जमिनीला सेंद्रिय खत वापरावयाचे म्हणजे शेणखत कंपोस्ट खताचा वापर करणे असे शेतकरी वर्गात एक समीकरणच बनून गेले आहे.
शेणखत जनावरांच्या शेणापासून तयार होते, तर कंपोस्टमध्ये शेणाबरोबर इतर काडीकचरा काही प्रमाणात असतो. शेतकऱ्यांना विचारले, शेणखत चांगले की कंपोस्ट, तर उत्तर येईल शेणखत सर्वांत चांगले.
शेणखतावर शेतकऱ्यांची अपार श्रद्धा आहे. शेतीशास्त्र अगर शेती खात्याची ही अशीच शिफारस आहे की, जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी ४० आरसाठी २० ते २५ गाड्या शेणखत टाकून ते मातीत मिसळून घ्यावे, एकेकाळी माझीही अशीच श्रद्धा होती.
मी यासाठी शवघरचे व शक्य तेथून विकत आणून जास्तीत जास्त खत तयार करून वापर करीत असे. शेतकरी वर्गात एक अशी (गैर) समजूत आहे की, एकदा भरपूर शेणखत टाकले की, परत २-३ वर्षे टाकण्याची गरज नाही. याच विचारसरणीत शेतीत माझी २०-२५ वर्षे गेली.
१५-२० वर्षांनंतर जमिनीतील सूक्ष्मजीवावर आधारित शास्त्राचा अभ्यास केला या शास्त्राने काही नवीनच गोष्टी शिकविल्या. शेणखत आपण जमिनीच्या बाहेर कुजवितो ते चुकीचे आहे. सेंद्रिय पदार्थ थेट जमिनीतच कुजला पाहिजे व जितका जास्त काळ कुजत राहील तितके चांगले.
पारंपरिक खत वापराच्या पूर्ण विरुद्ध दिशेचा हा विचार होता. परंतु त्यावर चिंतन केल्यावर तो पटला व मी एक सेकंदात शेणखत वापराला रामराम केला.
या विषयाचा सविस्तर अभ्यास केल्यानंतर शेणखत वापराच्या अनेक मर्यादा लक्षात आल्या.
१) शेणखत गरजेइतके उपलब्ध नाही.
२) उपलब्धतेपेक्षा मागणी जास्त यामुळे महाग आहे.
३) गरजे इतके घरी जनावरे पाळून तयार करणे शक्य नाही.
४) व्यवस्थापनासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ लागते, ज्याची आज प्रचंड टंचाई आहे.
५) कुजण्याच्या क्रियेतून अनेक सेंद्रिय आम्ले तयार होतात. जमिनीबाहेर खत तयार केल्यास त्यांना तेथे काम नसल्याने ती संपून जातात. यामुळे जमिनीत अल्कता वाढते. बऱ्याच जमिनीमध्ये सामू ८-९ पर्यंत पुढे गेलेला दिसेल.
६) सेंद्रिय पदार्थ कुजत असता काही डिंकासारखे पदार्थ तयार होतात. यातून जमिनीची कणरचना तयार होत असते. कणरचनेचा संबंध जमिनीच्या निचराशक्तीशी आहे. यामुळे अनेक ठिकाणी निचऱ्याचे प्रश्न तयार झाल्याचे दिसून येते. बाहेर कुजण्याची क्रिया केल्यास हे पदार्थही काम नसल्यामुळे संपून जातात.
७) कुजण्याच्या क्रियेतून काही वाढ वृद्धिंगत पदार्थ तयार होत असतात. बाहेर त्यांना काम नसल्याने ते संपून जातात. हेच पदार्थ प्रयोगशाळेत कृत्रिमरित्या तयार करून १०००-१२०० रु. लिटर दराने विकले जातात आज अनेक शेतकरी असे पदार्थ विकत आणून मारताना दिसतात.
८) शेणखत ६-७ महिन्यांत कुजून तयार होते. इथे कुजण्यास जास्त वेळ लागणारे पदार्थ वापरता येत नाहीत. यामुळे खताचा दर्जा सुमार होतो.
९) कुजण्याची क्रिया करणारे जिवाणू जमिनीबाहेर वाढतात व तेथेच संपून जातात. हेच जिवाणू जमिनीला सुपीकता देतात. यामुळे सुपीकता देणान्या जिवाणूंचे जमिनीतील अस्तित्व धोक्यात येते. चांगले कुजलेले खत हे अन्नद्रव्ये उपलब्ध करून देणाऱ्या जिवाणूंचे अन्न आहे. त्यांचे काम होते. पिकाला अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. परंतु जैवविविध्य बिघडते.
१०) केवळ शेण व गदाळा कुजवत असता कुजण्यास जड असणारे पदार्थ कुजविले जात नाहीत. यामुळे जमिनीला शाश्वत सुपीकता मिळत नाही.
- प्रताप चिपळूणकर
कृषीतज्ज्ञ, कोल्हापूर
अधिक वाचा: अवशेष कुजविण्याची 'ही' योग्य पद्धत राबवा; एकाच वर्षात ५०% उत्पादन वाढ मिळवा