Join us

तुमची वीज नको, आम्ही आमचे समर्थ आहोत! गावातल्या तब्बल ४२५ शेतकऱ्यांकडे सोलार वीज पंप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 10:35 PM

अख्खं गाव करतंय सोलार पंपावर शेती!

सोलापूर: एक गाव असे आहे जिथल्या सगळ्याच शेतकऱ्यांच्या शेतात पाणी वाहतेय ते सोलार पंपाद्वारे ७-८ वर्षांखाली ५ सोलार पंप बसविले अन् यशस्वी झाल्याने आज जिल्ह्यातील बेंबळे गावात ४२५ सोलार पंपावर ऊस, केळी, डाळिंब, पेरू व इतर पिके घेतली जात आहेत. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक सोलार पंपावर शेती फुलवणारे गाव अशी बेंबळेची ओळख झाली आहे.

माढा तालुक्यातील टेंभुर्णीजवळ अगदी भीमा नदीलगत असलेल्या बेंबळे गावात २६०० हेक्टर बारमाही बागायत आहे. मात्र, पुरेशा दाबाने वीज मिळत नव्हती. मात्र शेतकरी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी पुढे येत नव्हते. कशाबशा ५ महिला शेतकरी तयार झाल्या व शेतकरी हिस्सा भरून सोलार पंपावर शेती सुरु झाली.

प्रारंभी कुणाचा विश्वासच बसेना

  • शेतीसाठी सोलार पंप बसविण्याची कल्पना पुढे आली. सोलार पंप बसविण्यासाठी जयवंत भोसले अग्रेसर होते. अजित जैन यासाठी सहकार्य करण्यास तयार होते.
  • मात्र, सोलारवर मोटारी चालतील यावर शेतकऱ्यांचा विश्वास बसेना. जयवंत भोसले हे सहकारी शेतकऱ्यांना सोबत घेत तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना भेटले. डॉ.भोसले यांनीही बेंबळे गावचे सिंचन क्षेत्र व वीज पुरवठ्याची परिस्थिती लक्षात घेऊन १०० सोलार पंप बसविण्यास परवानगी दिली.

शेतीपंप किती?

सध्या साडेसात एच.पी. चे १९, ५ एच.पी. चे २६० व तीन एच.पी. चे १५५ शेतीपंप आहेत.

गावातील संपूर्ण शेतकऱ्यांना सोलारवर शेती करायची आहे. पेंडिंग अर्ज मंजूर झाले तर पुढील वर्षात सोलार पंपाची संख्या ६०० होईल. विजेची कटकट कमी झाली व दिवसभर शेतीला पाणी देता येते.

- जयवंत भोसले, कृषिनिष्ठ शेतकरी, बेंबळे, माढा

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीसोलापूर