जमीनीतून तसेच बियाण्याव्दारे पसरणारे जीवाणूजन्य/विषाणूजन्य, बुरशीजन्य रोग व किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या रोगांचे वेळीच नियंत्रण करणे गरजेचे असून बीजप्रक्रिया हे अत्यंत प्रभावी साधन आहे.
बियाणे बदल कमी असलेल्या पिकांमध्ये शेतकऱ्यांकडील स्वतःचे बियाणे वापराचे प्रमाण जास्त असल्यामुळे या रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यात सन २०२३-२४ मध्ये तूर पिकावर मर रोग, सोयबीन पिकावर मोॉक या रोगांचा प्रादुर्भाव आढळून आला होता.
सदर रोगांमुळे शेतकऱ्यांच्या पीक संरक्षणावरील खर्च वाढून पिकाच्या उत्पादन खर्चात वाढ होत आहे तसेच पर्यायाने उत्पादनही घटत आहे. यासाठी बीजप्रक्रिया करणे महत्वाचे आहे. खरीपातील प्रमुख कडधान्यवर्गीय पिकांतील बीजप्रक्रिया कशी करावी ते पाहूया.
तूर
१) मर रोग, मुळकुज व खोडकुज साठी
ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम किंवा कार्बोक्झीम ३७.५ टक्के डब्ल्यू.एस. + थायरम ३७.५ टक्के डब्ल्यू. एस. २-३ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी.
२) नत्र स्थिरीकरणासाठी व स्फुरद उपलब्धते साठी
रायझोबियम आणि स्फुरद विरघळवणारे जिवाणू प्रत्येकी २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणामध्ये मिसळून चोळावे. बियाणे अर्धा तास सावलीत सुकवून पेरणी करावी.
३) पेरणीसाठी बियाणे साठविताना
पेरणीसाठी बियाणे साठविताना अॅझेंडिरेक्टीन ३०० पीपीएम (५ मिली/किलो) बियाण्यास बीजप्रक्रिया करावी.
मुग/उडीद
१) मर, मुळकुज
प्रति किलो बियाण्यास ५ ग्रॅम ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया करावी.
२) नत्र स्थिरीकरण व स्फुरद उपलब्धते साठी
रायझोबियम (चवळी गटाचे) आणि स्फुरद विरघळवणारे जिवाणू प्रत्येकी २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणामध्ये मिसळून चोळावे. बियाणे अर्धा तास सावलीत सुकवून पेरणी करावी.
अधिक वाचा: Tur Variety राहुरी कृषी विद्यापीठाने विकसीत केलेला नवीन तुरीचा वाण देतोय भरघोस उत्पादन