Join us

ओल्या काजूगरासासाठी कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केली विशेष जात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 3:11 PM

प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे १५ वर्षांच्या संशोधनानंतर खास करून ओल्या काजूगरासाठी उपयुक्त काजूचे वाण 'वेंगुर्ला-१० एमबी' या नावाने लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे.

वेंगुर्ला : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत अखिल भारतीय समन्वित काजू संशोधन प्रकल्प, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे १५ वर्षांच्या संशोधनानंतर खास करून ओल्या काजूगरासाठी उपयुक्त काजूचे वाण 'वेंगुर्ला-१० एमबी' या नावाने लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे.

हे वाण निवड पद्धतीने विकसित करण्यात आले आहे. या वाणमध्ये टरफलातील तेल कमी, टरफलाची जाडी मध्यम व काजूगर काढण्यास सुलभ आहे. ही विकसित केलेली नवीन जात शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात उत्पन्न देणार आहे.

कोकणात ओल्या काजूगराला बाजारात प्रचंड मागणी असते. मोठमोठ्या शहरातील हॉटेल्समध्ये ओल्या काजूगरांचा वापर केला जातो. त्यामुळे या ओल्या काजूगराला बाजारात खूप मागणी असते. ओले काजूगर हंगामात ३०० ते ४०० रूपये शेकडा दराने मिळतात.

ओल्या काजूगराचा हंगाम जानेवारीपासून सुरू होतो. अन्य जातीच्या काजूच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात चिक असतो व त्यांची सालही जाड असल्यामुळे बियांमधून काजूगर काढणे फार अवघड असते.

कोकणातील ओल्या काजूगराची वाढती मागणी व ओल्या काजू बीमधून ओले काजूगर काढताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन 'वेंगुर्ला १० एमबी या नावाने लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे. या वाणाच्या काजू बीमधून ओले काजूगर काढण्यास सुलभ असल्यामुळे काजूगर काढण्यासाठी कमी वेळ खर्च होतो.

त्यामुळे इतर वाणांच्या तुलनेत कमी वेळेत जास्त काजूगर मिळतात. पर्यायाने मजुरीत बचत होते. ओल्या काजू बीमधील ओल्या काजूगराचे प्रमाण ३२ टक्के असल्यामुळे एकूण ओल्या काजूगराचे प्रति झाड उत्पादन वाढते. हे वाण चालू वर्षात प्रसारित झाल्यामुळे या वाणाची कलमे शेतकऱ्यांना पुढील वर्षापासून प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे उपलब्ध होतील.

ही जात विकसित करण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, संशोधन संचालक डॉ. प्रकाश शिनगारे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. पराग हळदणकर, सहयोगी संशोधन संचालक डॉ. महेंद्र गवाणकर आणि डॉ. मोहन दळवी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

अधिक वाचा: Supari Lagvad तुम्ही खाता ती सुपारी कशी येते? कशी करतात लागवड

टॅग्स :शेतीशेतकरीकोकणविद्यापीठफलोत्पादनफळे