Join us

तूर पिकातील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन करण्यासाठी उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 3:59 PM

तूर पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापनात मशागतीय, यांत्रिक, जैविक पध्दतींचा वापर करून किडींची संख्या कमी कशी ठेवता येईल ते पाहूया.

एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणजे वातावरणाशी समन्वय साधून एकमेकांशी पुरक अशा सर्व पध्दतीचा यामध्ये मशागतीय, यांत्रिक, जैविक व रासायनिक पध्दतींचा वापर करून किडींची संख्या आर्थिक नुकसान पातळीच्या खाली ठेवणे होय.

तूर पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापनात मशागतीय, यांत्रिक, जैविक पध्दतींचा वापर करून किडींची संख्या कमी कशी ठेवता येईल ते पाहूया.

१) मशागतीय पध्दती• घाटे अळीचे कोष नष्ट करण्यासाठी उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करावी.• शिफारस केलेल्या वाणांची योग्य अंतरावर पेरणी करावी.• ज्यावेळी तुरीची सलग पेरणी केली जाते त्यावेळेस बियाण्यात १ टक्का ज्वारी किंवा बाजरीचे बी मिसळून पेरणी करावी.• तुरीबरोबर ज्वारी, बाजरी, मका अथवा सोयाबीन ही आंतरपिके घ्यावीत.• क्षेत्रीय (झोनल) पेरणी पध्दतीचा अवलंब करावा. (संपूर्ण गावामध्ये एकाचवेळी पेरणी करावी.)• वेळेवर आंतरमशागत करून पीक तण विरहीत ठेवावे.

२) यांत्रिक पध्दती• पाने गुंडाळणाऱ्या अळीची प्रादुर्भावग्रस्त पाने गोळा करुन अळीसहीत नष्ट करावीत.• शेताच्या बांधावरील तुरीच्या शेंगा पोखरणाऱ्या अळींची पर्यायी खाद्य तणे उदा. कोळशी, रानभेंडी, पेटारी ही तणे वेळोवेळी काढून नष्ट करावीत.• पुर्ण वाढ झालेल्या अळ्या वेचून त्यांचा नाश करावा.• पक्षांना बसण्यासाठी हेक्टरी ५० ते ६० पक्षीथांबे शेतात लावावेत जेणेकरुन त्यावर बसलेले पक्षी शेतातील अळ्या वेचून खातील.• शेंगा पोखरणाऱ्या हिरव्या अळीसाठी पीक कळी अवस्थेत आल्यापासून हेक्टरी ५ कामगंध सापळे लावावेत. जेणेकरून किडीची आर्थिक नुकसानीची पातळी कळेल.• तुरीच्या झाडाखाली पोते टाकून झाड हलवावे आणि पोत्यावर पडलेल्या अळ्या वेळोवेळी गोळा करून नष्ट कराव्यात.

३) जैविक पध्दती• पीक कळीअवस्थेत असताना ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.• पीक ५० टक्के फुलोऱ्यात असताना मेटाऱ्हायझियम ॲनिसोप्ली हे बुरशीयुक्त कीडनाशक २ ते ३ मिली. व राणीपाल (०.०१ टक्के द्रावण) १ मिलि/लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.• शेंगा पोखरणारी हिरवी अळी लहान अवस्थेत असताना एच.ए.एन. पी.व्ही विषाणूची २५० एल.ई. प्रति हेक्टर प्रमाणे सायंकाळी फवारणी करावी.

टॅग्स :तूरकीड व रोग नियंत्रणशेतीपीकपीक व्यवस्थापन