डाळिंब बागेत पुरेपूर विश्रांती आणि ताण मिळाला असेल, त्या बागेत चांगली फुलधारणा होते. हलक्या जमिनीसाठी फळ काढणीनंतर २-३ महिन्याची विश्रांती दिली पाहीजे त्यापाठोपाठ १ महिन्यांचा ताण दिला पाहीजे तसेच काळ्या जमिनीसाठी १.५-२ महिन्याचा ताण आवश्यक असतो.
डाळिंब बागेत चांगल्या फुलधारणेसाठी काय करावे?
- विश्रांती काळात फळ तोडणीनंतर लगेच बागेतील गुंतागुंत झालेल्या, वाळलेल्या फांद्या आणि झाडाचे शेंडे छाटावेत.
- झाडाला अर्धी शेणखताची मात्रा, अर्धी पालाशची मात्रा, अर्धी स्फूरदची मात्रा आणि १/३ (तिसरा भाग) नत्राची मात्रा शिफारस केलेल्या प्रमाणे द्यावेत.
- नंतर अन्नद्रव्यांचा पुरवठा होण्यासाठी व झाडे जतन होण्यासाठी नियमितपणे पाणी द्यावे.
- ताण काळात जोपर्यत झाडाची पाने पिवळी पडुन पडत नाहीत, तोपर्यंत पाणी देणे बंद करावे.
- ओलावा नियमित ठेवण्यासाठी गरजेपुरतेच पाणी द्यावे.
- भारी जमिनीत ताण लवकर मिळावा म्हणून झाडाची मुळे खुरप्याच्या सहाय्याने उघडी करावीत.
- १०-१५ सेमी लांबपर्यंत फांद्यांची हलकी छाटणी करावी त्यानंतर ताणाच्या तीव्रतेनुसार पानगळ करण्यासाठी इथेफॉन ३९% @ १-२ मि.ली./ली. फवारावे.
- जेवढा जास्त ताण मिळेल तेवढी इथेफॉनची मात्रा कमी लागेल.
- जेव्हा सर्व पाने गळाली असतील, तेव्हा फुलधारणेसाठी इथेफॉन ०.५ मि.ली./ली. पुरेसे असेल.
- इथेफॉन सोबत डीएपी ५ ग्रॅ/लि वापरले असता, चांगला परिणाम होतो.
- पानगळ केल्यामुळे समप्रमाणात फुलधारणा होणे.
जर वरील सर्व गोष्टी सुरळीतपणे केल्या तर २२-२८ दिवसात फुलधारणेस सुरवात होते आणि ४५ ते ५० दिवसात फुलधारणा पुर्ण होते.
अधिक वाचा: डाळिंब पिकात कोणत्या बहारात मिळते फळांचे अधिक उत्पादन वाचा सविस्तर