गळीत धान्य वर्गातील सोयाबीनचेपीक कोकणात शक्य असून, खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात पीक घेता येते. अधिक उत्पादन देणाऱ्या सुधारित जाती डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केल्या आहेत. खरीप हंगामात हेक्टरी १५ ते २०, तर रब्बीमध्ये हेक्टरी १० ते १५ क्विंटल उत्पादन मिळते.
आवश्यक जमीन
मध्यम ते हलकी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन सोयाबीन पिकाकरिता चांगली असते. आम्ल-विम्ल निर्देशांक ६.५ ते ८.० च्या दरम्यान असणारी जमीन सोयाबीन पिकासाठी मानवते.
मशागत
जमिनीची २५ ते २० सेंटिमीटर खोल नांगरट करावी. नंतर प्रती हेक्टरी १० टन चांगले कुजलेले शेणखत टाकून ते जमिनीत मिसळावे. कुळवाच्या दोन ते तीन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.
वाणाची निवड
एमएससी १३, एमएसएसी ५७ हे दोन वाण खरीप व रब्बी हंगामासाठी आहेत, तर एमएससी ५८ व एमएससी १२४ हे दोन वाण खास खरीप हंगामासाठी आहेत.
बीजप्रक्रिया
सोयाबीन हे द्विदलवर्गीय पीक असल्याने जीवाणूंच्या मदतीने मुळावरील गाठीमध्ये वातावरणातील नत्राचे स्थिरीकरण होते. त्यासाठी बुरशीनाशकाची प्रक्रिया केल्यानंतर पेरणीपूर्व एक तास अगोदर 'रायझोबियम जापोनिकम' हे जीवाणू संवर्धक २५ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात चोळावे. त्यानंतर बियाणे सावलीत वाळवून पेरणीसाठी वापरावे.
लागवड कशी कराल?
पेरणीसाठी प्रति हेक्टरी ७० ते ८० किलो बियाण्यांची आवश्यकता असते. पेरणी टोकण पद्धतीने ३० सेंटिमीटर बाय १५ सेंटिमीटर अंतरावर व २.५ ते ३ सेंटिमीटर खोलीवर करावी. खरीप हंगामात पाऊस नियमित सुरू झाल्यावर (जूनच्या दुसऱ्या आठवड्यात) करावी. रब्बी हंगामात पेरणी डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी.
खत
हेक्टरी १० टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणी अगोदर जमिनीत चांगले मिसळून द्यावे. तसेच या पिकाला हेक्टरी ४० किलो नत्र, १०० किलो स्फुरद आणि आवश्यकतेनुसार ५० किलो पालाश पेरणीच्या वेळी द्यावे.
आंतरमशागत
पिकातील तणांचा बंदोबस्त करण्यासाठी पेरणीनंतर दुसऱ्या अथवा तिसऱ्या दिवशी मातीच्या ओल्या पृष्ठभागावर 'ऑक्झाडायरजील' तणनाशकाची हेक्टरी ०.१ किलो ग्रॅम क्रियाशील घटकाची ५०० ते ६०० लिटर पाण्यातून फवारणी करावी किवा पेरणीनंतर २० ते ४० दिवसांनी बेणणी करावी. खरीप हंगामात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
पीक संरक्षण
पाने खाणारी अळी, तुडतुडे, फुलकिडे, खोडमाशी या किडीपासून सोयाबीन पिकाचे संरक्षणासाठी पेरणीनंतर ३० दिवसांनी हेक्टरी ६०० मिली प्रवाही मोनोक्रोटोफॉस ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
काढणी
सोयाबीनची काढणी योग्य वेळी करणे फार महत्त्वाचे आहे. कारण लवकर काढणी केल्यास अपक्व दाण्याचे प्रमाण जास्त असते, तर उशिरा काढणी केल्यास शेंगा फुटून उत्पन्नात घट येते.
अधिक वाचा: Seed Germination Test बियाणांची उगवणक्षमता तपासण्यासाठी गोणपाटाचा वापर का करतात?