पुणे: शेतकऱ्यांच्या शेतात कोणते मुलद्रव्ये आहेत आणि कोणत्या द्रव्याची कमतरता आहे हे तपासण्यासाठी शेतकऱ्यांना शेतातील माती गोळा करून मातीपरिक्षण केंद्रावर घेऊन जावे लागत होते. त्याचबरोबर माती परिक्षणासाठी दिल्यानंतर रिपोर्ट यायला काही दिवसांचा वेळ लागत होता. शेतकऱ्यांच्या शेतापासून मातीपरिक्षण करणाऱ्या लॅबचे अंतर आणि जाण्या-येण्याचा वेळ वाचावा आणि घरीच काही क्षणात माती परिक्षण करण्यासाठी एका खाजगी कंपनीकडून माती परीक्षण करणारे एक छोटे डिव्हाइस विकसित करण्यात आले आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या मातीचे परीक्षण अगदी पाच मिनिटांमध्ये आपल्या मोबाईलद्वारे करता येणार आहे.
दरम्यान, पुण्यातील किसान प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना मातीपरिक्षण करणारे हे डिव्हाईस प्रत्यक्ष बघायला मिळत आहे. यासाठी बॅटरी किंवा चार्जिंगची गरज नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीचा मेंटनन्स खर्च करावा लागणार नाही. हे यंत्र खूप छोटे असून अगदी पाच मिनिटांच्या आतमध्ये आपल्या शेतातील मातीत कोणत्या घटकांची कमतरता आहे हे तपासता येणार आहे.
यंत्राचे वैशिष्ट्ये
- या यंत्राला चार्जिंग, बॅटरी, लाईटची गरज नसते.
- हाताळायला अगदी सोपे आणि हातात बसेल एवढे छोटे यंत्र
- मातीतील प्रत्येक घटकाचा वेगवेगळे मोजमाप करू शकते
- कमी वेळेत माती परिक्षण
- प्रत्येक वेळी केव्हीके, मातीपरिक्षण केंद्र यांसारख्या ठिकाणी जाण्याची गरज नाही
यंत्र कसे काम करते ?हे यंत्र मोबाईलला कनेक्ट करून काम करते. त्यासाठी यंत्रासोबत केबल दिलेली असते. या यंत्राला सेन्सर असून आपल्या शेतातील मातीचे काही सँम्पल घ्यायचे आणि यंत्राला असलेल्या सेन्सरवर ठेवायचे. त्यानंतर आपल्याला मातीतील घटकांपैकी कोणत्या घटकाची स्थिती जाणून घ्यायची आहे ते मोबाईलवरून सिलेक्ट करायचे आणि सर्च करायचे. त्यानंतर काही वेळात संबंधित घटक मातीमध्ये किती प्रमाणात आहे यासंबंधित आकडेवारी आपल्याला मोबाईलवर पाहायला मिळते. त्याचबरोबर याच पद्धतीने आपण इतर घटकांचे मोजमाप सुद्धा करू शकतो.