Join us

Soil Testing उभ्या फळबागेतील मातीचा नमुना कसा घ्याल?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2024 11:34 AM

उभ्या फळबागेमधून मातीचा प्रातिनिधिक नमुना घेण्यासाठी तो विशिष्ट पद्धतीने झाडांची निवड करून त्या झाडाखालून मातीचा नमुना काढावा लागतो.

प्रत्येक फळबागेमधील मातीचे गुणधर्म सारखे राहत नाहीत. त्यामुळे पोषक अन्नद्रव्यांची उपलब्धता प्रत्येक फळबागेच्या मातीमध्ये वेगवेगळी असते. पोषक अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेशी संबंधित असणारे इतर काही गुणधर्म देखील प्रत्येक मातीमध्ये वेगवेगळे असतात.

उत्पादक उभ्या फळबागेतील मातीचा प्रातिनिधिक नमुना घेण्याची पद्धत- फळांचे उत्पादन देत असलेल्या उभ्या फळबागेतून प्रातिनिधिक स्वरुपात मातीचा नमुना घेण्याची पद्धत काही प्रमाणात इतर हंगामी पिकांसाठी असलेल्या प्रातिनिधीक नमुना घेण्याच्या पद्धतीसारखी वाटत असली तरी ती पद्धतीपेक्षा तत्वतः वेगळी आहे.उभ्या फळबागेतील मातीचा नमुना घेताना त्याची पद्धत अचूक असावी अन्यथा माती परीक्षण अहवाल चुकीचा येऊ शकतो. त्यामुळे यासाठी मातीचा नमुना अचूकपणे घेण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करावा.

शेताची विभागणीहंगामी पिकांप्रमाणेच उभ्या फळबागेमध्ये सुद्धा मातीचा नमुना घेताना जमिनीच्या प्रकारानुसार किंवा गुणधर्मानुसार सर्वप्रथम जमिनीचा रंग, चढ-उतार, खोली, इत्यादी बाबींमधील फरक लक्षात घ्यावा. त्यानुसार सारखे गुणधर्म असलेल्या शेताचे निरनिराळे विभाग पाडावेत. एकसारखे गुणधर्म असलेल्या शेताच्या भागाला एक स्वतंत्र शेत गृहीत धरून या भागातून मातीचा प्रातिनिधिक नमुना घ्यावा.

फळबागेतून नमुना घेण्यासाठी झाडांची निवड - उभ्या फळबागेमधून मातीचा प्रातिनिधिक नमुना घेण्यासाठी तो विशिष्ट पद्धतीने झाडांची निवड करून त्या झाडाखालून मातीचा नमुना काढावा लागतो.- त्यासाठी कोणती व किती झाडे मातीचा नमुना घेण्यासाठी निवडायची हे ठरविण्याची एक शास्त्रोक्त पद्धत आहे.- सर्वप्रथम एकसारखे गुणधर्म असलेल्या जमिनीमधील एकूण झाडांची संख्या मोजून घ्यावी. एकूण झाडांपैकी दोन टक्के झाडांची निवड नमुना घेण्यासाठी करावी.- समजा एखाद्या फळबागेत एकूण ४०० फळझाडे असतील तर, या ४०० झाडांच्या दोन टक्के म्हणजे आठ झाडांची निवड मातीचा नमुना घेण्यासाठी करावी.- ही झाडे निवडताना फळबागेच्या क्षेत्रानुसार नागमोडी पद्धतीने जाऊन या दृच्छिक (रँडम) पद्धतीने आठ झाडे निवडावीत. निवड केलेल्या फळझाडाखालील मातीचा नमुना खालील पद्धतीने काढावा.

