Join us

उन्हाळी हंगामात सूर्यफुल लागवड करून खाद्यतेलाचा खर्च वाचवा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 11:18 AM

सूर्यफूल या तेलबिया वर्गातील पिकाचे उत्पादन रब्बी तसेच उन्हाळी हंगामात शक्य आहे. पाण्याची व्यवस्था असलेल्या क्षेत्रावर सूर्यफूल लागवड करता येते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने जिल्ह्यातील हवामानानुसार सूर्यफुलामध्ये एकूण नऊ जाती प्रमाणित केल्या आहेत.

सूर्यफूल या तेलबिया वर्गातील पिकाचे उत्पादन रब्बी तसेच उन्हाळी हंगामात शक्य आहे. पाण्याची व्यवस्था असलेल्या क्षेत्रावर सूर्यफूल लागवड करता येते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने जिल्ह्यातील हवामानानुसार सूर्यफुलामध्ये एकूण नऊ जाती प्रमाणित केल्या आहेत. ८५ ते १२० दिवसांत तयार होणारे पीक असून, हेक्टरी १० ते १५ क्विंटल उत्पादन देणाऱ्या जाती आहेत.

लागवड करणाऱ्या क्षेत्राची उभी आडवी खोल नांगरणी करून जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणीपूर्वी हेक्टरी १० टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट जमिनीवर पसरून मातीत मिसळून द्यावे व जमीन समपातळीत आणावी. सूर्यफुलाची लागवड करताना मॉर्डन, एस. एस. ५६, ई. सी. ६९८७४, ई. सी. ६८४१३, ई. सी. ६८४१५, बी. एस. एच, सूर्या, एम. एस. एफ. एच. १ या सुधारित जातींची निवड करावी. ८५ ते १२० दिवसांत तयार होणाऱ्या जाती असून हेक्टरी १० ते १५ क्विंटल उत्पन्न देतात. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सूर्यफुलाची लागवड चांगल्या उत्पन्नासाठी फायदेशीर ठरते.

शुद्ध, प्रमाणित, वजनदार आणि निरोगी बियाणे लागवडीसाठी निवडावे. पीक काढणीनंतर तयार झालेले बियाणे लगेच पेरणीसाठी न वापरता हेक्टरी दहा ते बारा किलो वापरावे. पेरणीपूर्वी ते १२ तास पाण्यात भिजवून ते सावलीत वाळवावे. बियाण्याला प्रतिकिलो २५ ग्रॅम या प्रमाणात ट्रायकोडा हर्जिॲनम या जैवनियंत्रणाची बीज प्रक्रिया करावी.

अधिक वाचा: पाण्याचा ताण सहन करणाऱ्या कारळा पिकाची लागवड कशी कराल?

पिकाची पेरणी रब्बी हंगामात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात करावी तर उन्हाळी हंगामात फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत करावी. भारी जमिनीत पेरणी करताना दोन ओळीत ६० सेंटीमीटर अंतर ठेवावे. दोन झाडातील अंतर ३० सेंटीमीटर ठेवावे. एका ठिकाणी दोन दाणे पेरावेत. पेरणीनंतर १० ते १२ दिवसांनी विरळणी करून प्रत्येक ठिकाणी एक जोमदार रोप ठेवावे. रब्बी आणि उन्हाळी हंगामात पिकाला १० ते १२ दिवसांच्या अंतराने आठ ते नऊ वेळा पाणी द्यावे. वाफणी करून दाणे स्वच्छ करून वाळवावे.

आंतरमशागतीच्या कामात पेरणीनंतर वीस दिवसांनी कोळपणी करावी. पेरणीनंतर ३० ते ४० दिवसांनी एक बेणणी करावी. पिकाला मातीची हलकी भर द्यावी. सूर्यफुलाची बीजधारणा चांगली होण्यासाठी फुले उमलण्याच्या काळात ४ ते ६ दिवस रोज सकाळी ८ ते ११ च्या दरम्यान हातावर मलमल/तलम सुती कापड बांधून फुलावर हळूवारपणे हात फिरवावा किंवा शेतामध्ये मधमाश्यांच्या पेठ्या ठेवाव्यात. म्हणजे फुलातील बिया पूर्ण भरण्यास मदत होईल. वाळलेली फुले विळ्ळ्याने कापून उन्हात वाळवावीत. मशीनच्या साहाय्याने किंवा काठीने बडवून दाणे वेगळे करावेत. दोन ते तीन दिवस उन्हात दाणे वाळवावेत.

टॅग्स :सुर्यफुलपीकशेतीशेतकरीलागवड, मशागतपीक व्यवस्थापनविद्यापीठ