Join us

मॅग्नेट प्रकल्पांतर्गत रोपवाटीका व उती संवर्धन युनिट उभारणीसाठी अनुदान, कसा कराल अर्ज?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 4:48 PM

महाराष्ट्र अॅग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील लाभार्थ्यांकडून प्रकल्पामध्ये समाविष्ट असणाऱ्या फलोत्पादन पिकासाठी "रोपवाटीका उभारणी (Nursery Development)" तसेच "उती संवर्धन युनिट (Tissue Culture Unit) उभारणी साठी इच्छुक लाभार्थ्यांकडून स्वंतत्रपणे अर्ज मागविण्यात येत आहेत.

महाराष्ट्र अॅग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील लाभार्थ्यांकडून प्रकल्पामध्ये समाविष्ट असणाऱ्या सिताफळ, पेरु, संत्री, डाळिंब, चिकू, मोसंबी, आंबा, काजू, लिंबू, पडवळ, मिरची (हिरवी/लाल) व फुलपिके या निवडक फलोत्पादन पिकासाठी "रोपवाटीका उभारणी (Nursery Development)" तसेच केळी, स्ट्रॉबेरी, पेरु, डाळिंब, फुलपिके या निवडक फलोत्पादन पिकासाठी "उती संवर्धन युनिट (Tissue Culture Unit) उभारणी साठी इच्छुक लाभार्थ्यांकडून स्वंतत्रपणे अर्ज मागविण्यात येत आहेत.

पात्र लाभार्थ्यांमध्ये शेतकरी उत्पादक संस्था (कंपनी कायदा व सहकारी संस्था कायदा या अंतर्गत नोंदणी झालेल्या शेतकरी संस्था), आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत स्थापित प्रभाग संघ, महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे स्थापित लोकसंचलित साधन केंद्र तसेच शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्यांचे फेडरेशन्स/असोसिएशन्स) आणि राज्यातील कृषि विद्यापीठे व भारतीय कृषि अनुसंधान परिषद (ICAR) सहाय्यित कृषि विज्ञान केंद्र यांचा समावेश आहे.

इच्छुक लाभार्थ्यांकडून पात्र अर्जाचे मुल्यांकन करुन मुल्यांकन निकषांनुसार “रोपवाटीका उभारणी (Nursery Development)" साठीचे प्रथम ०७ व "उती संवर्धन युनिट (Tissue Culture Unit) उभारणी साठीचे प्रथम ०२ लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहेत. महिला संचलित अथवा महिलांच्या मालकीच्या संस्थांचे उपप्रकल्पासाठी लक्षांकाच्या २० टक्के प्रस्ताव राखीव ठेवण्यात येतील. त्यानुसार रोपवाटीकेसाठी ०१ प्रस्ताव राखीव असेल तथापि, आवश्यकतेप्रमाणे महिला संचलित अथवा महिला मालकीच्या संस्थांचे अर्ज प्राप्त न झाल्यास इतर शेतकरी उत्पादक संस्थांची/पात्र संस्थांची निवड करण्यात येईल.

उपरोक्त प्रमाणे लाभार्थीना प्रकल्पांतर्गत मॅचिंग ग्रँट म्हणून अनुदानाच्या स्वरूपात रोपवाटीका उभारणीसाठी पात्र प्रकल्प किंमतीच्या अधिकतम ६०% पर्यंत किंवा कमाल रु. ६०.०० लाख प्रति प्रकल्प यापैकी जे कमी असेल ते अर्थसहाय्य देय राहील. तसेच उती संवर्धन युनिट उभारणीसाठी प्रत्येक मंजूर प्रकल्पासाठी जास्तीत जास्त पात्र प्रकल्प किंमतीच्या ६०% पर्यंत किंवा कमाल रु. १५०.०० लाख प्रति प्रकल्प यापैकी जे कमी असेल ते अर्थसहाय्य देय राहील.

अ.क्र.तपशीलमहत्तम पात्र प्रकल्प किंमत (रु. लाख)
४-हेक्टर- रोपवाटीका उभारणी६०.००
उती संवर्धन युनिट उभारणी१५०.००

अर्ज करण्यासाठी सदर जाहिरातीद्वारे आवश्यक असणारे लाभार्थी निवडीची प्रक्रिया, पात्रता निकष, पात्र व अपात्र घटक, अर्थसहाय्याचे स्वरुप, लाभार्थीनिहाय विहीत नमुन्यातील अर्ज, मुल्यांकन निकष, कागदपत्रांची तपासणीसुची, विविध प्रपत्र इ. बाबतची माहिती महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प, पुणे च्या www.magnetadb.com या संकेतस्थळावर व महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे च्या www.msamb.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणेच्या संकेतस्थळावर नोंदणी करुन आपल्या इच्छुकतेनुसार (प्रकल्प निवडीनुसार) विहीत नमुन्यातील अर्ज भरुन सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) व तपासणीसुची प्रमाणे आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडून ऑनलाईन स्वरुपात projectadb@msamb.com या ई-मेलव्दारे अथवा पेनड्राईव्ह द्वारे मॅग्नेट प्रकल्पाच्या प्रकल्प व्यवस्थापन कक्ष (पीएमयु), पुणे यांचेकडे सादर करावेत.

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ११ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत राहील. सदर जाहिराती संदर्भात शुध्दीपत्रकेसल्यास ती केवळ महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प, पुणे व महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे च्या संकेतस्थळावर प्रसिध्द केली जातील.

टॅग्स :फळेभाज्यासरकारी योजनाफुलशेतीफलोत्पादनशेतकरीपीकमहिला