Join us

Soybean Pik Salla सद्यस्थितीत सोयाबीन लागवड नियोजन व पिकातील करावयाची कामे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 4:00 PM

सोयाबीनची लागवड करताना तापमान आणि सूर्यप्रकाश किती तास राहील याचा विचार करावा लागतो. सद्यस्थितीत सोयाबीन पिक व्यवस्थापन कसे करावे?

सोयाबीनची लागवड करताना तापमान आणि सूर्यप्रकाश किती तास राहील याचा विचार करावा लागतो. सोयाबीन हे शॉर्ट डे (म्हणजेच दिवसांत कमी तास सूर्यप्रकाश राहणे) पीक आहे. जसा जसा दिवसांतील सूर्यप्रकाशाचा कालावधी कमी कमी होत जाईल तसतशी सोयाबीनची फूलधारणा होत राहते.

१) शेतकरी बांधवांनी शेती असलेल्या क्षेत्रात/भागात किमान ७५-१०० मिमी पाऊस पडला असल्यास किंवा पावसामुळे जमिनीत ६ इंचापर्यंत ओल झाल्यानंतर सोयाबीन पिकाची पेरणी करावी.

२) खात्रीशीर उत्पादन मिळविण्यासाठी वेगवेगळ्या कालावधीत परिपक्व होणाऱ्या २-३ शिफारस केलेल्या सोयाबीन जातीची पेरणी करावी.

३) सोयाबीन बियाण्याच्या उगवण क्षमतेप्रमाणे (किमान ७०% किंवा त्यापेक्षा जास्त उगवण क्षमता असणारे) पेरणीसाठी बियाणे दर वापरावा.

४) रुंद सरी वरंबा (BBF) किंवा सरी-वरंबा पद्धतीने सोयाबीनची पेरणी करावी कारण पीक उभे असताना व त्याच्या वाढीच्या महत्वाच्या आवस्थांदरम्यानच्या काळात अतिवृष्टी तसेच पाण्याचा ताण किंवा पावसाचा खंड पडल्यास पिकाचे संरक्षण होते व पीक तग धरून राहते.

५) बियाण्यास जैविक खतांची बीज प्रक्रियाबुरशीनाशक आणि कीटक नाशकाची प्रक्रिया केल्या नंतर बियाण्यास ब्रेडीरायझोबियम जापोनिकम आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणू यांची २५० ग्रॅम/१० किलो बियाण्यास पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करावी. त्यासाठी वरील जिवाणू खते १ ली. पाण्यात मिसळून त्याचे गाढ द्रावण तयार करावे, एक हेक्टरसाठी लागणाऱ्या ६५-७० किलो बियाण्यास हे हलक्या हाताने चोळून लावावे किंवा हे द्रवरूपात असतील तर १०० मिलि प्रती १० किलो बियाण्यास लावावे. थोडा वेळ सावलीत सुकल्यानंतर ताबडतोब पेरणी करावी.

६) प्रति हेक्टर बियाणे दर आणि पेरणीचे अंतरपेरणी पाभरीने दोन ओळींत ४५ सेंमी व दोन झाडांमध्ये ५-७ सेंमी अंतर राहील अशा प्रकारे करावी. बियाणे २.५ ते ३ सेंमी खोलीपर्यंतच पेरावे. हेक्टरी झाडांची संख्या ४.५० ते ४.७० लाखअसावी, त्यासाठी ६२ ते ६५ किलो प्रति हेक्टर बियाणे दर वापरावा. टोकण पद्धतीने पेरणी करावयाची असल्यास ३५ ते ३७ किलो बियाणे प्रति हेक्टर प्रमाणे बियाणे दर वापरावा व पेरणी सरी-वरंब्यावर दोन्ही बाजूंवर १० सेंमी अंतरावर करावी.

७) खते व अन्नद्रव्ये व्यवस्थापनसोयाबीनच्या पिकास पेरणीच्या वेळी प्रति एकरसाठी ८ किलो नत्र, २४-३२ किलो स्फुरद आणि ८ किलो पालाश (२० किलो नत्र, ६० ते ८० किलो स्फुरद, २० किलो पालाश प्रति हेक्टरी) यांची शिफारस केलेली मात्रा, DAP ४५ किलो, SSP ७० किलो व MOP १६ किलो यांच्याद्वारे द्यावी. त्याचप्रमाणे प्रतिएकरसाठी १० किलो झिंक सल्फेट आणि ४ किलो बोरॅक्स आणि १२ किलो गंधक पेरणीच्या वेळी द्यावे. पेरणीच्या वेळी खते बियाण्याच्या खालीच पडतील व त्यांचा बियाण्याशी संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी. या पिकास नत्र, स्फुरद, पालाश, मॅग्नेशियम, गंधक, कॅल्शियम, मॉलिब्डेनम, बोरॉन, लोह, जस्त व मॅगेनीज ही अन्नद्रव्ये वाढीसाठी, फूल धारणेसाठी व शेंगात दाणे भरण्यासाठी आवश्यक असतात. पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना विद्राव्य खते पाण्यासोबत पानांवर फवारून पिकास द्यावीत, त्यासाठी बाजारात अनेक विद्राव्य खते उपलब्ध आहेत (१९:१९:१९ व ००:५२:३४ इ.) त्यांचा शिफारशीप्रमाणे वापर करावा.

अधिक वाचा: Kharif Pikvima यंदाच्या खरीपसाठीही मिळणार एक रुपयात पिक विमा

टॅग्स :सोयाबीनशेतकरीशेतीपीकपेरणीपाऊसपीक व्यवस्थापन