Join us

शेतकऱ्यांसाठी खास मालवाहतूक करणारी इलेक्ट्रिक बाईक! तेही स्वस्तात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 12:54 PM

ही बाईक किसान प्रदर्शनात शेतकऱ्यांना पाहण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी उपलब्ध करण्यात आली होती.

पुणे : अनेकदा शेतकऱ्यांना आपले दूध किंवा शेतमाल वाहतूक करण्यास अडचणी येत असतात किंवा एका दुचाकीवरून जास्त माल नेता येत नाही. यामुळे एका खासगी कंपनीकडून खास शेतकऱ्यांना मालवाहतूक करण्यासाठी एक दुचाकी विकसित करण्यात आली आहे. या दुचाकीमध्ये थेट सहा ते आठ भाजीपाल्याचे क्रेट किंवा सहा दुधाच्या किटल्या बसू शकतात. त्यामुळे ही दुचाकी शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याची ठरत आहे. पुणे येथे आयोजित किसान प्रदर्शनामध्ये ही गाडी ठेवण्यात आली होती.

दरम्यान, ही दुचाकी पूर्णपणे इलेक्ट्रिक असून एकदा चार्जिंग केल्यानंतर ११० किलोमीटरपर्यंत धावू शकते. त्याचबरोबर या गाडीची अनेक चांगली वैशिष्ट्ये असून ज्या शेतकऱ्यांना दररोज १०० लीटरपेक्षा जास्त दूध किंवा दररोज बाजारात भाजीपाला न्यावा लागतो अशा शेतकऱ्यांसाठी मालवाहतूक करण्यासाठी ही गाडी फायद्याची आहे.

 

गाडीची वैशिष्ट्ये

  • या गाडीच्या गतीचे तीन मोड आहेत.
  • ५० किमी प्रतितास हा वेग सर्वांत जास्त वेग आहे.
  • ही गाडी पूर्णपणे मेटल बॉडीची बनवली आहे.
  • ग्राऊंड क्लिअरन्स १७० एमएम चा आहे.
  • गाडीला मिड मोटर असल्यामुळे बॅलन्स व्हायला मदत होते.
  • टेलिस्कॉपिक आणि ऑईल स्प्रिंग शॉकअप, स्पोक टायरमुळे मजबुती जास्त

 

गाडीची किंमत किती आहे?

ही गाडी किसान प्रदर्शनामध्ये सवलती सहित ऑन रोड ७६ हजार ५०० रूपयांना मिळेल असं कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर शोरूमला या गाडीची किंमत ८१ ते ८२ हजारांना असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

दरम्यान, पुणे येथे झालेल्या किसान प्रदर्शनामध्ये ही गाडी सवलतीमध्ये खरेदी करण्याची सुवर्णसंधी शेतकऱ्यांना होती. किसानच्या प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना अनेक नव्यानव्या गोष्टी पाहण्यास मिळाल्या असून शेतीतील तंत्रज्ञान जाणून घेण्याची संधी यावेळी शेतकऱ्यांना मिळाली. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीपुणे