Join us

Til Sowing उत्पन्नाची अधिक हमी असलेले खरीपातील तीळ लागवड तंत्रज्ञान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2024 11:29 AM

तंत्र खरीप तीळ लागवडीचे…

तीळ हे भारतातील सर्वात जुने तेलबिया पीक आहे. तीळ उत्पादन व लागवडीच्या क्षेत्रात जगात भारताचा प्रथम क्रमांक लागतो. तिळाच्या तेलास खाद्य तेल व औषधी तेल म्हणून जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे. तीळ हे पीक दुबार, मिश्रपीक व आंतरपीक पद्धतीसाठी उपयुक्त ठरते. तसेच आपत्कालीन परिस्थितीत आपण लागवड करु शकतो.

तसेच सलग पेरणी करताना योग्य व्यवस्थापनाद्वारे चांगले उत्पादन तीळ लागवडीतून मिळू शकते. म्हणुन सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करुन तीळ लागवडीस प्राधान्य द्यावे. तीळ हे पीक कमी कालावधीत येत असल्याने दुबार पिक पद्धतीसाठी योग्य आहे.

तिळाचे महत्व

• तिळामध्ये तेलाचे ५० टक्के व प्रथिनांचे २५  टक्के प्रमाण असते.• दिर्घकाळ चांगले टिकते, खवट होत नाही. पेंडीत प्रथिने ३५ ते ४५ टक्के व तेलामध्ये ज्वलनविरोधक घटक सिसमोल, सिसॅमोलीन.• कॅल्शिअम, फॉस्फरसचे चांगले प्रमाण, पशू व कोंबडीसाठी पेंड उत्तम खाद्य.• तिळापासून चटणी व तिळगुळही तयार केला जातो.• तिळाचा साबण, रंग, वनस्पती तूप, औषधी तेल व सुगंधी तेल म्हणून तयार करण्यासाठीही उपयोग होतो.• तीळ या पिकाचे मूळ स्थान भारत असून त्याला तेल बियांची राणी असे आपण संबोधतात.

पूर्वमशागत व जमीन

एक नांगरणी करुन २ ते ३ कुळवाच्या पाळ्या देवून जमीन चांगली भुसभुसीत करावी. त्यानंतर मैंद फिरवून जमीन सपाट करावी व दाबून घ्यावी. यामुळे पेरणी चांगली होवून उगवणसुध्दा चांगली होते. तीळ या पिकास मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी व खरिपात पाणी साचणार नाही अशी जमीन टाळावी.

बियाणे प्रमाण

पेरणीसाठी हेक्टरी २.५ ते ३ किलो (एकरी १ किलो) बियाणे वापरावे.

बीज प्रकिया

पेरणीपूर्वी थायरम किंवा कार्बन्डाझिम २.५ ते ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे प्रमाणे बियाण्यास चोळावे किंवा ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास वापरावे. त्यानंतर २५ ग्रॅम ॲझोटो बॅक्टर प्रति किलो बियाणे या प्रमाणात लावावे. त्यामुळे बियाणांची उगवण चांगली होऊन उत्पादनात वाढ होते. 

हंगाम

तीळ हे पीक खरीप, उन्हाळी, अर्धरब्बी या सर्व हंगामात घेता येते.

पेरणीची वेळ

मान्सूनचा पाऊस झाल्यावर आणि योग्य वाफसा आल्यावर जूनच्या शेवटचा किंवा जुलैचा पहिला आठवड्यात पेरणी करावी.

पेरणीचे अंतर

४५ x १० से.मी. किंवा ३० x १० से.मी. अंतरावर अनुक्रमे ४५ से.मी. अंतराच्या पाभरीने पेरणी करावी. पाभरीने पेरणी करताना तिळाचे बियाणे फार बारीक असल्यामुळे त्यात समप्रमाणात वाळू, राख, माती किंवा शेणखत (गाळलेले) मिसळावे.

आंतरपिक

या पीक पद्धतीमध्ये तीळ + सोयाबीन, (३:१) तीळ + तुर (२:१), तीळ + कापुस (३:१), तीळ + मुग (३:३), तीळ + ज्वारी (३:१) याप्रमाणात ओळीमध्ये पेरणी फायदेशीर ठरते.

