कधी अवकाळी पाऊस तर कधी ऐन खरीप हंगामात पावसाचा मोठा खंड अशा प्रकारच्या बदलत्या हवामानाचा अलिकडच्या काही वर्षात शेतकऱ्यांना मोठा सामना करावा लागत आहे. हवामान बदलामुळे होणारे परिणाम हंगामी पिकांना त्रासदायक ठरत असून उत्पादनात घट येत आहे, तर काही ठिकाणी पीकच शेतकऱ्याच्या हातचे जाताना दिसत आहे. यावर उपाय म्हणजे कमी पाण्यावर येणारे पीक घेणे. पारोळा येथील प्रयोगशील शेतकरी प्रकाश पाटील यांनी हा खजुर लागवडीचा (dates farming) हा आगळा प्रयोग केला आहे. आज त्यांचा हा प्रयोग यशस्वी होऊ त्यांना उत्पादनही मिळत आहे.
आयटीआयमधील नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर प्रकाश पाटील यांनी पूर्णवेळ घरच्या शेतीत झोकून दिले. मुळात मेहनती वृत्ती आणि प्रयोगशीलतेची आवड असल्याने कमी पाण्यावर येणारे पीक म्हणून त्यांनी सुमारे पाच वर्षांपूवर्प खजूराची लागवड केली आणि आज त्यांच्या खजूर बागेतील ५०वर झाडांना फुलोरा आला आहे. त्यातून त्यांना यंदाच्या वर्षी खजुराचे चांगले उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. हे कमी की काय म्हणून त्यांनी खजूराच्या रोपांमध्ये सुयोग्य अंतर ठेवल्याने त्यांना आंतरपीकही घेता येत आहे.
खजुरापासून उत्पादन सुरू होण्यापूर्वी आंतरपिकाचे उत्पन्न त्यांना मिळत आहे. ‘‘हवामान बदलाला घाबरून न जाता शेतकऱ्यांनी पीक पद्धत बदलली, व त्याला मेहनत व सातत्याची जोड दिली, तर त्यांना उत्पन्नात वाढ करणे शक्य आहे,’’ असा अनुभव श्री. पाटील आवर्जून सांगतात. आतापर्यंत त्यांना प्रयोशशीलतेबद्दल अनेक पुरस्कार व सन्मान प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे त्यांची जळगावच्या बाहेर सर्वदूर ओळख झालेली आहे. आपल्या शिकण्याच्या वृत्तीतून श्री. पाटील यांनी खजूर शेतीतले बारकावे अनुभवाने शिकून घेतले असून मागच्या सहा वर्षांच्या कालावधीतून ते या पिकाचे अनुभवी तज्ज्ञ झालेले आहेत.
फुलोरा येण्याचा कालावधी
खजुराच्या झाडांमध्येही इतर फळझाडांप्रमाणे नर आणि मादी असे प्रमाण असते. शक्यतो नर वृक्षांचे प्रमाण कमी असावे. मात्र सुरूवातीला जे शेतकरी लागवड करतात किंवा प्रयोग करतात त्यांना ते ओळखणे अवघड जाते. अनुभवातूनच ते शिकायला मिळते असे श्री. पाटील सांगतात. नर झाडाला डिसेंबर ते जानेवारीपासून फुलोरा येतो, तर मादी झाडाला जानेवारी अखेरपर्यंत आणि नंतरही फेब्रुवारीपर्यंत फुलोरा येतो. मात्र फुलोऱ्याचा कालावधी हा विविध प्रकारच्या जातींवर अवलंबून असतो.
फुलोरा अवस्था आणि परागीभवन महत्त्वाचे
खजुराच्या झाडात फुलोरा अवस्था ही फार महत्त्वाची असते. फुलोरा येताना डिसेंबरपासूनच या झाडांवर बारकाईने लक्ष ठेवावे लागते. त्याची व्यवस्थित छाटणी करणे, फुलोऱ्यावर येणाऱ्या किटकांच्या बंदोबस्तासाठी किटकनाशकाची फवारणी करणे अशी कामे वेळच्या वेळी करावी लागतात. डिसेंबरमध्येच फुलोरा येतेवेळी जर झाडाला पुरेसे पाणी दिले, तर त्याला चांगला बहार लागतो आणि फळांची संख्याही चांगली राहते, असा श्री पाटील यांचा अनुभव सांगतो. अनेक शेतकरी बांधावर झाडे लावतात. पण बांधावरच्या झाडांना पुरेसे पाणी देणे गरजेचे असते. मात्र शेतात झाडे लावली, तर त्यांना पाणी देणे सोपे जाते असा सल्लाही दे देतात.
खजुराच्या रोपात पर-परागीभवनाची फार मोठी भूमिका असते. त्यासाठी शेतकऱ्याला स्वत: नर फुलांचे मादी फुलांसोबत परागीभवन करावे लागते. तरच फळधारणा चांगली होते. श्री. पाटील यांनी स्वत: असे परागीभवन केले होते. त्याचा त्यांना फायदा झाला.