मातीचा नमुना खालील पद्धतीने काढावा?- फळबागेतून नमुना घेण्यासाठी जागेची निवड जमिनीतून अन्नद्रव्यांची उचल करून ती झाडांना पुरवणारी ८० टक्के अन्नद्रव्यशोषक (फिडर) मुळे ही सर्वच बहुवर्षायू फळपिकांच्या बाबतीत जमिनीमध्ये वरच्या ३० सेंटीमीटर खोलीपर्यंत असतात.- या खोलीच्या भागाला मूळ-परिवेश म्हणजेच हायझोस्फिअर म्हटले जाते. याच भागातील माती आपणास तपासणीसाठी घ्यायची आहे.- फळझाडांची अन्नशोषक मुळे ही फळझाडाच्या बाह्य परिघापर्यंत पसरलेली असतात बाह्य परिघाचा प्रदेश म्हणजे सूर्य डोक्यावर असताना झाडाची सावली ज्या भागात पडते ती जागा.- म्हणून झाडांच्या बुंध्यापासून दोन ते तीन फुट जागा सोडून, डोक्याची सावली पडणाऱ्या परिघापर्यंतच्या गोल पट्टयातूनच मातीचा नमुना घेण्याची जागा ठरवावी.- त्यासाठी एका झाडाखाली पूर्व दिशेला एक आणि पश्चिम दिशेला एक अशा दोन जागा खड्डे खोदण्यासाठी निवडाव्यात.

फळबागेतील खड्डड्यामधून माती गोळा करणे व प्रातिनिधिक नमुना तयार करणे- वरीलप्रमाणे निवड केलेल्या फळझाडाखाली खड्डा खणण्यासाठी जा.- तेथील जमिनीच्या पृष्ठभागावरील काडीकचरा, दगड इ. हाताने बाजूला करा व निवडलेल्या स्थळी ३० सेंटीमीटर खोल खड्डा टीकास किंवा कुदळीने खणा.- यासाठी खड्डा रिकामा करून त्या खड्ड्याच्या कडेची दोन ते तीन सेंमी जाडीची मातीची चकती किंवा खाप स्वच्छ खुरप्याच्या किंवा टोकदार लाकडी काठीच्या साह्याने वरपासून तळापर्यंत खरवडून घ्या. या खड्ड्यातून साधारणपणे अर्धा ते एक किलो मातीचा नमुना घ्या.- अशा रीतीने फळबागेतील निवड केलेल्या सर्व फळझाडांखाली खड्डे खणून किंवा आगरच्या साह्याने सर्व खड्ड्यांमधील माती घेऊन ती घमेल्यात चांगली एकत्र करा.- घमेल्यातील माती स्वच्छ गोणपाटावर चांगली एकत्र मिसळून घ्या आणि त्यामधून काडीकचरा, दगड-गोटे काढून टाका व गोणपाटावर मातीला गोलाकार पसरवून घ्या. बोटाने या ढीगाचे चार समान भाग करा.- या समान चार भागामधून समोरासमोरील दोन भाग काढून टाका. उरलेले दोन भाग पुन्हा एकत्र मिसळून त्याचे चार भाग करून परत दोन भाग काढून टाका. याप्रमाणे अंदाजे अर्धा किलो माती शिल्लक राहील तोपर्यंत वरील क्रिया करा. माती ओली असल्यास ती सावलीत वाळवा.- ही वाळविलेली अर्धा किलो माती म्हणजेच प्रयोगशाळेत पाठविण्यासाठी तयार असलेला मातीचा प्रातिनिधिक नमुना होय. हा नमुना स्वच्छ कापडी पिशवीत भरा.- मातीच्या नमुन्यासोबत शेतकऱ्याचे नाव, पत्ता व भ्रमणध्वनी क्रमांक, शेताचे ठिकाण, गट क्रमांक, फळपीकाचे नाव, नमुना घेतल्याची तारीख, तपासणी करावयाचे गुणधर्म इत्यादी माहितीसह तपासणीसाठी प्रयोगशाळेत द्या.

अधिक वाचा: Summer Tillage उन्हाळी मशागत कशी व केव्हा करावी?

टॅग्स :फलोत्पादनशेतकरीशेतीपीकफळेसेंद्रिय खतखते