Join us

काही उपाय ज्यांच्या मदतीने सध्याच्या दुष्काळ सदृश परिस्थिती मध्ये देखील ठेवता येईल फळबाग जीवंत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 12:17 PM

फळबागेसाठी कृषी विज्ञान केंद्राचा मोलाचा सल्ला

भाग - १ शेतकरी बांधवांनो दुष्काळ सदृश्य परिस्थितीत अशी घ्या फळबागेची काळजी यात दिलेल्या पद्धती तसेच आता या भाग - २ मध्ये दिलेल्या पद्धतींचा वापर करून सध्याच्या दुष्काळ परिस्थतीत फळबाग जोपासता येईल.  

बागेसाठी वारारोधक

उन्हाळयामध्ये अति उष्ण वार्‍यामुळे बागेमध्ये बाष्पीभवनाचे प्रमाण वाढून बागेस नुकसान होऊ शकते. यापासून संरक्षण करण्यासाठी बागेभोवती गोणपाट, जुन्या साड्या, हिरवे शेडनेट, खताच्या पिशव्या यांचा आडोसा करून उष्ण हवा बागेत जाणार नाही, अशा पद्धतीने वारा रोधके लावावीत.

सावलीसाठी मांडव

नवीन लागवड केलेल्या फळझाडांना पहिल्या १ ते २ वर्ष उन्हापासून सरंक्षण देण्यासाठी सावली करावी. झाडाच्या सर्व बाजूंना ३ फुट लांबीच्या बांबू, कामठवा, गवत यांचा वापर करून सावलीसाठी मांडव तयार करावा. वाळलेल्या गवताऐवजी बारदाना किंवा शेडनेट चा वापर देखील उपलब्ध असेल तर करू शकता. 

जैविक वारारोधके

उन्हाळपात जमिनीतील ओलाव्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे बागेभोवती सुरुवातीलाच शेवरी, मलबेरी, चिलार, चिंच, सुबाभूळ, ग्लिरीसीडीया, सरु, शेर, निवडुंग यापैकी उपलब्ध वनस्पतींची कुंपणाकरिता लागवड करावी. यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन फळबागांचे संरक्षण होते.

पानोळा कमी करणे

पानातून पणर्णोत्सर्जनाद्वारे वाया जाणारे पाणी कमी करण्यासाठी झाडाच्या खालच्या व आतील भागातील अनावश्यक फांद्या व पानांची रोगमुक्त सिकेटरचा वापर करून विरळणी करावी. यामुळे पानाद्वारे होणारे बाष्पीभवन कमी होऊन झाडांना लागणार्‍या पाण्याची गरज कमी होते. 

फळांची विरळणी

पाण्याच्या कमतरतेमुळे उन्हाळ्यात झाडांना लागणारे पाणी देणे शक्य होत नाही. झाडावरील फुले, फळे यांच्यामुळे झाडांना अतिरिक्त अन्नपाणी लागते. त्यामुळे उन्हाळ्यातील पाण्याची गरज भागवून झाडे जगवण्यासाठी उन्हाळी बहार न घेता झाडावरील फुले, फळे यांची विरळणी करावी.

शेततळे पाणी बचत

एकूण जल साठयापैकी ४० ते ४२ % पाण्याचे वाष्पीभवन होते. मात्र हे होऊ नये यासाठी निंबोळी किंवा एरंडीच्या तेलाचा तवंग पाण्यावर पसरावा. ३० ते ३५ चौ. मी पाण्याच्या पृष्ठभागासाठी १ ली. तेलाची गरज भासते. बाष्पीभवनाद्वारे होणारा पाण्याचा नाश कमी करून अधिकचे पाणी फळबागेसाठी वापरात घ्यावे.

सौजन्य - वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१

टॅग्स :फळेशेतीशेतकरीदुष्काळपाणीकपात