ग्राहक आणि शेतकरी दोघांनाही कांदा रडवत असतो. कारण कांदा काढणी केल्यानंतर जास्त काळ टिकत नाही, काढणीनंतर आपण साठवणुकीत ठेवल्यानंतर येणारा खर्च आणि त्यानंतर कांदा सडणे टक्केवारी मोठ्या प्रमाणात आहे. कांदा काढणी आणि प्राथमिक प्रक्रिया यात कांदा कधी काढावा? तो कसा कापावा व कसा वाळवावा? हे शास्त्रीयदृष्ट्या समजून घेतले तर काढणीपश्चात येणारा खर्च आणि कांदा सडण्याचे प्रमाण कमी होवू शकते.
योग्य साठवण कांदा साठवणुकीत तसेच हाताळणीत वेगवेगळ्या कारणांमुळे ५० ते ६० टक्के कांदा खराब होतो. साठवणीत कांदा खराब होण्याची कारणे म्हणजे कांद्याच्या वजनात होणारी घट, कांदा नासल्यामुळे होणारी घट व कांद्याला कोंब आल्यामुळे होणारी घट या कारणामुळे कांदा खराब होतो. साठवणुकीच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे मे ते जुलै महिन्यात वातावरणातील तापमान व आर्द्रता जास्त असते. तेव्हा वजनातील घट व सडण्याची क्रिया यामुळे कांद्याचे नुकसान जास्त होते. साठवणुकीच्या नंतरच्या काळात म्हणजे ऑगष्ट ते नोव्हेंबर महिन्यात जेव्हा तापमान खाली येते व आर्द्रता वाढते तेव्हा कांद्याना कोंब येण्याचे प्रमाण जास्त दिसून येते.
योग्य वाणांची निवड कांद्याच्या साठवणुकीसाठी काही उत्कृष्ट जाती आहेत उदा. एन-२-४ -१, ॲग्रीफाउंड लाईट रेड या सुधारीत जातीचे मे ते नोव्हेंबर या सहा महिन्यांच्या साठवणुकीतील नुकसानीचे प्रमाण इतर जातींपेक्षा फार कमी असते. तरीही ते साधारणपणे ३६ ते ५१ टक्के आढळते.
योग्य हाताळणी तंत्र साठवणुकीत कांद्याची होणारी नासाडी थांबविण्याच्या दृष्टिने कांद्याची जात, उत्पादन तंत्र, काढणी, सुकविणे, हाताळणी, साठवण्याची पध्दत, वातावरणातील तापमान आणि आर्द्रता या गोष्टी महत्वाच्या आहेत. कांद्याचे मध्यम वजन, गोलसर आकार, घट्ट बारीक मान, सलग घट्टपणे चिकटलेला पापुद्रा हे गुणधर्म असलेल्या जाती चांगल्या टिकतात.
योग्य आकार कांद्याचा आकार हा सुध्दा साठवणुकीवर परिणाम करतो. फार लहान किंवा मोठ्या आकाराच्या कांद्यांना लवकर कोंब फुटून ते खराब होतात. त्यामुळे मध्यम आकाराचे कांदे, (४.५ ते ५.५ से.मी. व्यासाचे) साठवणुकीसाठी उत्तम असतात. साठवणुकीसाठी कांदा निवडून मध्यम आकाराचा, घट्ट मिटलेल्या मानेचाच वापरावा. जाड मानेचे व मोठया आकाराच्या कांद्यामध्ये नासाडीचे प्रमाण जास्त असते.
शीतगृह साखळी व निर्यात धोरण कांदा दीर्घकाळ टिकण्यासाठी शास्त्रीय शीतसाखळी साठवणुकीची गरज आहे, ज्याची चाचणी सुरू आहे. अशा प्रयोगाच्या यशामुळे अलीकडेच अनुभवलेल्या अशा प्रकारच्या अचानक वधारणाऱ्या किमतीचे धक्के टाळण्यास मदत होईल. बाजार निरीक्षक निर्यात धोरणात सातत्य ठेवण्याचा सल्ला देतात, कारण यामुळे भारतीय कांद्याला चांगली निर्यात बाजारपेठ मिळेल.
योग्य व्यवस्थापन भारत दरवर्षी सरासरी ३०० लाख मेट्रिक टन कांदा उत्पादन होते. त्यापैकी सुमारे २५ लाख मे. टन निर्यात होते, तर सुमारे १६० लाख मे. टन कांदा देशांतर्गत गरज भागवतो. पुरेसा कांदा उत्पादित होऊनही कांद्याची टंचाई निर्माण होऊन सामान्य ग्राहकांसाठी कांदा महाग होतो. तर बदलत्या सरकारी धोरणांमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरीही बाजारभावांच्या नावाखाली निराशा येते. लागवडीपासून ते साठवणुकीपर्यंत योग्य व्यवस्थापन केले आणि साठवणुकीसाठी शीतगृहांची साखळी उभारली, तर कांदा बाजारभावाच्या समस्येवर तोडगा निघू शकेल.