बहीण नाही, असे सांगून माझ्या भावांनी आमच्या वडिलोपार्जित जमिनीच्या सातबारावर परस्पर स्वतःची नावे लावून घेतली आहेत, आता माझे नाव लावण्यासाठी काय करावे?
एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास तीन महिन्यांत वारस नोंदीसाठी अर्ज करावा लागतो. महाराष्ट्र सरकारच्या 'ई- हक्क' प्रणालीद्वारे घरबसल्या तो अर्ज करता येतो. अठराव्या दिवशी संबंधित व्यक्तीचा अर्ज व कागदपत्रे अचूक असल्यास त्यांची सातबारावर नोंद होते.
काहीवेळा कौटुंबीक बेबनावामुळे मृताचा वारस नेमका कोण, याविषयी अडचणी असतात. अशावेळी कायदेशीर वारस प्रमाणपत्र आवश्यक असते. त्यात कायदेशीर वारसांची नावे, मृत व्यक्तीशी त्यांचे संबंध आणि वारसातील त्यांचे संबंधित समभाग यांसारख्या तपशिलांचा समावेश असतो.
दस्तऐवज सक्षम प्राधिकाऱ्याद्वारे जारी केला जातो. प्रमाणित केलेला असतो आणि त्यावर अधिकृत शिक्का असतो. शेतजमीन ज्याच्या नावावर आहे त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना जमिनीचे हक्क मिळू शकतात. पण, त्यासाठी शेतजमिनीवर वारसांची नोंद करणे अत्यंत आवश्यक असते.
ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे, त्यांचे आकस्मिक निधन झाले तर भावंडांमध्ये वाद उद्भवतात. बहिणींची लग्न झाली आहेत किंवा त्या स्थिरस्थावर आहेत, या कारणांनी भावांकडून त्यांची नावे सातबारावर घेतली जात नाहीत, असा प्रकार उघडकीस आल्यास त्यासाठी सातबारा उतारा काढून त्यावरील डायरी मंजुरीची नक्कल घ्यावी लागते.
डायरी मंजुरीमध्ये सादर केलेल्या कागदांची तपासणी करून नेमके कोणाकोणाला वारस दाखवले आहे, याची स्पष्टता येते. यात कोणी वारस दाखवला गेला नसेल तर संबंधित वारस डायरी मंजुरी उतारा घेऊन तो रद्द करण्यासाठी प्रयत्न करू शकतो.
मंडलाधिकारी यांनी दिलेली मंजुरी तहसीलदार यांच्यापुढे सुनावणीद्वारे निकाली काढता येऊ शकते. ३० ते ९० दिवसांमध्ये हा निकाल येणे अपेक्षित असते. वारसांना आपण मृत व्यक्तीचे वारस असून, आपली नोंद मुद्दाम केली नसल्याचे सिद्ध करता आले तर तहसीलदारांच्या आदेशाने नोंद लागू शकते.
- प्रगती जाधव-पाटीलउपसंपादक, लोकमत
अधिक वाचा: Satbara Mother Name आता सातबाऱ्यावर लागेल आईचेही नाव