नांगे भरणे / विरळणी

पेरणी नंतर ७ ते ८ दिवसांनी नांगे भरावेत. पेरणी नंतर १५ ते २० दिवसांनी पहिली व त्यानंतर ८ दिवसांनी दुसरी विरळणी करुन दोन झाडात १० ते १५ से.मी. अंतर राखावे. जेणेकरुन हेक्टरी रोपांची संख्या योग्य राहील.

खताची योग्य मात्रा

पूर्वमशागतीवेळी प्रति हेक्टरी ५ टन चांगले कुजलेले शेणखत वापरावे. प्रति हेक्टरी २५ किलो नत्र व २५ किलो स्फुरद द्यावे. परेणीवेळी अर्धेनत्र व संपूर्ण स्फुरद द्यावे. उर्वरित नत्र पेरणीनंतर ३० दिवसांनी द्यावे. सुक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास पेरणीवेळी २० किलो गंधक प्रति हेक्टरी द्यावे.

विशेष बाब

• भारी जमिनीत १२ ओळीनंतर लगेच बी झाकण्यापूर्वी दोन ओळीच्या मध्ये (फटीत) बळीराम नांगराचे सहाय्याने चर काढावेत. यामुळे पडलेल्या पावसाचे पाणी जमिनीत मुरेल व अतिरिक्त पाणी बाहेर निघून जाण्यास मदत होईल. व मुरलेल्या पाण्याचा पावसाच्या ताणावेळी पिकास फायदा होतो.

• तसेच अधिक उत्पादनासाठी २ टक्के युरीयाची फवारणी पिक फुलोऱ्यात आणि बोंडे वाढीच्या अवस्थेत असतांना करावी.

• हे पीक प्रामुख्याने जिरायत क्षेत्रात घेतले जाते. पाण्याची सोय असल्यास व पावसात जास्तीचा खंड पडल्यास फुले व बोंडे मध्ये दाणे भरताना संरक्षित पाणी द्यावे.

योग्य जातीची निवड

अ.क्र.जातकालावधीउत्पादन क्विंटल/हेवैशिष्टये
एकेटी – ६४८५-९०५ ते 9दाण्याचा रंग पांढरा, मळकट, तेलाचे प्रमाण ४७ - ४८%
आर टी – ३४६८२-८६७.५ ते ८.५तेलाचे प्रमाण ४९ - ५२%
जे.एल.टी. – ७ (तापी)८०-८५६ ते ७पांढरा दाणा, खान्देश, मराठवाडा जालना व छत्रपती संभाजीनगर क्षेत्रास योग्य
फुले तीळ नं. १९०-९५५ ते  ६संपूर्ण महाराष्ट्रासाठी शिफारस
जे.एल.टी. - ४०८ ८०-८५७.५ ते ८

हमखास पाऊस पडणारे, खान्देश, लगत चे विदर्भ, मराठवाडा विभाग या क्षेत्रात खरीप हंगामास योग्य

काढणी व उत्पादन

साधारण हे पीक ८० ते ९५ दिवसात काढणीस येते. काढणी लवकर केल्यास बोंडातील तीळ पोचट व बारीक राहून उत्पादनात घट येते. काढणी उशीरा केल्यास बोंडे फुटून तीळ शेतात गळून पडते. म्हणून वेळेवर काढणी करावी.

उत्पादन

हेक्टरी ६ ते ७ क्विंटल जिरायत क्षेत्रात मिळते.

लेखक प्रा. संजय बाबासाहेब बडे सहाय्यक प्राध्यापक (कृषिविद्या)दादासाहेब पाटिल कृषि महाविद्यालय दहेगांव ता. वैजापूर जि. औरंगाबाद पिन ४२३७०३ (व.ना.म.कृ.वि.परभणी) मो.नं. ७८८८२९७८५९.

टॅग्स :पीक व्यवस्थापनखरीपविदर्भशेतकरीशेतीपाऊसपेरणी