रासायनिक खतांचा वारेमाप वापर वाढल्याने जमिनीचा पोत घसरत आहे. अशातच अनेक जण शेतजमिनीचे माती परीक्षण करतात. माती परीक्षणाद्वारे जमिनीत कोणत्या घटक द्रव्यांची कमतरता आहे, याबाबत माहिती मिळते.
एकूणच जमिनीचे आरोग्य जाणून घेता येते. शेतकरी रासायनिक खते, कीटकनाशके आदींचा मोठ्या प्रमाणावर तर सेंद्रीय खते, शेणखते, हिरवळीची खते आदींचा वापर कमी प्रमाणात करतात. त्यामुळे शेती नापीक बनत आहे. जमिनीचा पोत खालावत असल्याने पिकेसुद्धा जोमाने वाढत नसल्याचा शेतकऱ्यांचा आतापर्यंतचा अनुभव आहे.
माती परीक्षण कसे करावे?
■ शेतजमिनीतून शेतकऱ्यांनी योग्य प्रकारे म्हणजेच तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार नमुना काढावा, म्हणजेच माती गोळा करून ती परीक्षणाला पाठवावी.
माती परीक्षण कशासाठी?
■ आपल्या शेतजमिनीत कोणते गुणदोष आहेत, जमिनीला कोणत्या घटक द्रव्यांची आवश्यकता आहे किंवा पिकानुसार शेतकऱ्याला कोणत्या खतांचा वापर करावा लागेल, या सर्व बाबी जाणून घेण्याकरिता माती परीक्षण करावे लागते.
किती वर्षांनंतर करायला हवे माती परीक्षण?
■ जमिनीचे आरोग्य पोषक ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी तीन वर्षांनंतर एकदा माती परीक्षण करणे आवश्यक आहे. तेव्हाच जमिनीचा पोत टिकून राहतो. जमिनीतून विविध पिकांना आवश्यक घटक द्रव्येसुद्धा प्राप्त होतात.
किती दिवसांत मिळतो तपासणी अहवाल?
■ माती परीक्षण केल्यानंतर एका महिन्यात नियमानुसार अहवाल मिळतो. त्यानुसार जिल्ह्यातही ही कार्यवाही केली जात आहे. शेतकरीही याचा लाभ घेत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील माती परीक्षण कार्यालयाकडूनही शेतकऱ्यांना आवाहन केले जाते. त्यानुसार शेतकरीही याचा लाभ घेत आहे.
हेही वाचा : Beej Prakriya : बियाणे पेरणी अगोदर कशी कराल जैविक पद्धतीने बीजप्रक्रिया