Lokmat Agro >स्मार्ट शेती > निंदायला मजूर मिळत नाहीत? मग तणांचा करा ‘स्मार्ट’ बंदोबस्त

निंदायला मजूर मिळत नाहीत? मग तणांचा करा ‘स्मार्ट’ बंदोबस्त

'smart' ways of weed management in labour shortage | निंदायला मजूर मिळत नाहीत? मग तणांचा करा ‘स्मार्ट’ बंदोबस्त

निंदायला मजूर मिळत नाहीत? मग तणांचा करा ‘स्मार्ट’ बंदोबस्त

निंदणी आणि खुरपणीचा तणांच्या बंदोबस्तात महत्त्वाचा वाटा आहे. मात्र मजूर मिळत नसल्यास तणांचा स्मार्ट तंत्राने बंदोबस्त करायला हवा.

निंदणी आणि खुरपणीचा तणांच्या बंदोबस्तात महत्त्वाचा वाटा आहे. मात्र मजूर मिळत नसल्यास तणांचा स्मार्ट तंत्राने बंदोबस्त करायला हवा.

शेअर :

Join us
Join usNext

तणांमुळे पिकांचे नुकसान होऊन उत्पादनात घट होते. म्हणूनच तणांचा बंदोबस्त करणे आवश्यक असते. अलीकडे मजूरांच्या समस्येमुळे शेतकरी तणनाशकांचा वापर करत आहेत. मात्र असा वापर करताना कृषी तज्ञांचा सल्‍ला घेऊनच करावा.

पिकात वाढणारी तणे
अ. एकदलवर्गीय : शिप्पी, लोना, केना, भरड, (नरींगा), घोडकात्रा, वाघनखी, चिकटा, पंधाड, हराळी, लव्हाळा, कुंदा, विंचु, चिमनचारा इ.
ब.  व्दिदलवर्गीय : दिपमाळा, दुधी, माठ, काटेमाठ, कुंजरु, हजारदाणी, तांदुळजा, रानताग, पेटारी, माका, उंदीरकाणी, शेवरा, रान एरंडी, गाजरगवत, बरबडा, कुरडू, टाळप, पाथरी, चांदवेल, चंदनबटवा, खांडाखुळी इ.     

तणामुळे हेाणारे नुकसान 
1. पिकाला अन्नद्रव्ये आणि पाण्याची कमतरता भासते
2. कीड आणि रोंगाचा प्रादुर्भाव वाढतो
3. कालवे चा-याची वाहक क्षमता घटते.
4. उत्पादनात घट येते.
5. शेती उत्पादनांची प्रत खालावते.

पिकातील तणांचा बंदोबस्त
1. तणांचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी
(अ) ओलितांचे दांड नेहमी तणविरहीत ठेवावे. 
(ब) शेणखत अथवा कंपोस्ट कुजल्यानंतर वापरावे, तसेच खताच्या खडयावर तण वाढु देऊ नये.
(क) शक्य असेल तिथे सलग पिकाऐवजी आंतरपीक घ्यावे.
(ड) मजुरांची कमतरता भासल्यास तणनाशकाचा वापर कृषी तज्ज्ञांच्या शिफारसीनुसारच करावा.
(इ) तणनाशकाची फवारणी फुट स्प्रेअर अथवा नेंपसॅक पंपाने करावी. त्यासाठी फ्लॅटफॅन अथवा फ्लडजेट नोझल वापरावे.
(फ) तणनाशकाची फवारणी केलेला पंप साबणाच्या पाण्याने 2 ते 3 वेळा धुवावा व नंतरच किटनाशके फवारणी करीता वापरावे.

विविध पिकातील तणांचे नियंत्रण 

ज्वारी, बाजरी : पेरणीनंतर 2 निंदण्या व 2 कोळपण्या 3 आणि 6 आठवडयांनी द्याव्यात किंवा पीक उगवणीपुर्वी अॅट्रॅझीन 0.75 कि/हे. या प्रमाणात फवारावे.

ओलिताखाली पेरसाळ : पेरणीनंतर दोन निंदण्या व दोन कोळपण्या 3 आणि 6 आठवडयांनी द्याव्यात किंवा पीक उगवणीपुर्वी पेन्डीमिथॅलिन 2.0 कि./हे या प्रमाणात फवारावे.

तुर : पेरणीनंतर तणांच्या प्रादुर्भावप्रमाणे तीन निंदण्या आणि कोळपण्या 3, 6 आणि 9 आठवडयांनी द्याव्यात किंवा पीक उगवणीपुर्वी मेटोलॅक्लोर 1.0 कि/हे. या प्रमाणात फवारावे.

