महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये उन्हाळी हंगामात ओलिताची सोय मर्यादित प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे भुईमुग पिकाऐवजी बाजरी लागवडीचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे.
उन्हाळी हंगामात हे पिक घेण्याची प्रमुख कारणे पुढील प्रमाणे
१) भुईमुगाच्या तुलनेत बाजरी हे पीक कमी कालावधीत तयार होते आणि ५ ते ६ पाण्याच्या पाळ्या देऊन घेता येते.
२) उन्हाळ्यात पिकास भरपूर सुर्यप्रकाश, वेळेवर आणि गरजेनुसार पाणी तसेच कीड-रोगाचा प्रादुर्भाव होत नसल्यामुळे धान्य आणि चारा उत्पादन जास्त मिळते.
३) उन्हाळ्यात दुभत्या तसेच इतर जनावरांसाठी लागणाऱ्या चाऱ्याचा प्रश्न सोडविला जातो.
सुधारीत तंत्राचा वापर केल्यास या पिकाचे भरघोस उत्पादन मिळू शकते.
जमीन
उन्हाळी बाजरी पिकास पाण्याचा उत्तम निचरा होणारी हलकी ते मध्यम जमीन निवडावी. जमिनीचा सामु हा ६.२ ते ७.७ असावा.
पुर्व मशागत
जमिनीची लोखंडी नांगराने १५ सेंमीपर्यंत खोल नांगरट करावी व जमीन उन्हात तापू द्यावी. जमीन चांगली तापल्यानंतर, कुळवाच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. पूर्वी घेतलेल्या पिकाचे धसकटे, काडी-कचरा, हरळी, कुंदा वेचून शेत स्वच्छ करावे. शेवटच्या कुळवणी अगोदर हेक्टरी ५ टन शेणखत किंवा २.५ टन गांडूळ खत शेतात पसरवुन टाकावे म्हणजे कुळवणी बरोबर ते जमिनीत समप्रमाणात मिसळले जाते.
पेरणीची वेळ
बाजरीची पेरणी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या दरम्यान केल्यास उत्पादन अधिक मिळते. जानेवारी महिन्यात तापमान १०सें ग्रे. पेक्षा खाली गेलेले असल्यामुळे त्याचा उगवणीवर अनिष्ट परिणाम होतो. अशा परिस्थितीत पेरणी थंडी कमी झाल्यावर करावी. मात्र उन्हाळी बाजरी लागवड ५ फेब्रुवारीनंतर करू नये कारण पीक पुढील उष्ण हवामानात सापडण्याची भीती असल्याने कणसात दाणे भरण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे उत्पादनात घट येते.
बियाणे आणि बीजप्रक्रिया
पेरणीसाठी हेक्टरी ३ ते ४ किलो चांगले निरोगी बियाणे वापरावे. अरगट आणि गोसावी रोगाच्या नियंत्रणासाठी बिजप्रक्रिया केलेले प्रमाणित बियाणे वापरावे.
अ) २० टक्के मिठाच्या द्रावणाची बिजप्रक्रिया (अरगट रोगासाठी)
बिजप्रक्रिया केलेले प्रमाणित बियाणे उपलब्ध नसल्यास पेरणीपूर्वी बियाण्यास २० टक्के मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया करावी. त्यासाठी १० लिटर पाण्यात २ किलो मीठ विरघळावे. पाण्यावर तरंगणारे बुरशीयुक्त हलके बियाणे बाजुला काढून त्याचा नाश करावा व तळाला असलेले निरोगी आणि वजनाने जड असलेले बियाणे वेगळे करुन पाण्याने २ ते ३ वेळा धुवावे त्यानंतर सावलीत वाळवून पेरणीसाठी वापरावे.
ब) मेटॅलॅक्झील ३५ एसडी (ॲप्रॉन) बिजप्रक्रिया (गोसावी रोगासाठी)
पेरणीपूर्वी बियाण्यास ६ ग्रॅम मेटॅलॅक्झील ३५ एसडी (अॅप्रॉन) प्रति किलो बियाण्यास चोळून नंतर पेरणी करावी.
क) अझोस्पिरीलम व स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धनाची बिजप्रक्रिया
२५ ग्रॅम अझोस्पिरीलम प्रति किलो बियाण्यास चोळून पेरणी करावी. त्यामुळे २० ते २५ टक्के नत्र खताची बचत होऊन उत्पादनात १० टक्के वाढ होते. तसेच स्फुरद विरघळविणारे जिवाणूची २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
सुधारित व संकरित जाती
उन्हाळी हंगामासाठी बाजरीच्या सुधारित व संकरित वाणांची जमिनीच्या मगदुराप्रमाणे पेरणी करावी. त्यासाठी जी.एचबी. ५५८ तसेच खासगी कंपन्यांचे प्रोॲग्रो ९४४४, ८६ एम १३, ८६ एम ६४, ८६ एम ६६, एन.एम.एच.७३, एन.एम. एच. ७५ या संकरित वाणांची लागवड करावी. तर सुधारित वाणामध्ये धनशक्ती (आय.सी.टी.पी८२०३ लोह१०.२) व आय.सी.एम.व्ही.२२१ या वाणाची लागवड करावी. तसेच खासगी कंपन्यांचे ८६ एम ६४, ८६ एम ८६, एनवीएच-५७६७, प्रताप व कावेरी सुपर बॉस, या संकरित वाणांची लागवड करावी. कारण हे वाणसुद्धा जास्त उत्पादन (धान्य आणि चारा) देणारे असून केवडा रोगास प्रतिकारक्षम आहेत.
