सद्यःस्थितीत सोयाबीन या पिकावर उंटअळ्या व तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पाने खाणाऱ्या अळ्यांमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या अळ्यांमुळे सोयाबीनचे अधिक नुकसान होऊ शकते.
त्यामुळे शेतकरी बांधवांनी या किडीच्या व्यवस्थापनासाठी एकात्मिक कीड व्यवस्थपनाचा अवलंब करणे आवश्यक आहे.
तंबाखूवरील पाने खाणारी अळी/ स्पोडोप्टेरा या किडीचा प्रादुर्भाव साधारणपणे ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. दिवसाच्या वेळी अनेकदा या अळ्या पानाखाली अथवा जमिनीत लपून राहतात व रात्रीच्या वेळी बाहेर पडतात. ज्यामुळे त्या दिसत नाहीत.
अंड्यातून निघालेल्या सुरुवातीच्या अवस्थेतील अळ्या समूहाने राहून प्रथम अंडी घातलेल्या पानाचे हरितद्रव्य पूर्णपणे खाऊन टाकतात.
गडचिरोली जिल्ह्यात दीड हजार हेक्टरवर सोयाबीन
जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचा पेरा घटला. यावर्षी जिल्ह्यात १ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा आहे. दरवर्षी हा पेरा घटत आहे.
सायंकाळी करावी फवारणी
तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी एस.एल.एन.पी.व्ही. ५०० एल.ई. विषाणू २ मि.लि. प्रतिलिटर पाणी किंवा नोमुरिया रिलाई बुरशीची ४ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून सायंकाळी फवारणी करावी.
जैविक पद्धतीने अशी करावी फवारणी
तंबाखूवरील पाने खाणारी अळी किडींच्या सर्वेक्षणासाठी हेक्टरी ५ कामगंध सापळे शेतात लावावेत. भक्ष्यक पक्ष्यांना बसण्यासाठी शेतात ८ ते १० प्रतिएकरी पक्षी थांबे उभारावेत. अळीच्या व्यवस्थापनासाठी ५ टक्के निंबोळी अर्क ५० मिली १० लिटर पाण्यातून प्रतिबंधात्मक फवारणी करावी.
उंट अळ्या करतात नुकसान
उंट अळ्या किडींच्या लहान अळ्या पानांच्या खालचा हिरवा भाग खरवडून खातात. त्यामुळे पानांचा फक्त वरचा पांढरा पापुद्रा दिसतो. काही काळानंतर असे पातळ पापुद्रे फाटतात व त्या ठिकाणी छिदे दिसतात.
सदर ढगाळ वातावरण असल्याने लष्करी अळीचा प्रादुर्भाव देखील वाढत आहे. शेतकऱ्यांनी क्लोरोपारिफॉस अधिक सायपर मेथ्रीन किंवा प्रोफेनाफॉस आदींची फवारणी करावी. - आर. टी. कवास, कृषी सहायक.