उन्हाळ्यात तापमानाम वाढ होत असल्याने रात्री गारव्यासाठी साप मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतात, तसेच पावसाच्या सुरुवातीलाही बिळात पाणी भरल्याने आसऱ्यासाठी घराच्या बाहेरच्या भिंतीलगत किंवा आवारात साप बाहेर पडलेले दिसतात.
अशावेळी चुकून कुठल्याही सापाने देश केल्यास न घाबरता, महत्त्वाचे म्हणजे कुठला साप आहे, हे जाणून घेण्यासाठी त्याला मारणे किंवा तो निघून गेलेला असल्यास त्याची शोधाशोध करण्यात वेळ न घालवता रुग्णाला तातडीने सरकारी रुग्णालयात हलविल्यास त्याच्यावर तत्काळ उपचार होऊ शकतात.
अनेक प्राणी असे असतात जे वर्षभर बिळात दडून पावसाळ्यातच बाहेर पडतात, जसं की बेडूक तर काही प्राणी असेही असतात, जे वर्षभर बाहेर फिरतात. परंतु उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात त्यांचा जोर आणखी वाढतो, जसं की साप जंगलाशेजारी किंवा गावात राहणाऱ्या लोकांना सापाचा धोका सर्वाधिक असतो.
काही लोक साप चावला की, घरगुती उपाय करतात. काही लोक तर, अंधश्रद्धेला बळी पडून साप चावलेल्या जागेवर मंत्रोच्चार करतात. ज्यात त्यांचा जीवही जाऊ शकतो. त्यामुळे हे सर्व उपाय करण्यात वेळ न घालवता साप चावल्यावर त्वरित रुग्णालय गाठावे, असा सल्ला तज्ज्ञ देतात.
भारतात १३ सर्वाधिक विषारी साप● भारतात एकूण १३ प्रजातींचे सर्वाधिक विषारी साप आढळतात. त्यापैकी ४ अत्यंत धोकादायक प्रजाती मानल्या जातात.● त्यात कोब्रा म्हणजेच नाग, रसेल व्हायपर, सॉ-स्केल्ड व्हायपर आणि करैत या प्रजातींचा समावेश होतो. त्यातही नाग आणि करेंत सर्वाधिक धोकादायक असतात.
कोणकोणते विषारी साप आढळतात?■ घोणस : कोकणात चार विषारी साप आढळतात. त्यात घोणस या सापाचा समावेश आहे. हा साप अतिशय विषारी समजला जातो.■ फुरसे : विषारी सापात फुरशा सापाचा समावेश आहे. हा साप केवळ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्येच आढळतो. चार विषारी सापात, हा कमी विषारी साप आहे.■ नाग : नाग हा सर्वांत विषारी असा साप आहे. कोकणात नाग कमी प्रमाणात आढळतात. विषारी समजला जाणारा नाग, हा शांत साप आहे.■ मण्यार : मण्यार हा साप कोकणात मोठ्या प्रमाणावर आढळतो. मण्यार या सापाची लांबी अधिक जास्त असून, अतिशय चपळ असणारा असा हा साप आहे.
तीन प्रकारचे विष • सापांमध्ये हिमोटॉक्सिक, न्यूरोटॉक्सिक आणि मायोटॉक्सिक असं ३ प्रकारचं विष असत.• हिमोटॉक्सिक विष रक्तपेशींवर हल्ला करते. त्यामुळे साप चावलेल्या व्यक्तींच्या शरीरातून विविधमार्गे रक्तस्त्राव होणं, तिला रक्ताच्या उलट्या होणं अशी लक्षणं दिसून येतात.• तर, न्यूरोटॉक्सिक विष मज्जासंस्थेवर हल्ला करते.
साप चावल्यानंतर आधी काय कराल? साप चावल्यानंतर रुग्णाचे मनोधैर्य वाढविणे गरजेचे असते, अशावेळी साप विषारी आहे की, बिनविषारी आहे, हे डॉक्टरांना देशावरून कळते. त्यामुळे तातडीचे उपचार होण्यासाठी सर्पदंश झालेल्या रुग्णाला तातडीने सरकारी रुग्णालयात हलवावे.
कोकणात पाऊस सुरू झाल्यावर सापांच्या बिळात पाणी शिरल्यामुळे ते बाहेर पडतात; पण कुठलाही साप स्वतःहून चावत नाही, तर आपल्या संरक्षणासाठी तो दंश करतो. मात्र, कोकणात ८५ टक्के साप हे बिनविषारी असतात. त्यामुळे साप चावल्यास घाबरून जाऊ नये, तसेच सापाला मारू नये किंवा साप निघून गेला असेल, तर त्याला शोधण्यात वेळ न घालविता रुग्णाला तातडीने जवळच्याच प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा जिल्हा रुग्णालयात हलवावे, तरच वेळेत उपचार होतील. - ज्ञानेश्वर म्हात्रे, सर्पमित्र, रत्नागिरी
अधिक वाचा: शेतकऱ्यांनो विंचू चावला कसे ओळखाल? कसा टाळाल विंचूदंश