Sendriya Carbon जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी असेल तर आपण दिलेली अन्नद्रव्ये मोठ्या प्रमाणात तशीच राहतात. याउलट सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जितके जास्त असेल तितकी जमिनीची सुपीकता चांगली राहते.
सेंद्रिय कर्बाचे प्रमाण आदर्श असेल तर आपण दिलेल्या सेंद्रिय व रासायनिक स्वरूपातील मुख्य व दुय्यम अन्नद्रव्ये यांची उपयोगिता वाढून ती पिकांना मोठ्या प्रमाणात घेता येतील.
सेंद्रिय कर्ब हे जमिनीच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. सेंद्रिय कर्ब हे मातीतील पिकांच्या वाढीसाठी झटणाऱ्या जिवाणूंचे खाद्य आहे. जमिनीत जर सेंद्रिय कर्ब जास्त असेल तर जमिनीत पाणी मुरून ओलावा टिकून राहतो व माती भुसभुशीत राहते.
जमिनीच्या रासायनिक, जैविक व भौतिक गुणधर्मामध्ये सुधारणा होते. सेंद्रिय पदार्थ मातीच्या वस्तुमानापैकी केवळ २ ते १० टक्के एवढ्याच प्रमाणात असतात. सेंद्रिय पदार्थातील कर्ब जमिनीतील अन्नद्रव्ये टिकवून ठेवण्यासाठी व पिकांना अन्नद्रव्ये उपलब्ध होण्यासाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे.
मातीची जडण घडण, पाण्याची उपलब्धता, पाणी मातीत टिकवून ठेवण्याची क्षमता, मातीची लवचिकता व मातीतील प्रदुषकांचे विघटन तसेच सेंद्रिय कर्ब हे मातीत असलेल्या असंख्य सूक्ष्म जीवांचे अन्न पण आहे.
सेंद्रिय कर्ब कमी का होतो ?
आपल्याकडे असलेल्या जास्त तापमानामुळे सेंद्रिय कर्बाचे ऑक्सिडेशन होते. म्हणजे सूर्याची प्रखर उष्णता व प्राणवायूमुळे सेंद्रिय कर्बाचे ज्वलन होते. आपल्याकडे असलेल्या भौगोलिक परिस्थितीमुळे आपल्या जमिनीत सेंद्रिय कर्बाची मात्रा अत्यंत कमी ०.२ टक्के पासून ते जास्तीत जास्त ०.६ टक्क्यांपर्यंत आहे.
सेंद्रिय कर्ब वाढविण्याचे उपाय
▪️सेंद्रिय खताचा जास्तीत जास्त वापर करावा.
▪️पिकांचे अवशेषांचे आच्छादन म्हणून वापर करावा.
▪️पिकांचे अवशेष न जाळता जमिनीत गाडावे.
▪️पीक पद्धती व आंतरपीकमध्ये कडधान्य पिकांचा समावेश करावा.
▪️हिरवळीचे पीक धैंचा किंवा बोरू जमिनीत गाडावा.
▪️मृद व जल संधारण करून जमिनीची धूप टाळावी.
▪️वखराच्या शेवटच्या पाळी अगोदर सेंद्रिय किंवा कंपोस्ट खताचा वापर करावा.
▪️जैविक खताचा वापर वाढवावा व तसेच त्यांचा वापर शेणखतात मिसळून व बीजप्रक्रियेसाठी करावा.
▪️खतांची मात्रा संतुलित, योग्य वेळी व योग्य प्रकारे द्यावी.
▪️एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा वापर करावा.
जैविक गुणधर्मात सुधारणा
▪️जमिनीतील सूक्ष्म जीवाणू मुख्यतः सेंद्रिय पदार्थ कुजविण्याचे व पिकाला अन्न पुरवठा करण्याचे काम करतात.
▪️यातील पहिला गट जमिनीला सुपीकता देत असतो तर दुसरा पिकाला पोषण पुरविण्यात (अन्न पोषणात जीवाणू अॅक्टीनोमायसीट्स व बुरशीच्या अनेक जाती प्रजाती) कार्यरत असतो.
▪️सेंद्रिय पदार्थ कुजविण्याच्या क्रियेतून अनेक सेंद्रिय आम्ल, संजीवके व वाढ वृद्धिंगत करणारे पदार्थ तयार होत असतात.
▪️जमिनीतील वेगवेगळ्या प्रकारच्या जिवाणूंना सेंद्रिय कर्बाद्वारे ऊर्जा पुरविली जाते त्यामुळे कार्यक्षमता चांगली होऊन अन्नद्रव्याची उपलब्धता वाढते.
अधिक वाचा: एक आड एक सरीत उसाचे पाचट ठेवले तर काय होतील फायदे; वाचा सविस्तर