फळधारणा आणि उत्पादन
बियांपासून रोपांची लागवड केल्यानंतर तीन ते चार वर्षात फळधारणा सुरू होते. श्री. प्रकाश पाटील यांनी खजुराच्या बियांपासून २०१८ मध्ये रोपे तयार केली. पुढे एक वर्षांनी ती रोपे शेतात लावली म्हणजेच २०१९च्या सुमारास. त्यानंतर तीन वर्षांनी फळे मिळण्यास सुरूवात झाली. सुरूवातीला पहिल्या वर्षी एका झाडापासून सुमारे तीन ते चार घड, नंतरच्या वर्षी चार ते पाच घड व चौथ्या वर्षी आठ ते दहा घड लागलेले दिसून आले. एका घडाचे वजन पहिल्या वर्षी तीन ते चार किलो होते, ते पुढे वाढून ८ ते १० किलोपर्यंत वाढते. बरेचदा २५ किलोपर्यंत घडाचे वजन जाते. एका झाडाला सरासरी १० घड आणि त्यांचे वजन सरासरी १५ किलो जरी धरले, तरी एका झाडापासून दीड क्विंटल खजूराचे उत्पादन मिळते.
विक्री व्यवस्था आणि प्रक्रिया
खजुराचा फळधारणेचा कालावधी हा जून-जुलै असा असतो. पण त्याच वेळेस आपल्याकडे आंब्याचा हंगाम असल्याने लोकांची पावले सहजासहजी ओल्या खजुराकडे वळत नाहीत. अशा वेळेस व्यापारी लोक भाव पाडून मागतात, म्हणजेच सुमारे ३० रुपये किलो प्रमाणे शेतकऱ्याकडून ते खरेदी करतात व पुढे बाजारात शंभर ते दीडशे रुपयांनी याच खजुराची विक्री होते. पण श्री. पाटील यांनी मात्र स्वत: विक्री केली. मित्र परिवार, नातलग, ओळखी पाळखीतले लोक अशांना त्यांनी साधारणपणे १०० रुपये प्रति किलोने खजूर विकला. त्यामुळे त्यांचे नुकसान झाले नाही. एक तर खजूराची फळे स्वत: विकावीत किंवा त्यावर प्रक्रिया करून खारीक करून किंवा खजूर करून त्याची विक्री करावी. त्यासाठी किमान सहा महिने वाट पाहणे आवश्यक आहे, असा सबुरीचा सल्लाही ते देतात.
🌱प्रगतशील शेतकरी व्हॉट्सॲप ग्रूपही जॉईन करा⭐👇🏻
https://chat.whatsapp.com/HV0xE9Q6mz4LMXStoq6Gpa
अशी होते प्रक्रिया
खजुराच्या फळांचा रंग पिवळा आणि लाल असा वाणाप्रमाणे असतो. झाडावरून काढल्यानंतर या फळांचे घोस हे सुरूवातीला एका ड्रममध्ये किंवा आंब्याची आढी लागते त्याप्रमाणे गव्हाणीत चार ते पाच दिवस ठेवावीत. त्यानंतर ती फळे पिकतात व त्यात साखरेचे प्रमाण चांगले असते. त्याची थेट विक्री करावी किंवा साठवून ठेवावे.
२. पिकवलेली फळे फ्रीजमध्ये साठवून ठेवल्यास सुमारे ३ वर्ष चांगली राहतात. मात्र तशीच ठेवल्यास सुमारे वर्षभर खजूर म्हणून टिकतात.
३. पिकविण्याची दुसरी पद्धत म्हणजे एका पसरट भांड्यात पाण्यात मीठ किंवा खाण्याचा सोडा टाकून पाणी उकळवले जाते. त्यात खजूराचे घड (फळ घडापासून मोकळे झाले की लवकर खराब होते) सुमारे ८ ते १२ मिनिटे उकळावी लागतात. त्यामुळे त्यातील उष्मांक वाढून त्यात साखरेचे प्रमाण वाढते, तसेच त्यावरील कठीण कवच मऊ होते व ते खजूर म्हणून खाण्यास योग्य होतात.
४. हेच पिकविलेले फळ जर सोलर ड्रायरमध्ये घडासह सुकवले, तर चार ते पाच दिवसात त्याची खारीक तयार होते. ही खारीक हिवाळ्यापर्यंत साठवली, तर किलोला सुमारे तीनशेपेक्षा जास्त दर मिळतो.
५.पिकलेल्या खजुरांच्या फळांवर गुळाच्या पाकाचीही प्रक्रिया करून खजूर तयार करतात. त्यामुळे या फळांचे वजन वाढते व टिकवण क्षमताही वाढते. पण त्यापेक्षा पाणी उकळून घेऊन किंवा अढी लावून खजूर तयार करणे केव्हाही चांगले.
६. श्री. पाटील यांनी या तीनही प्रक्रिया करून पाहिल्या आहेत. खजुरासह खारकेचेही उत्पन्न त्यांनी घेतले. पण सध्या प्रयोगाच्या अवस्थेत असल्याने या प्रक्रियायुक्त पदार्थांचा उपयोग त्यांनी घरच्या साठीच केला आहे.