अधिक वाचा: बहुउपयोगी उन्हाळी मुगाची सुधारित पद्धतीने लागवड कशी करावी?
पेरणीची पध्दत
पेरणीपुर्वी शेत ओलवुन वापसा आल्यावर करावी. जमिनीच्या उतारानुसार ५ ते ७ मीटर लांबीचे व ३ ते ४ मीटर रंदीचे सपाट वाफे तयार करावेत. पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी व दोन ओळीत ४५ से. मी. आणि दोन रोपांमध्ये १५ से. मी. अंतर ठेवावे (हेक्टरी सुमारे १.५० लाख रोपे) पेरणी ३ ते ४ सेंमी पेक्षा जास्त खोलीवर करु नये.
रासायनिक खताचा वापर
माती परीक्षणानुसारच रासायनिक खते द्यावीत. मध्यम जमिनीसाठी हेक्टरी ५० किलो नत्र, २५ किलो स्फुरद आणि २५ किलो पालाश व हलक्या जमिनीत ४० किलो नत्र, २० किलो स्फुरद आणि २० किलो पालाश खतांचा अवलंब करावा. पेरणीचे वेळी अर्धे नत्र व संपूर्ण स्फुरद आणि पालाश द्यावे. तद्नंतर २५ ते ३० दिवसांनी अर्धे नत्र द्यावे. तसेच या जमिनीत झिंकची कमतरता असेल त्या जमिनीत हेक्टरी २० किलो झिंक सल्फेट पेरणी करताना द्यावे.
विरळणी
हेक्टरी रोपाची संख्या योग्य व मर्यादित राहण्याकरिता पेरणीनंतर २० दिवसांनी विरळणी करावी. दोन रोपातील अंतर १० सेंमी ठेवावे. उगवण विरळ झाल्यास उगवणी नंतर ७-८ दिवसांनी नांगे भरुन घ्यावे.
आंतरमशागत/तण नियत्रंण
तणांचा बंदोबस्त करण्यासाठी २ वेळा कोळपण्या आणि गरजेनुसार एक ते दोन वेळा खुरपणी करावी. पेरणी केल्यापासून सुरूवातीचे ३० दिवस शेत तण विरहीत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. कारण याच कालावधीत तण व पीक यांच्यात हवा, पाणी, अन्नद्रव्ये आणि सूर्यप्रकाश मिळविण्यासाठी स्पर्धा होत असते किंवा एकात्मिक तण नियंत्रण पध्दतीमध्ये अॅट्राझिन तणनाशकाची १.० किलो प्रति हेक्टरी पेरणीनंतर परंतु पीक उगवण्यापूर्वी ५०० लिटर पाण्यात मिसळुन जमिनीवर फवारणी करावी व एक खुरपणी पेरणीनंतर २५-३० दिवसांच्या आत करावी.
पाणी व्यवस्थापन
उन्हाळी बाजरी पिकास ३५ ते ४० सें. मी. पाण्याची गरज असते. पेरणीनंतर ४ दिवसांनी हलके पाणी द्यावे. त्यानंतर जमीनीच्या मगदुरानुसार १० ते १२ दिवसांच्या अंतराने ५ ते ६ पाण्याच्या पाळ्या द्याव्या. पाण्याची उपलब्धता असल्यास खालील संवेदनक्षम अवस्थेत पाणी दिल्यास अधिक उत्पादन मिळू शकते. पहिले पाणी फुटवे येण्याच्या वेळी (पेरणीनंतर २० ते २५ दिवसांनी), दुसरे पाणी पीक पोटरीत असताना (पेरणीनंतर ३५ ते ४५ दिवसांनी) आणि तिसरे पाणी दाणे भरते वेळी (पेरणीनंतर ६० ते ६५ दिवसांनी) द्यावे.
काढणी व मळणी
हातात कणीस दाबले असता त्यातुन दाणे सुटणे तसेच दाताखाली दाणा चावल्यानंतर कट्ट असा आवाज आल्यास पिक कापणीस योग्य आहे असे समजावे. ताटाची कणसे विळ्याने कापून गोळा करुन वाळवून मळणी यंत्राणे मळणी करावी.
उत्पादन
वरील सुधारित तंत्राचा अवलंब केल्यास धान्याचे हेक्टरी ४० ते ४५ क्विंटल आणि चाऱ्याचे ७ ते ८ टन उत्पादन मिळू शकते.
बाजरी संशोधन योजना
कृषि महाविद्यालय, धुळे