सुर्यफुल : पेरणीनंतर तीन निंदण्या आणि तीन कोळपण्या अनुक्रमे 3, 6 आणि 9 आठवडयांनी द्याव्यात किंवा पीक उगवणीपुर्वी 0.10 कि./हे. ऑक्सीक्लोरफेन ची फवारणी करुन नंतर 6 आठवडयांनी एक खुरपणी व कोळपणी करावी.

कपाशी : पेरणीनंतर तिन निंदण्या व कोळपण्या अनुक्रमे 3, 6 आणि 9 आठवडयांनी द्याव्यात. किंवा पीक उगवणीपुर्वी पेन्डीमिथॅलीन 1.00 कि./हे. या प्रमाणात फवारणी करावी नंतर 6 आडवडयांनी एक कोळपणी व खुरपणी करावी.

ऊस : सुरु उसाला 3, पुर्वहंगामी ऊसाला 4 व आडसाली उसाला 4 ते 5 निंदण्या एक महिन्याच्या अंतराने द्याव्यात.

हळद : हळद पीकातील प्रभावी तण नियंत्रणासाठी व अधिक आर्थिक फायद्यासाठी पीक उगवणीपुर्वी मेट्रीब्‍यूझीन 70 टक्के डब्‍ल्‍यु. पी. 0.7 कि. क्रियाशील घटक प्रती हेक्‍टरी, लागवडीनंतर 9 आठवडयांनी काडाचे आच्‍छादन 10 टन प्रति हेक्‍टरी व 12 आठवडयांनी एक खुपरणी करावी. किंवा चार निंदण्या 3, 6, 9 व 12 आठवडयांनी द्याव्यात किंवा अॅट्राझीन 0.75 कि. /हे किंवा ऑक्सीक्लोरफेन 0.15 कि./हे ची उगवणीपुर्वी फवारणी करुन नंतर 9 व 12 आठवडयांनी फवारणी करावी.

घातुक तणांचा बंदोबस्त

हराळी, नागरमोथा, कुंधा
- उन्हाळी हंगामात जमीन नांगरुन, वखरुन वर आलेल्या गाठी, काशा वेचुन जाळुन टाकाव्यात.
- या तणाच्या नियंत्रणासाठी ही तणे कोवळी असताना (2 ते 4 पाने असताना) ग्लायफॉसेट हे तणनाशक हेक्टरी 2.05 कि. या प्रमाणात फवारावे. हे तणनाशक बाजारात ग्लायसेल, राऊंडअप, विडॉफ इ. नावाने मिळते. फवारावीनंतर दोन तास पाऊस पडणार नाही याचा अंदाज घेऊनच फवारणी करावी. फवारणीनंतर 3 ते 4 आठवडे अशा जमिनीत कसलीही मशागत करु नये. 

गाजरगवत
गाजर गवताच्या नियंत्रणासाठी खालील उपाययोजना करणे आवश्यक आहे.
(1) प्रतिबंधात्मक (2) निवारणात्मक (3) निर्मुलनात्मक
(1) प्रतिबंधात्मक : हे तण फुलावर येण्यापुर्वी मुळासकट उपटुन काढावे. कंपोस्टचे खडडे, ओलिताचे दांड, कालवे, रेल्वेलाईन, रस्ते इत्यादी ठिकाणी गाजरगवत फुलावर येण्यापुर्वी उपटावे.
(2) निवारणात्मक : उभ्या पिकातील गाजरगवत निंदणी अगर कोळपणीव्दारे मुळासकट काढावे. निरनिराळया पिकांत तणांचे नियंत्रणासाठी तणनाशकाच्या शिफारशी केलेल्या आहेत.  त्यांचा अवलंब केल्यास पिकात गाजर गवत उगवत नाही.
पडीत जमिनीत उगवणा-या गाजर गवतासाठी 2, 4 – डी हे तणनाशक (सोडियम क्षार) 3 किलो किंवा ग्लायफोसेट 5 लिटर 500 लिटर पाण्यात मिसळुन हे तण फुलावर येण्यापुर्वी फवारावे. गरज भासल्यासपरत 10 ते 15 दिवसांनी त्याच प्रमाणात फवारणी करावी. 2, 4 - डी उपलब्ध नसल्यास खाण्याचे मीठ 20 किलो 100 लिटर पाण्यात मिसळुन फुलावर येण्यापुर्वीच त्यावर फवारावे. किंवा पीक विरहीत क्षेत्रावर तरोटा बियाणे (15 ग्रॅम तरोटा बियाणे प्रति चौरस मिटर) वापरले असता गाजरगवताची संख्या व त्याचे शुष्क वजन परिणामकारकरित्या घटु शकते. त्यामुळे अशा क्षेत्रावर चार ते पाच वर्षानंतर गाजरगवताचा बंदोबस्त परिणामकरकरित्या होतो.
(3) निर्मुलनात्मक : गाजर गवत एकाच वेळी सर्व संबंधितानी आणि संस्थानी सामुहिकरित्या फुलावर येण्यापुर्वीच वारंवार काढुन टाकावे.

