पीक वरदान आहे. 

महाराष्ट्रात विशेषतः विदर्भामध्ये करडईच्या कमी उत्पादनाची कारणे म्हणजे कोरडवाहू लागवडी खालील क्षेत्र, विरळणीकडे दुर्लक्ष, रासायनिक खतांच्या मात्रेत बदल न करणे, बीज प्रक्रिया न करणे, योग्यवेळी संरक्षित ओलीत न करणे व मावा किडींचे व्यवस्थापन नीट न करणे ही आहेत.

मावा किड येण्याची कारणे व व्यवस्थापन

  • पेरणीच्या वेळेचा माव्याच्या प्रादुर्भावावर परिणाम होतो.
  • सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात पेरणी केल्यास मावा कीडीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो.
  • पेरणीस जसजसा उशीर होतो तसा माव्याचा प्रादुर्भाव वाढत जातो.
  • दूधी, गाजर गवत, लव्हाळा, चंदनबटवा, डेलिया, धोत्रा, बावची, पेटारी, कपाळफोडी या पर्यायी खाद्य तणांचा समूळ नाश करावा.
  • पेरणीपासुन ४० दिवसापर्यंत पिकात तण वाढू देवू नये.
  • लेडी बर्ड भुंगेरे आणि क्रायसोपा यांचे रक्षण करावे. हे दोन्ही किटक माव्यावर उपजीवीका करतात.
  • करडीवर सुरूवातीला माव्याचा प्रादुर्भाव धुऱ्याकाठी आढळून येताच चारी बाजुंनी ६ फुट रूंदीचे अंतरावर शिफारसीत आंतरप्रवाही किटकनाशकाची फवारणी करावी म्हणजे आठ दिवसानंतर शेतामध्ये आत पसरणारा प्रादुर्भाव रोखला जातो आणि किटकनाशकांच्या खर्चात बचत होते.
  • मावा किडीचे समुहाच्या सरासरी ३० टक्के झाडावर प्रादुर्भाव आढळून येताच, आर्थिक नुकसानीची संकेत पातळी गाठताच शिफारसीत केलेल्या कोणत्याही एका किटकनाशकाचा शेवटचा पर्याय म्हणुन वापर करावा.
  • मावा किडीच्या नियंत्रणासाठी ५% निंबोळी अर्क किंवा डायमिथोएट ३०% (१५ मिलि प्रति १० लिटर पाणी) किंवा थायमिथोक्झाम/अॅसिटामिप्रिड ३-४ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी किंवा अॅसिफेट १६ ग्रॅम/१० लिटर पाणी किंवा क्लोथायनिडीन १ ग्रॅम/१० लिटर यापैकी एक औषध पाण्यात मिसळून फवारावे. 
  • करडीला काटे असल्यामुळे व मोठ्या क्षेत्रात करडीची लागवड केली असल्यास मावा किडीचे नियंत्रण ड्रोनव्दारे फवारणी करून करता येईल.

अधिक वाचा: Harbhara Lagwad : जिरायत व बागायत हरभऱ्याच्या अधिक उत्पादनासाठी कधी करावी पेरणी

टॅग्स :करडईकीड व रोग नियंत्रणपीकपीक व्यवस्थापनशेती