गाजर गवताच्या निर्मुलनासाठी मेक्सिकन भुंग्यांचा वापर

झायगोग्रामा बायकोलरॅटा भुंग्याचा जीवनक्रम : या किडीचे प्रौढ भुंगे मळकट पांढरे असुन त्यावर काळसर रंगाच्या सरळ आणि नागमोडी रेषा असतात. मादी भुंगे अलग अलग अथवा गुच्छात पानाच्या खालील बाजुवर अंडी घालतात. अंडयांचा रंग फिकट असुन अंडयातुन अळया बाहेर पडण्याच्या वेळी त्या लालसर होतात. अंडी अवस्थेचा कालावधी 4 ते 6 दिवसाचा असुन अंडयातुन बाहेर निघालेल्या अळया गाजर गवताच्या वरील भागातील पाने खातात. तरुण अळया झाडाची वाढ व फुले येण्याचे थांबवितात. अळीच्या 4 अवस्था असुन पुर्ण वाढलेल्या अळया रंगाने पिवळया पडतात. अळी अवस्था 10 ते 11 दिवसांची असते, कोषावस्था 9 – 10 दिवसांनी असुन कोषावस्थेत मातीत गेलेले भुंगे जमिनीतुन निघुन गाजर गवताच्या पानावर उपजिवीका करतात. पावसाळयात जुन ते ऑक्टोंबर पर्यंत हे भुंगे गाजर गवत फस्त करतात. नोव्हेंबर नंतर हे भुंगे जमिनीत 7 ते 8 महिने दडुन बसतात आणि पुढील वर्षी पावसाळाच्या सुरुवातीच्या पावसानंतर जमिनीतुन निघुन गाजरगवताचा नाश करण्यास सुरुवात करतात. हे भुंगे एखादया ठिकाणी स्थिर झाले की पुढच्या वर्षी पुन्हा पुन्हा भुंगे सोडण्याची गरज पडत नाही.

भुंगे कोठे व किती सोडावेत : शेतात प्रति हेक्टरी 500 भुंगे सोडावेत. मनुष्यप्राण्याचा अडथळा / शिरकाव नाही, अशा जागी भुंगे सोडण्यास योग्य. प्रभावी नियंत्रण रेल्वे व राज्य रस्त्याच्या दोन्ही बाजुने पडिक जमिनीत, बसस्थानका जवळीत मोकळया जागेत त्वरीत मिळते.

नव्या जागी भुंगे सोडण्यासाठी कसे पाठवावे : भरपुर भुंगे असलेल्या गवतावरील 500 – 1000 भुंगे 10 – 15 सें.मी. उंच प्लॅस्टीकच्या बाटलीत टोपणास जाळी असलेले झाकण लावावे. बाटलीत गाजर गवताचा पाला खादय म्हणुन टाकावा.

भुंग्याचा इतर पिकाना उपद्रव : जैविक किड नियंत्रण संचालनालय बेंगलोरच्या चाचणी नुसार इतर पिकांना सुरक्षित आहेत. भुंगे व अळया फक्त गाजरगवतच खातात. गाजरगवत उपलब्ध नसल्यास भुंगे जमीनीत सुप्तावस्थेत जातात.

भुंग्याचा मानवाला त्रास : झायगोग्रामा भुंग्याचा मनुष्य व प्राणीमात्राला त्रास नाही. भुंगे दिवसा कार्यरत असल्यामुळे जमा करणे योग्य नाही. सकाळी अथवा सायंकाळी भुंगे जमा करण्यास योग्य काळ आहे.

भुंग्याचे प्रयोगशाळेत अथवा शेतावर गुणन : प्रयोगशाळेत प्‍लॅस्टीकच्या 6 x 9 इंच आकाराच्या डब्यात. शेतात 10 x 10 फुट अथवा 10 x 15 फुट आकाराच्या मच्छरदाणीत कृत्रिमरित्या गाजर गवतावर भुंग्याने गुणन करतात.

(महत्त्वाची सूचना : तणनाशके वापरताना कृषी अधिकारी किंवा कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच वापर करावा.)

Web Title: 'smart' ways of weed management in labour shortage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.